सिनेमा बघायला गेली अन् हिरोइन झाली

0
सत्य कधी कधी कल्पनेपेक्षा विचित्र असते असं आपण अनेकदा बोलतो. पण हे घडलंय बबन सिनेमाच्या बाबतीत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? होय नवीनच आहे हे. चंदेरी दुनियेत काम करण्यासाठी आणि आपले नशीब आजमावण्यासाठी आज शेकडो तरुण आणि तरुणी संघर्ष करतांना आपण बघतो.

त्यात काहींना यश मिळते तर काहींना अनेक वर्ष वाट पहावी लागते तर काहींच्या पदरी निराशा पडते. परंतु बबन सिनेमाच्या बाबतीत काही वेगळंच घडलंय. पुण्यात बाणेर भागात राहणारी बारावी सायन्स मध्ये शिकणारी एक सर्वसामान्य मराठी कुटुंबातली मुलगी अर्थात गायत्री जाधव घरातून सिनेमा बघायला म्हणून बाहेर पडली आणि चक्क मराठी सिनेमाची हिरोईनच झाली…ते कसं काय? ते सांगितलंय स्वतः गायत्रीने.

याबद्दल गायत्री सांगते की, दोन वर्षापूर्वी मी, माझी आई  आणि माझी काकू सिनेमा बघायला म्हणून घराबाहेर पडलो. रस्त्याने जात असतांना वाटेत एक मुलांचा घोळका माझ्याकडे बघत असल्याचे मी नोटीस केले पण दुर्लक्ष केले. जरा वेळ पुढे चालत गेल्यांनतर काही वेळाने त्यातील एक मुलगा आमच्याकडे धावत आला आणि म्हणाला की, आम्ही बबन नावाचा मराठी सिनेमा करतोय आणि त्यासाठी आम्ही मुख्य नायिका शोधत आहोत, तर तुम्ही आमच्या सिनेमात काम कराल का ? खरंतर हे एकून मला जरा हसायलाच आलं.

त्याने सांगितले की तिकडे समोर भाऊराव कऱ्हाडे म्हणून आहेत जे ख्वाडा सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि तो सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा होता. मी त्यांना तिथे जाऊन भेटले. परिचय झाला आणि त्यावेळी त्यांनी मी त्यांचा मोबाईल नंबर घेतला. घरी आल्यावर वडिलांनी त्यांच्या बद्दल माहिती घेतली, ख्वाडा सिनेमा पाहिला आणि मग पुन्हा आम्ही भेटलो.

दुसऱ्या भेटीतच मी त्यांना सांगितले की, यापूर्वी मी शाळा, कॉलेज इथे एकदाही स्टेजवर काम केले नाहीये, तर लग्गेच सिनेमात ते पण नायिकेचं काम कसं करणार? त्यावेळी भाऊराव म्हणाले की, तुमची तयारी असेल तर आपण काही दिवस वर्कशॉप घेऊ आणि मग ठरवू. मग पुढे काही दिवस वर्कशॉप झाली. त्यावेळीच भाऊसाहेब शिंदे यांची ओळख झाली.

एकदम जिंदादिल माणसं होती सर्व. अशाप्रकारे सिनेमात मी कोमल नावाच्या मुख्य नायिकेची भूमिका साकारली. गावातली साधी भोळी अशी मुलगी आहे. काम करतांना भाऊराव आणि भाऊसाहेब दोघांकडून खूप काही शिकायला मिळाले.

खरंतर अजून पण मला हे सर्व स्वप्नमय वाटतं आहे. कारण अनेकांना अनेक वर्ष संघर्ष करून जी संधी मिळत नाही ती संधी मला अवघ्या काही क्षणात मिळाली. त्यासाठी मी सर्व बबन सिनेमाच्या टीमचे खरंच मनापासून आभार मानतेच.

विशेष करून भाऊरावांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझे मराठी उच्चार शुद्ध होण्यासाठी विश्वास पाटील यांची काही पुस्तकं वाचायला सांगितली. काही संस्कृत श्लोक पाठ करायला सांगितले. त्यामुळेच आज पडद्यावर तुम्ही जेव्हा पहाल तेव्हा तुम्हाला नक्कीच वेगळेपणा वाटेल. आता २३ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे परंतु परीक्षेला जातांना जसा पोटात गोळा येतो तसं माझं आज झालं आहे.

LEAVE A REPLY

*