…आणि म्हणून नाशिक पोलिसांनाही व्हावे लागले शेतकरी

0
नाशिक | पत्नीचा खून केल्याप्रकरणी बागलाण तालुक्यातील भडाणे येथील वसंत पुंजाराम सोनवणे यास गेल्या वर्षी मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  त्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात नेले असता तिथून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तेव्हापासून नाशिक ग्रामीण पोलीस त्याच्या शोधात होती.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी वसंत सोनवणे हा साक्री तालुक्यातील प्रतापपूर येथे शेतीकाम करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकातील पोहवा नामदेव खैरणार, दिपक आहिरे, अशोक जगताप, सुनिल पानसरे, पोकॉ प्रदिप बहिरम यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास जाऊन शेतकरी असल्याचे भासवत शेजारील शेतात गेले. व एक वर्षांपासून फरार असलेला आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

या घटनेची अधिक माहिती अशी की, 2005 मध्ये सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नंबर 11/2005 भादवि कलम 302, 304(ब) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता.

या गुन्हयातील संशयित आरोपी वसंत पुंजाराम सोनवणे (वय 45, रा. भडाणे, ता. सटाणा) याने त्याच्या पत्नीस ठार केले होते. सटाणा पोलिसांनी सदर गुन्हयात वसंत सोनवणे यास अटक करून त्याच्या विरोधात मालेगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र खल केले होते.

न्यायालयाकडून 25 ऑक्टोबर 2016 रोजी खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आरोपी वसंत सोनवणे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला मालेगाव येथुन नाशिकरोड कारागृहात आणण्यात आले होते. त्यानंतर मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात वसंत सोनवणे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होती. अखेर त्याला ताब्यात घेतल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*