वृक्षांच्या मारेकर्‍यांना रोखणार कोण?

0
खंडू जगताप – पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्रात एकीकडे २० कोटी झाडे लावण्याची मोहीम सुरू झाली आहे पण दुसरीकडे मात्र झाडांच्या मारेकर्‍यांचे कारनामे वाढत असल्याचे चित्र नाशिक शहरात पाहावयास मिळत आहे. कुर्‍हाडीचे घाव घालून कत्तल करण्याबरोबरच आता अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही झाडे जाळली जात आहेत.
यासाठी विषारी इंजेक्शन, साली काढणे, बुंध्याभवती रसायन ओतणे, कुर्‍हाडीने बुंध्यावर खाचा मारणे, वृक्षांच्या खोडाच्या कडेला कचरा लावून पेटवणे असे वृक्षांचे खून करण्याचे प्रकार वाढले असून याबाबत महापालिका व त्यांचे विभागही उदासीन असल्याचे चित्र आहे.

नवीन रोपे लावून त्यांचे संगोपन करत असताना ते जगेल की नाही याची शाश्‍वती नाही. परंतु पूर्ण वाढ झालेल्या, अनेक वर्षांपासून डौलाने उभ्या असणार्‍या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल होत आहे. त्यांचे होणारे खून रोखण्याचा प्रयत्न कोणीही करताना दिसत नाही.

हा कोणता शहाणपणा आहे? शहरात वाळलेली तसेच मनापाच्या नियोजनाने आता रस्त्याच्या मधोमध आलेली झाडे नागरिकांच्या जिवावर उठली असताना हिरवीगार, डवरलेली जुनी झाडेदेखील धडाधड कोसळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाटचाल करणे वा झाडांखाली थांबणे धोकादायक ठरत आहे.

दोन वर्षांपूर्वी महाकवी कालिदास कलामंदिराबाहेरील वडाचे झाड कोसळून एका कर्मचार्‍याचा दुर्दैवी अंत झाला होता. वकीलवाडीत असाच प्रकार घडला होता. या प्रकरणांची प्रशासनाने चौकशी केली, मात्र हाती काही लागले नाही. असे असले तरीही या प्रकरणातून प्रशासनाने कोणतीही शिकवण घेतली नाही हे विशेष.

शहरात एकाएकी वृक्ष कोसळण्याच्या घटनेत का वाढ झाली? त्याला जबाबदार कोण? याचा साधा तपास लावण्याचेही औदार्य महापालिका प्रशासनाकडून दाखवले जात नाही. अनेक ठिकाणी डोलणारे वृक्ष नाशिकचे पर्यावरण संभाळत असताना दुसरीकडे मात्र सक्रिय असणार्‍या काही लॉबींना त्यांच्या स्वार्थात अडथळा वाटत आहेत.

बांधकामासाठी सर्वात मोठा अडथळा वृक्षांचा मानला जातो. बर्‍याच ठिकाणी तर झाडामुळे दुकान झाकले जात असल्यामुळे संबंधित व्यावसायिकांकडून झाड परस्पर तोडले जाते किंवा वाळवले तरी जाते. त्यासाठी बाजारात विविध प्रकारची रसायनेही उपलब्ध असतात. झाड पडण्याची घटना घडल्यानंतर तेथील लाकडे उचलण्यापलीकडे प्रशासनाच्या वतीने काहीही घडत नाही, हे खरे दुर्दैव असल्याचे पर्यावरणवादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांंगितले.

विषारी रसायनांचा वापर
काही ठिकाणी झाडांच्या मुळाशी विषारी रसायने टाकून ती निर्जीव केली जातात. आता विषारी इंजेक्शन्स उपलब्ध झाली असून आठवड्यातून २ ते ३ वेळा इंजेक्शन झाडांना टोचले की अवघ्या महिनाभराच्या आत सदर झाड वाळून जाते. काही ठिकाणी वृक्षांच्या साली काढून त्यांना वाळवले जाते. ते निर्जीव झाल्यास नियमाप्रमाणे तोडलेही जाते.
मुळाशी जाळला जातो कचरा
सध्या झाडाच्या मुळाशी कचरा जाळण्याचे वा आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. जेणेकरून झाडाची मुळे जळतात. झाडातील सजीवपणा नष्ट होऊन ते आपोआप वाळते. मग वाळलेले झाड पाडताना कायद्याच्या अडचणीही येत नाहीत.
कॉंक्रिटीकरण
रस्त्यांवर झाडांच्या कडेने काही प्रमाणात तरी मोकळी जमीन सोडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात झाडाला अगदी खेटूनच डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण केले जाते.

परिणामी झाडे कमकुवत होतात. रस्ते रुंद करताना किंवा पदपथ करताना अनेक झाडांची मुळे तोडली जातात. खोडाच्या आसपास माती राखली जात नाही. याशिवाय उन्हाळ्याआधी धोकादायक झाडे काढणे, त्यांना कीडरोग लागला आहे का याची पाहणीही पालिकेकडून केली जात नाही.

LEAVE A REPLY

*