जिममध्ये व्यायाम करताना मृत पावलेला अजिंक्य नेमका कशाचा बळी?

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) दि. १७ : शुक्रवार दि.१६ रोजी खासगी जीममध्ये व्यायाम करीत असताना उत्तमनगर येथील अजिंक्य लोळगे या १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे एक अकस्मात घडलेली घटना होती…? एक अपघात होता…? की कुणाच्या निष्काळजीपणाचा बळी होता…? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत.

सखोल चौकशी नंतर नेमके काय घडले ते समोर येईलही…कदाचित येणारही नाही…? परंतु या एका घटनेने बऱ्याच प्रश्नांना जन्म दिला हे मात्र नक्की.

व्यायाम करून कोसळण्यापूर्वीचा अजिंक्यचे (पोपटी टी शर्टमध्ये) हे सीसीटीव्ही छायाचित्र

अलीकडच्या काही वर्षात तरुणाई मध्ये आकर्षक बांधा, पिळदार शरीरयष्टीचे आकर्षण बरेच वाढले आहे. त्यासाठी स्वतःच्या शरीर प्रकृतीचा विचार न करता काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यासाठी जीम मधील प्रशिक्षकांकडूनही वेगवेगळे प्रयोग केले जातात. कधी हे प्रयोग यशस्वी ठरतात तर कधी कधी त्या तरुणांच्या अंगलटही येतात. नवीन नाधिक परिसरातही अशा जीमचे चांगलेच पेव फुटले असून वेगवेगळ्या भागातून जीमची संख्या देखील खूप वाढली आहे.

धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसलेली मंडळी आणि पिळदार शरीरयष्टी चे आकर्षण असलेली तरुणाई हा या जीमचा सुलभ ग्राहक वर्ग. अजिंक्य लोळगे हा किडकिडीत शरीरयष्टीचा इंजिनियरिंगचा विद्यार्थी. इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्यापूर्वी नुकताच त्याने माणिकनगर मधील बॉडी झोन या खाजगी जिम मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र अवघ्या तिसऱ्या दिवशीच जिमचा प्रवेश हा स्वर्ग प्रवेशाचा मार्ग ठरेल याची त्यानेही कल्पना केली नसावी.

या पार्श्वभूमीवर जिमचा प्रशिक्षक कसा असावा? जिमचे काय निकष असावे याबाबत परिसरातील काही जाणकारांचे व जीम चालकांचे मत आजमावले असता त्यांच्या म्हणण्यानुसार जीम मधील प्रशिक्षक आधी स्वतः प्रशिक्षित असावा. त्याला मानवी शरीर रचनेचा अभ्यास असावा. प्रशिक्षणार्थींकडून कसा, काय, किती व्यायाम सराव करून घ्यावा याचे सखोल ज्ञान त्याला असावे. महत्त्वाचे म्हणजे जीममध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक सदस्याला काही नवे/जुने आजार आहेत का ? त्याची शारीरिक क्षमता व्यायामासाठी योग्य आहे का ? याचाही प्रशिक्षकाने अभ्यास करणे गरजेचे आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार मृत अजिंक्यच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात त्याची शरीर प्रकृती तशी किडकिडीतच होती. त्याच्या प्रकृतीच्या सहनशक्ती पलीकडे व्यायाम घेतला गेला का ? जीमला जाण्यापूर्वी दुपारी तो जेवला होता की नाही ?, जीमला प्रवेश घेऊन तीनच दिवस झालेले असताना सुरवातीलाच न झेपणारे व्यायाम प्रकार त्याच्याकडून करवून घेतले गेले का ?, किंवा तो काय व्यायाम करीत आहे याकडे प्रशिक्षकांचे लक्ष होते का ? असे असंख्य प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

व्यायाम करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आणि आवश्यक असले, तरी तो कोणत्या वातावरणात, कशा प्रकारे करावा याबाबत सर्वांनीच काय सावधानता बाळगली पाहिजे हा मुद्दाही या निमित्ताने समोर येत आहे.

या संदर्भातील तर्कवितर्क काहीही असले, तरी या घटनेने आई-बाबांचा एकुलता एक मुलगा….दोन बहिणींचा एकला भाऊ…त्यांची स्वप्ने…त्यांच्या आशा-आकांक्षा….परिवाराचा आधारस्तंभ…हिरावून घेतला हे न बदलणारे सत्य असल्याचे अधोरेखित केले आहे…!

LEAVE A REPLY

*