वुई द ट्रेंडसेटर्स : खाद्यप्रेमींची साधना मिसळ

0
माणसाला जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. नाशिकमधील मिसळप्रेमींना गेली साठ वर्षे खाद्यसेवा देणार्‍या ‘साधना’ चुलीवरच्या मिसळीचा प्रवासही अत्यंत रोचक आणि तितकाच खडतर आहे. एका छोट्या घरातून सुरू झालेला हा प्रवास गंगापूर रस्त्यावर विस्तारलाय. स्वादिष्ट मिसळीबरोबर उत्तम सेवा आणि गावगाड्यातला ‘राजेशाही’ लूक याबरोबरच काँटिनेंटल रेस्तराँला खवय्ये पसंती देत आहेत.
  • राजन आमले, संचालक

आजोबांचा गावोगावी किराणा मालाची बैलगाडीतून विक्री करण्याचा व्यवसाय होता. आजोबा लवकर गेल्यामुळे पासष्ट वर्षांपूर्वी उदरनिर्वाहाची जबाबदारी माझ्या आजीच्या खांद्यावर येऊन पडली. ती घरीच चुलीवर घरगुती पद्धतीने मिसळ करत असे. अप्रतिम चवीची ती मिसळ भिकुसा कारखान्यात आम्ही नेऊन देत असू.

त्याबरोबर चहाही होताच. त्यावेळी माझे वडील साधारण 14 वर्षांचे होते. ते आजीला या सर्व कामात मदत करत. उत्तम दर्जा आणि चवीमुळे भिकुसा कारखान्याने दुसरी शाखा उघडली. तिथे आमच्या व्यवसायाचाही विस्तार झाला. वडील तिथे दोनवेळेला चहा घेऊन चालत जात.

चहाची चव इतकी अप्रतिम होती की चहाच्या वेळेला लोक तिथे येऊन उभे राहत असत. चहाची ख्याती इतकी पसरली की गर्दी वाढायला लागली. भिकुसाच्या मालकांनी वडिलांना त्यांच्या दुसर्‍या शाखेत टेबल दिले आणि तिथे चहा करण्याची परवानगी दिली. तिथेही इतकी गर्दी वाढली की एक जागा भाड्याने घ्यावी लागली. याच 8 बाय 10 च्या जागेत सुमारे 60 वर्षांपूर्वी ‘साधना’ची सुरुवात झाली.

भाऊ मंगेश, मुलगा तेजस यांच्यासह राजन आमले, साधना हे नाव वडिलांनी दिले. कोणतेही काम करताना तन-मन-धन अर्पून त्या कामाशी समरस होणे म्हणजे साधना. कामाचा व्याप वाढत राहिला. मीही वडिलांसारखाच. 14 वर्षांचा असताना मला त्यांच्या मदतीला जावे लागले.

त्यावेळी रात्रशाळेत जाऊन बाहेरून परीक्षा देऊन दहावी झालो; पण कामाचा व्याप इतका वाढला होता की पुढचे शिक्षण घेऊ शकलो नाही. वडिलांनी सुरुवातीची दोन वर्षे मला गल्ल्यावर बसू दिले नाही. झाडू मारणे, फरशी पुसणे, कांदे सोलणे, दुसर्‍या दिवशीची तयारी करून देणे, मोरीवर प्लेट धुणे अशी कामे सांगितली. एका व्यवसायामागे काय काय कष्ट असतात याचे व व्यवस्थापनाचे धडे त्यावेळी मिळाले.

त्यानंतर मी गल्ल्यावर बसू लागलो. सकाळपासून रात्रीपर्यंत काम चालायचे. सुटी नाही, मुलांशी खेळणे, सण साजरे करणे या गोष्टी करता आल्या नाहीत; पण त्याचे फळ आता बहरलेले दिसतेय. जुन्या नाशिकमध्ये बस्तान चांगले बसले होते; पण नेहमी वाटायचे, मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात जिथे सहकुटुंब मिसळ खाण्याचा आनंद ग्राहकांना घेता येईल, गाड्या निर्धास्तपणे लावता येतील, अशा ठिकाणी व्यवसाय न्यायचा.

त्यावेळी नाशिक विस्तारत होते. अनेक उद्योग व्यवसायांनी गाव भागाची वेस ओलांडली होती. माझ्याही डोक्यातअसेच काहीसे स्वप्न होते. गंगापूर रस्त्यावर बारदान फाट्यापाशी सुमारे दहा वर्षांपूर्वी ही जागा घेतली. इथे आल्यावर शंभर नारळ, 30-40 आंबे, दीडशेच्या आसपास सागाची झाडें लावली.

आता ही झाडे मोठी होऊन सर्वांना सावली देत आहेत. इथे सुरुवातीलाच लोकांना गाड्या लावता येतील अशी व्यवस्थाही पाहिली. गेल्या 38 वर्षांपासून मी स्वतः मिसळ तयार करत असे. इथे आल्यावर विचार आला, एखादा माणूस हाताखाली ठेवू आणि दोन-तीन टेबल-खुर्च्यांची सोय करू. रस्ता वर्दळीचा नाही, वाहता नाही, छोटे जंगलच जणू, लोक इथे मिसळ खायला कसे येतील, हा प्रश्न होताच. शहरी लोकांना काय आवडते आणि काय मिळत नाही, याचा विचार करून आजीची चुलीवरची मिसळ ही जुनी संकल्पना पुढं न्यायचे ठरवले.

कारण मधल्या काळात कोळशाच्या शेगड्या, डिझेल भट्ट्या, गॅसपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो होतो. आता परत ‘चुलीवरची मिसळ’ हा ब्रँड तयार करून ते वर्तुळ पूर्ण करायचे ठरवले. त्यावेळी भाऊ मंगेश आणि मुलगा तेजसही मदतीला आले. सुरुवातीला 8 ते 10 दिवस आम्ही बसून होतो. जाहिरातीसाठी वर्तमानपत्रातून पँप्लेट वाटली, चूल इथे तयार केली.

त्यानंतर शनिवारी 15 ते 20 जण आणि रविवारी 25 ते 30 जण इथे मिसळ खाण्यासाठी आले. आमचे गणित जमून आल्याचे अल्पावधीतच पाहायला मिळाले. आधी आलेले खवय्ये परत येणार याची खात्रीच होती; पण ते एकटेच आले नाहीत तर माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून त्यांनी आणखी खवय्यांना ‘साधना मिसळ’चा मार्ग दाखवला. पुढच्या आठवड्यातच ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली.

शनिवार-रविवारच्या वाढत्या ग्राहकांसाठी सुरुवातीला टेबल आणि खुर्च्याही भाड्याने मागवल्या. नंतर वाढणारी संख्या पाहून मिळणारा पैसा आम्ही खवय्यांच्या व्यवस्थेसाठी गुंतवत गेलो. आता इथे खास पुणे, मुंबई, परदेशातून आलेले लोकही आवर्जून मिसळ खाण्यासाठी येतात. शनिवारी-रविवारी तर मोठ्या संख्येने लोक मिसळ खाऊन जातात. सकाळी साडेपाच ते सहाला चूल पेटवण्यापासून सुरुवात होते.

प्रत्येक दिवसाची तयारी एक-दोन दिवस आधीपासूनच केली जाते. मिसळीबरोबर जिलेबी, दही, पापड, सोलकढी, ताक आणि आता चुलीवर आटवलेल्या दुधापासून तयार केलेले पॉटमधले आईस्क्रीमही (चुलीवरचे आईस्क्रीम) आम्ही ग्राहकांच्या मागणीप्रमाणे देतो. शनिवारी-रविवारी एका कढईत मोठ्या प्रमाणावर मिसळ तयार होते. सकाळी 7 ते दुपारी 3 ही खवय्ये व कर्मचारी सर्वांच्याच सोयीची वेळ ठेवली. अर्धा दिवस हॉटेल चालू असले की कर्मचारीवर्ग आनंदाने काम करतो.

पुढचा वेळ त्याला स्वतःसाठी वापरायला मिळतो. तसेच वेळेवर पगार दिला आणि अडीअडचणीला मदत केल्यास लोक सोडून जात नाहीत. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या व्यवस्थापनाचे कोणतेही शिक्षण न घेतलेल्या या कर्मचारी वर्गाला ग्राहकांकडून नम्र आणि तत्पर असल्याचे पारितोषिक मिळालेय. एक कर्मचारी गेली 35 वर्षे आम्हाला जोडलेला आहे.

मला नेहमीच वेगळे प्रयोग करण्याची सवय आहे. त्यातूनच तिनेक वर्षांपूर्वी एक बैलगाडी, घोडा विकत घेतला. घोड्यावरची सैर करून मुले खूष होतील, हाही विचार होता. नंतर एक बैलजोडी मिळाली. मचाण, झोपाळे, सेल्फी पॉईंट, याव्यतिरिक्त बैठकीची जुन्या काळची आठवण देणारी व्यवस्था आम्ही उभी केली. इमू, काश्मिरी बकरी, बदके, पक्षी हेही इथले आकर्षण आहे.

शनिवारी-रविवारी स्टाफव्यतिरिक्त इतर मदतनीस लागतात. विस्तार वाढत गेला तशी आणखी बैठक व्यवस्थेची गरज भासली. तसेच भावाच्या कल्पनेतली रात्रीच्या जेवणाची व्यवस्था सुंदर नवीन बांधलेल्या ‘राजेशाही’ वाड्यात होतेय. लोकांना हवे असलेले पंजाबी, चायनीज, इटालियन शाकाहारी पदार्थ आम्ही इथे खास तिथले शेफ आणून तयार करतो आहोत.

याव्यतिरिक्त ‘राजेशाही’ काँटिनेंटल पदार्थांना खवय्यांचा प्रतिसाद उत्तम आहे. या वाड्यात मंद संगीत, मोहक दिवे, वेगळे आसन, वेगळे पुतळे आपले लक्ष वेधून घेतात. गर्दी वाढत गेली, पैसा हातात येऊ लागला, त्याचा विनियोग आम्ही नवीन सुधारणा, आकर्षक स्थापत्य तयार करण्यासाठी करू लागलो.

अगदी छोट्या घरातल्या चुलीपासून निसर्गरम्य वातावरणातल्या या ‘साधना’ मिसळीचा प्रवास जिद्द, धाडस आणि नवनवीन स्वप्न सत्यात उतरवणारा आहे. म्हणूनच साठ वर्षांच्या प्रवासात तिची चव बदलली नाही की दर्जामध्येही फरक पडला नाही.

उलट इथे येणार्‍यांची गर्दी वाढतेच आहे, ती आपुलकीच्या नात्याने. माणसे जोडणे जास्त महत्त्वाचे असे मला वाटते. मालिकांमधील कलाकारही इथे आवर्जून भेट देतात.

LEAVE A REPLY

*