पुरस्काराने जबाबदारी वाढते – विश्वास ठाकूर

0
नाशिक | कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला जेव्हा तिच्या कार्याबद्दल पुरस्कार मिळतो तेव्हा त्या व्यक्तीची त्या क्षेत्रात अधिक चांगले काम करून दाखविण्याची जबाबदारी वाढते. कारण समाज त्या व्यक्तीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहात असतो. असे प्रतिपादन विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विस्वास ठाकूर यांनी केले.
येथील विविध क्रीडा संस्थाची मिळून सारे व समर्पण नाशिक या संस्थांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्व. सुरेश काळे यांच्या स्मरणार्थ क्रीडा पत्रकार पुरस्कार व  दिवंगत मनोहर ( बाबा ) गवळी यांचे स्मरणार्थ निसर्ग मित्र पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मिळून सारे व समर्पण नाशिक या दोन्ही संस्थांनी एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. क्रीडा संस्था या फक्त क्रीडा स्पर्धाच आयोजित करत नाही तर सामाजिक जाणिवेतून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समाजात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या क्रीडा व पर्यावरण या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करून त्यांचा यथोचित सन्मान करतात.
एवढेच नव्हे तर या व्यक्तींच्या सौभाग्यवतींचा देखील यथोचित सन्मान करतात ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. कारण काम करणाऱ्या व्यक्तीला जर घरातून पाठिंबा मिळाला तरच ती व्यक्ती चांगले काम करू शकते.
या वर्षी दिला जाणारा स्व. सुरेश काळे यांच्या स्मरणार्थ क्रीडा पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा प्रतिनिधी फणींद्र मंडलिक यांना तर  व   दिवंगत मनोहर ( बाबा ) गवळी यांचे स्मरणार्थ निसर्ग मित्र पुरस्कार राजेश पंडित  यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरित करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह तसेच या दोघांच्या सौभाग्यवतींचा देखील साडी चोळी देऊन सन्मान असे होते.
या प्रसंगी क्रीडा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, मंदार देशमुख, अविनाश खैरनार, उमेश आटवणे व विविध क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कवी राजेंद्र उगले यांनी गोदावरी नदीवर लिहिलेली कविता सादर केली तिला उपस्थित क्रीडा प्रेमीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही,पाण्याचा काटकसरीने वापर करू तसेच गोदावरीचे प्रदूषण करणार नाही असा संकल्प केला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अविनाश खैरनार यांनी केले तर सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत उमेश आटवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

*