Type to search

Featured सार्वमत

13 खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याबाबत नोटिसा

Share

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टाकळीभान ग्रामपंचायत सरसावली

टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीदार गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या टाकळीभानला पाणीटंचाईने ग्रासले आहे. दै. सार्वमतच्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सरसावली असून टेलटँक परिसरातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या विशिष्ट अंतरावरील शेतकर्‍यांच्या विहीरी पाणी टंचाई दूर होईपर्यंत अधिग्रहीत करण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत 13 शेतकर्‍यांना विहिरी अधिग्रहीत करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहे.

टाकळीभान परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाच ते सहा दिवसातून एकदा केवळ गावाला गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. वाड्या वस्त्या मात्र अनेक दिवसांपासून तहानलेल्या आहेत. टेलटँकने तळ गाठला. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईची समस्या उद्भवली आहे. गेल्या महिन्यापासून टंचाईची समस्या उग रुप धारण करीत आहे. पाणी टंचाई निवारणार्थ सार्वमतने गेल्या आठवड्यात आवाज उठवल्याने व परिसरातील विहीरी अधिग्रहीत करण्याची ग्रामस्थांची मागणी रेटून धरल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने काल शनिवारपासून पाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या विशिष्ट अंतरावरील विहीरी अधिग्रहीत करण्याची कारवाई सुरु केली आहे.

या परिसरातील श्रीधर गाडे, बाळासाहेब बनकर, सुकदेव जाधव, अण्णासाहेब म्हस्के, नितीन पटारे, सुबोध माने, प्रल्हाद कापसे, भाऊसाहेब दिनकर कोकणे, रावसाहेब वाघुले, शंकर पवार, श्रीकृष्ण वेताळ, राजेंद्र कोकणे, रावसाहेब पवार या 13 खाजगी विहीर मालकांना विहीर आधिग्रहण करीत आसल्याच्या नोटीस देण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

येत्या 27 मे रोजी होणार्‍या ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यावर पाणी टंचाईचा विषय घेतलेला नसला तरी ऐनवेळच्या विषयात यावर चर्चा होऊन सोमवारपासून या अधिग्रहीत केलेल्या विहिरींचा पाणी पुरवठा सुरु होईल असे समजते. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर काहीशी मात केली जाणार आहे. सार्वमतच्या आवाहनाला साद देत माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी पाणी पुरवठ्यासाठी विहीर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचे जाहीर केले होते.

ग्रामपंचायतीच्या टेलटँक परिसरातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीच्या विशिष्ट अंतरावरील 13 खासगी विहिर धारकांना विहिरी अधिग्रहीत करीत असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार वेळापत्रक तयार करुन दररोज तीन विहिरींचे पाणी दोन दिवसासाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील गाडे विहिरीतून सुमारे पाच तास पाणी पुरवठा केला जाईल व ग्रामपंचायत मालकीच्या तांदळे विहिरीतून आठ तासाचा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
– आर. एफ. जाधव, (ग्रामविकास अधिकारी)

टेलटँक परिसरात सुमारे 20 कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करुन आठ गावच्या पाणीपुरवठा योजना सुरु आहेत. जलसंपदा विभागाने कायद्यावर बोट ठेवून या पाणी पुरवठा योजनांचा विचार न करता शेती आवर्तनाच्या नावाखाली पाण्याची वारेमाप उधळपट्टी करीत टेलटँक कोरडाठाक केला आहे. टंचाई काळात कोट्यावधी रुपये टँकरवर खर्च केला जातो. त्याऐवजी जलसंपदाने पाणी योजना असलेल्या ग्रामपंचायतीकडून नाममात्र पाणीपट्टी आकारुन टेलटँकमध्ये पाणी शिल्लक ठेवले असते तर परिसराला पाणी टंचाईचे प्रखर चटके बसले नसते.
– नानासाहेब पवार (बाजार समिती, माजी सभापती)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!