वुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब ‘ESDS’

0
नाशिकमध्ये अजूनही संगणकच नाही तर इंटरनेट आणि सॉफ्टवेअर साक्षर लोकांची संख्या अगदी कमी आहे. अगदी कंपन्यांमधील काम करणार्‍या कर्मचार्‍यांपासून ऑनलाईन फॉर्म भरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. ही गरज ओळखून नाशिकमध्येच आपला सॉफ्टवेअरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय पीयूष सोमाणी यांनी घेतला. अगदी छोटेखानी घरापासून तारांकित दर्जाच्या त्यांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास विस्मयकारक आहे.

आज ही कंपनी भारतातल्या पहिल्या चार कंपन्यांमध्ये गणली जातेय. कर्मचारी काम करताना त्यांना उत्साह वाटला पाहिजे यासाठी सोमाणी यांनी आपल्या इएसजीएस या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये उत्तम इंटेरिअरबरोबरच जलतरणासाठी तलाव, विविध खेळांसाठी स्वतंत्र जागा या गोष्टींसाठीही वेगळी ‘स्पेस’ ठेवली आहे. शून्यातून उभ्या केलेल्या या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आज सुमारे चारशे कर्मचारी आपले योगदान देत आहेत.

पीयूष सोमाणी यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरला झाला. त्यांचे वडील बडोदा बँकेत अधिकारी होते. अर्थातच बदलीची नोकरी असल्याने सतत कुटुंबकबिला घेऊन ते बदलीच्या गावी जात. मुलाच्या शिक्षणावर याचा परिणाम व्हायला नको म्हणून त्यांनी नाशिकमध्ये स्थायिक व्हायचे ठरवले.

पाचवीमध्ये सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतलेल्या पीयूष यांची इंग्रजी भाषा इयत्ता आठवीत जाईपर्यंत चांगली नव्हती. पण त्यानंतर मात्र त्यांनी गंभीरपणे विचार करून या भाषेवर प्रभुत्व मिळवले. बारावीला 75 टक्के गुण मिळाल्यावर अभियांत्रिकीला सहजासहजी प्रवेश मिळाला नाही. मात्र संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रवेश घेतला. वडील बँकेत अधिकारी असले तरी मुलांच्या शिक्षणाच्या फी त्यांच्या दृष्टीने डोईजड होत्या. त्यांच्या कमाईतील अर्धी रक्कम पीयूष यांच्या शिक्षणावर खर्च होत होती.

पहिल्या वर्षी चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. उपजत असलेल्या लिडरशिपचा शोध त्यांना याच काळात लागला होता. ‘वर्ष वाया जाणार म्हणून वडील नाराज होते. मी दुःखी होतो’ असे सोमाणी सांगतात.

याचदरम्यान संगणक क्षेत्र, संगणकीय भाषा आणि संगणकीकरण या गोष्टींची ओळख होत होती. नवे क्षेत्र आधुनिक पावलांनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रवेश करत होते. काळाची पावले ओळखून पीयूष यांच्या वडिलांनी त्यांना ‘सी’ ही संगणकीय भाषा शिकवण्यासाठी क्लासही लावला. या क्लासमुळे पीयूष यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि आपले खरे विश्व त्यांना सापडले.

महाविद्यालयीन शिक्षण पुन्हा सुरू झाले तरी संगणक क्षेत्रातील त्यांची धडपड सुरूच होती. शेवटच्या वर्षाला असताना संगमनेरमध्ये एमबीए करत असलेल्या काही वयाने मोठ्या असलेल्या तरुणांशी त्यांची ओळख झाली. त्यातील अनेकजण दहा वर्षांनी मोठे, स्वतःची नोकरी सोडून आलेले होते.

त्यातील एकाने शिव खेरा यांचे पुस्तक वाचायला दिल्यावर पीयूष यांना स्वतःतील उद्योजक आणि लिडर सापडला. अनुभवासाठी काहीकाळ नोकरी केल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा निर्णय तेव्हाच झाला होता. 2500 रुपये पगाराच्या दोन नोकर्‍या केल्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.

नोकरी सोडून नाशिकला परतल्यावर नोकरीचा शोध सुरू झाला. पीयूष एका कंपनीत मित्रासह गेले असताना तेथे आलेल्या सात-आठ जणांची त्यांनी माहिती मिळवली. गप्पा सुरू असतानाच कंपनीचे मालक बाहेर आले आणि त्यांनी पीयूष यांच्यातील नेतृत्वगुण हेरले आणि त्यांना आपली कंपनी दाखवली. तिथे असलेल्या सर्वांनाच नोकरी मिळाली होती. ही कंपनी होस्टिंग सपोर्टमध्ये काम करत होती. पीयूष यांनी त्यात प्राविण्य मिळवले.

रोज दहा-बारा तास काम करून दहा महिन्यांत एकाच वेळी दहा प्रकारच्या जबाबदार्‍या पेलल्या. त्यानंतर काही कारणांनी त्यांनी ती कंपनी सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडणे ही साधी गोष्ट नसते. पण मनाचा निर्धार असला की काहीही शक्य होते.

उदा. ते सतत सिगारेट ओढायचे आणि ठरवून ते व्यसन पूर्णपणे सोडले. हे खमक्या मनाचेच लक्षण होते. कंपनीतील सात मित्रांनी एकत्र येऊन नोकरी सोडली आणि सॉफ्टवेअरचा व्यवसाय थाटला. एखादा व्यवसाय थाटणे म्हणजे संसार थाटण्यासारखेच असते. कंपनीचे नाव आम्ही वाळवंटातल्या ओसिसवरून ठेवायचे ठरवले. ओसिस सपोर्ट, असे पीयूष सांगतात.

भारतातले बरेचसे आयटी क्षेत्र परदेशाशी संबंधित आहे. ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील क्लायंटस् या कंपनीला सुरुवातीलाच मिळाले. काही दिवसांनी पीयूष यांच्या मित्रांनी आपापल्या वाटा शोधल्या. आता ओसिस सपोर्टचा डोलारा एकट्यानेच पेलायचा होता.

नंतर 2005 मध्ये पीयूष यांनी इ-टेक सपोर्ट अ‍ॅण्ड डाटा सर्व्हिसेस (इएसडीएस) ही कंपनी स्थापन केली. तेव्हा आठ जणांचा स्टाफ होता. तेव्हा काही कंपन्यांची आऊटसोर्सिंगची कामे घेतली. पण वर्षभरातच 2006 मध्ये त्यांनी इतर कामे कमी करून अमेरिका व इंग्लंडमधल्या तीन कंपन्यांसाठीच काम करायचे ठरवले; पण या निर्णयाचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसला.

याच काळात सर्च इंजिन ऑप्टमायझेशन या विषयावर त्यांनी पीएच.डी केली. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नव्याने काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपण क्लायंटपर्यंत कसे पोहोचणार? त्यासाठी गुगल सर्चमध्ये पहिल्या पानावर यायचे ठरवले. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कंपनी खर्‍या अर्थाने चालू झाली. 2007 पासून कंपनीने जी भरारी घेतली ती आजतागायत. पहिल्या 3 लाख रुपयांच्या पेमेंटने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यातून स्टाफच्या येण्या-जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था झाली.

डेटा सेंटरची कल्पना तेव्हा नवीन होती. 2008 साली ती प्रत्यक्षात आणायचे त्यांनी ठरवले. त्यासाठी सातपूर औद्योगिक क्षेत्रात जागा घेऊन एक तारांकित कंपनी थाटायची असे पीयूष यांचे स्वप्न होते. त्यासाठी एक एकरच्या प्लॉटवर 2010 मध्ये कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले. वास्तूचे डिझाईन करतानाच डाटा सेंटरसाठी वेगळी जागा, उपाहारगृह, खेळण्याच्या सुविधा आणि जलतरण तलाव यांचा समावेश होता.

तसेच वातावरण प्रसन्न राहण्यासाठी वृक्षारोपणही केले गेले. काम करताना कर्मचारीवर्गाला चांगले वातावरण मिळाले तर तो अधिक आत्मियतीने काम करू शकेल, हा विचार त्यामागे होता. काम करत असतानाच त्यांनी ‘क्लाऊड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटचे सर्फिंग चालू राहण्यासाठी साईटची क्षमता वाढवायची, हा त्यामागचा हेतू होता. त्यांच्या या प्रयोगांची ख्याती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली आणि काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्याकडे आले.

‘मुद्रा’ अणि ‘स्टार्ट अप इंडिया’ हे त्या योजनांचे नाव. मुद्राच्या माध्यमातून हजारो लोकांनी व्यवसायासाठी नोंदणी केली आहे. भविष्यात पीयूष यांना आणखी मोठे प्रकल्प राबवायचेत. अनेक ऑफलाईन कामे ऑनलाईन करायची आहेत. भारतातल्या छोट्या छोट्या होस्टिंग कंपन्या ईएसडीएसकडून स्पेस घेतात व ग्राहकांना विकतात. पिझ्झा हट, केएफसी, महिंद्रा हॉलिडेज्, व्ही चॅट, एसर, झी-मीडिया, तसेच अडीचशेच्या आसपास जिल्हा सहकारी बँका यांचे कामकाज याच सर्व्हरवर चालते.

कंपनीचा विस्तार इतका वाढलाय की नाशिक, बंगळुरू, मुंबई, दिल्ली, परदेशातील सुमारे चारशे कुटुंबांचा आता ही कंपनी वटवृक्ष ठरलीय. सध्या भारतातल्या पहिल्या चार कंपनयांमध्ये तिची गणना होतेय. सॉफ्टरवेअर इंजिनिअर असलेल्या त्यांच्या पत्नी कोमल यांनी हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखणारे सॉफ्टवेअर तयार केलेय. सॉफ्टवेअर या एकाच नावाभोवतीचे क्षेत्र त्यांनी कल्पकतेने विस्तारलेय. हे करत असताना नाशिकच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचे मोठे काम पीयूष सोमाणी करत आहेत.

LEAVE A REPLY

*