Video : युट्यूब बघून केले व्हॉटस्अ‍ॅप हॅक; विकृतीतून अश्लील संदेश

0
नाशिक । व्हॉटस्अ‍ॅप हॅक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून दिप्तेश प्रकाशचंद्र सालेचा (24) या संशयितास सोमवारी अटक केली. वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या दिप्तेश याने युट्यूबवर व्हिडीओ बघून व्हॉटस्अ‍ॅप, फेसबूक हॅक करण्याचे कारनामे केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

आतापर्यंत वैयक्तिक व्हॉटस्अ‍ॅप अकाऊंट हॅक होत असल्याचे प्रकार घडले होते परंतू देशामध्ये व्हॉटस्अ‍ॅपचे ग्रुपमधील सदस्यांना हॅक करण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा केला जात आहे.

त्याच्या विकृत मानसिकतेतून व्हॉटस्अ‍ॅप हॅक केल्यानंतर त्याने महिलांना टारगेट करत अश्लील संदेश पाठवून आसूरी आनंद लूटत असल्याचेही समोर येत आहे. प्रामूख्याने विकृत आनंदासाठी व्हॉटस्अ‍ॅप तसेच फेसबूकवर शोध घेणार्‍या युवकांना त्याने आपले मुलीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून गळास लावले.

यामध्ये नाशिकचे तरूण अधिक असल्याने हॅक केलेल्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये नाशिककरांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी 29 महिला व दोन पुरूष असे एकुण 31 अकाऊंट त्याने हॅक केल्याचे समोर आले आहे. नाशिकसह पुणे, मुंबई या जिल्ह्यांमधील अकाऊंटही त्याने हॅक केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

दिप्तेश सालेचा याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(क)प्रमाणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच वर्ष कारावास तर पाच लाखांचा दंड अशी शिक्षा आहे. दरम्यान, संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*