घोडेगावनजीक शस्त्रे असलेली इंडिका हस्तगत

0
सोनई (वार्ताहर) – सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पथक रात्रीची गस्त घालत असताना नगर-औरंगाबाद राजमार्गावर तलवार, टॉम्या, एअरगन, गावठी कट्ट्याचे राउंडसह बेवारस इंडिका व मोटारसायकलसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल बेवारस स्थितीत सापडला असून आरोपी मात्र वाहनांना लॉक करून पोलीस पोहचण्याच्या आतच पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे रात्रीची गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली, की नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर घोडेगावच्या पुढे पागिरे पेट्रोलपंपाजवळ इंडिका व मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आहे.

सोनईचे पोलीस पथक मिळालेल्या माहितीनुसार लगेच पेट्रोलपंपाच्या आसपास गेले असता पंपापासून जवळच एका शेताच्या कम्पाउंड जवळ एक इंडिका कार (एमएच-27-एजी-147) व मोटारसायकल (एमएच-14-सीएच-3428) दोन्ही बाजूंनी हॅण्डल लॉक केलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी कारची मागची काच काढून पाहिली असता कारमध्ये तलवार, टॉम्या तीन नग, दगड, एअरगन, गावठी कट्ट्याचे दोन राउंड दिसून आले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ही कार व मोटारसायकल सोनई पोलीस ठाण्यात रात्रीच आणली.

अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 41 प्रमाणे बेवारस शस्त्र व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सोनईच्या पोलीस पथकात हेडकॉन्स्टेबल चव्हाण, नाईक बापू फुलमाळी, गणेश धोत्रे, काका मोरे, वाहनचालक श्री. जरे यांचा समावेश होता. मुद्देमाल मिळाला असला तरी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन रजिस्ट्रेशन क्रमांकानुसार आरोपीचा शोध घेतला जात असून लवकरच यातील आरोपींना अटक केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*