विहिरीत कोसळून दोन मजूर ठार, तीन जखमी

0

क्रेनचा वायररोप तुटल्याने अपघात : कारेगावनजीक टिळेकर वस्तीवरील घटना

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मालुंजा-मातापूर रोडवर टिळेकर वस्तीवर विहिरीचे काम सुरू असताना क्रेनच्या माल्डीचा वायररोप तुटल्याने विहिरीत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये संदीप उर्फ बबलू केशव चव्हाण व धोंडिबा उर्फ दादासाहेब दगडू वाघ (रा. कारेगाव) यांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत सोमनाथ दादासाहेब गायकवाड (रा. मालुंजा), शेषराज दगडू वाघ (रा. कारेगाव) तसेच मदतीला गेलेले दादासाहेब बडाख जखमी झाले. या दुर्घटनेत वाघ कुटुंबातील दोन सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. तालुक्यातील मालुंजा-मातापूर रोडवर टिळेकर यांच्या नवीन विहिरीचे काम सुरू होते. साधारणपणे 70 ते 75 फूट विहिरीचे काम झालेले आहे. याठिकाणी कारेगाव येथील सहा मजूर काम करीत होते. दिवसभर या विहिरीतील दगड क्रेनच्या साहाय्याने वर काढण्याचे काम सुरू होते. त्यामुळे विहिरीवर क्रेन चालविण्यासाठी दोघे व विहिरीमध्ये दगड भरून देण्यासाठी चार मजूर काम करीत होते. सायंकाळी काम संपल्यानंतर चार मजूर विहिरीतून वर येण्यासाठी माल्डीत बसले व क्रेनच्या साहाय्याने माल्डी वर आणली. मात्र माल्डी विहिरीच्या काठावर आल्यानंतर वायररोप तुटल्याने हे चौघेही विहिरीत पडले.

यावेळी बाहेर असलेल्या दादासाहेब बडाख व आलीम पठाण हे मदतीसाठी विहिरीत उतरले. यावेळी बडाख यांचा पाय घसरल्याने ते जखमी झाले. दरम्यान घटनेची माहिती कळताच शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, मालुंजाचे उपसरपंच विलास बडाख, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण साळवे, कैलास पाटील, बाबासाहेब राऊत, अशोक बडाख, यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीला धावले. जखमी व मयतांना विहिरीमध्ये बाज सोडून बाहेर काढले व उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच पंचायत समितीचे सभापती दिपकराव पटारे, जि.प. सदस्य शरद नवले, गिरीधर आसने यांनी तातडीने रुग्णावाहिका बोलाविली. त्यानंतर जखमींना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र जगधने यांनी संदिप चव्हाण व धोंडिबा वाघ उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. तर जखमी सोमनाथ दादासाहेब गायकवाड, दादासाहेब बडाख यांच्यावर उपचार सुरु केले. जखमींपैकी शेषराज वाघ यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी विळद घाट येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच माजी आमदार भानुदास मुरकूटे व सिद्धार्थ मुरकुटे यांनी रुग्णालयात जावून जखमीची विचारपूस केली.

LEAVE A REPLY

*