सर्वत्र संचारबंदी; बळीराजा मात्र कामात व्यस्त; गहू हार्वेस्टिंगच्या कामांनी घेतली गती

सर्वत्र संचारबंदी; बळीराजा मात्र कामात व्यस्त; गहू हार्वेस्टिंगच्या कामांनी घेतली गती

नाशिकरोड । का.प्र.

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला असून संपूर्ण जग या विषाणूने आपल्या मगरमिठीत पकडलंय. लॉकडाऊन मुळे आज सर्वसामान्यांना घरातच बंदिस्त राहावे लागत असले तरीही बळीराजाच्या पाचवीला पुजलेले कष्ट याही परिस्थितीत त्याचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र नाशिकरोडच्या पूर्व भागातील शेती पट्ट्यात दिसून येते.

सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू असून सिन्नरफाटा मळे विभाग, चेहेडी, शिंदे, पळसे, मोहगाव-बाभळेश्वर चाडेगाव, नानेगाव, शेवगे दारणा, बेलतगव्हाण, कोटमगाव, हिंगणवेढे आदी ग्रामीण भागातील शेतकरी व्यस्त आहेत.

गेल्या हंगामातील दुष्काळाने शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले. त्यात कोरोनाच्या महामारीने यंदा भर पडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जीवनावश्यक वस्तूच्या यादीत अन्नधान्याचा प्रामुख्याने समावेश आहे.

मुबलक पावसामुळे यंदा गव्हाचे पीक जोमदार आहे. चालू असलेल्या मार्च महिन्यात सगळीकडे गहू काढणीच्या कामाने वेग घेतल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या काळातही उन्हात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळावा व सगळ्यांची भूक भागवणारा हा वर्ग खऱ्या अर्थाने ‘बळीराजा’ व्हावा, अशीच आशा सर्वांची असावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com