Type to search

मार्केट बझ

वुई द ट्रेंडसेटर्स : पर्यटनाचा सुखद झुला- ‘सुला’

Share
सुला व्हिनेयार्ड.. नाशिकच्या पर्यटन विश्वाचा मानबिंदू ठरलाय. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा, संशोधनाचा आणि उत्कंठतेचा अविभाज्य भाग बनलेल्या सुला वाईन्सची उत्पादने जगभरातील 30 देशांमध्ये उपलब्ध आहेत. राजीव सामंत यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या सुलाने जागतिक बाजारपेठेला अनुसरून वाईनचा राखलेला दर्जा इथल्या प्रत्यक्ष भेटीत सारे काही सांगून जातो. सुलाच्या तब्बल 28 उत्पादनांना प्रतिष्ठित पुरस्कारांचे लाभलेले कोंदण हा खरा इथला ‘युएसपी’. दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या सुला फेस्टमुळे सुलाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झालीय. म्युझिक, वाईन, फूड, ड्रिंक्स, फॅशन, शॉपिंग आदी बाबींचा तो मनोहारी संगम असतो..

राजीव सामंत, संचालक

सुला वाईन्स.. नाशिकच्या बदलत्या स्वरुपाचे, बदलत्या जीवनशैलीचे मूर्तिमंंत उदाहरण. गंगापूर धरणाच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी उभारलेला हा प्रकल्प मायानगरीप्रमाणे भासतो. हा मनोहारी प्रकल्प उभारणीमागील ‘ड्रायव्हिंग फोर्स’ आहे तो राजीव सामंत या कल्पक व दूरदृष्टी लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाचा. 1990 च्या दशकात स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन आणि तद्नंतर कॅलिफोर्नियात ओरॅकलमध्ये कार्यरत राहून भारतात परतलेल्या सामंत यांना वाईन ही संकल्पना फार अपरिचित नव्हती.

1994 मध्ये आपल्या परिवाराच्या मालकीच्या नाशिकमधील मालमत्ता बघण्यासाठी आलेल्या राजीव सामंत यांना इकडे अमाप स्वरुपात पिकत असलेल्या द्राक्षांनी आकर्षित केले. या भागात वाईनसाठी लागणार्‍या द्राक्षांचे उत्पादन घेण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. या कल्पनेची लिटमस चाचणी म्हणून सामंत यांनी कॅलिफोर्नियातील त्यांचे मित्र तथा गुरू कॅरी डॅमस्की यांच्या वायनरी प्रकल्पात त्यांनी तीन महिने अभ्यास केला.

वाईन उत्पादन पद्धतीतील अभ्यासांती त्यांना जगभरातील वाईन विश्वाची बर्‍यापैकी माहिती मिळाली आणि इथेच ‘सुला’च्या पायाभरणीचा विचार त्यांनी पक्का केला. सुला नाशकात का स्थापन करावी, या विचाराला सामंत यांच्या शास्त्रोक्त अभ्यासाची जोड होती. नाशिक जिल्ह्यातील जमीन बेसॉल्ट, रेड लॅटेराईट व मोठ्या प्रमाणावर गाळयुक्त असणे द्राक्षाला पोषक असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला.

डोंगरमाथा अथवा नदीजवळ व्हिनेयार्ड असण्यासारखा दुसरा योग नाही, याबाबतदेखील ते सकारात्मक राहिले. त्यासाठी दिंडोरी योग्य ठिकाण आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील थंड वातावरण द्राक्षातील अ‍ॅसिडवृद्धीसाठी पोषक असल्याचे तसेच ऊबदार दिवसात द्राक्षे योग्य प्रमाणात पिकतात आणि प्रीमियम वाईन द्राक्षांची निर्मिती मुबलक प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या अभ्यासांती निदर्शनास आले. 1998 मध्ये राजीव सामंत यांनी नाशिक व्हॅलीत कॅलिफोर्नियाचे बेस्ट वाईनमेकर कॅरी डॅमस्की यांच्या मार्गदर्शनातून सुला वायनरीचा पहिला प्रकल्प उभारला.

2000 मध्ये सॉविग्नॉन ब्लँक आणि चेविग्निन ब्लँक ही उत्पादने वाईनप्रेमींसाठी सादर करण्यात आली. अशा प्रकारे देशातील 80 टक्के वाईन उत्पादन घेण्याचा आणि पर्यायाने ‘वाईन कॅपिटल’चा दर्जा मिळण्याचा मान आज नाशिकला मिळालाय, त्यामागे राजीव सामंत यांची दूरदृष्टी निर्णायकी ठरली. सामंत यांचे अनुकरण त्यानंतर अनेकांनी केले. आज सुला देशातील प्रथम क्रमांकाचा दर्जा असलेली वायनरी ठरली आहे. राजीव सामंत यांच्या बरोबरीने करण वासानी (उपाध्यक्ष) हे सुलाची धुरा सांभाळत आहेत. जगभरातील बाजारपेठेला अनुसरून उत्पादने घेणे, त्यामध्ये बदल करणे आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणे ही त्रिसूत्री सुलाने प्रथमपासूनच अवलंबली आहे.

त्याचाच परिपाक म्हणजे आज सुलाच्या 28 ब्रॅण्डना प्रतिष्ठित पुरस्कारांचे कोंदण लाभले आहे. वाईनसंदर्भात जनजागृती घडावी आणि वाईन पर्यटनवृद्धी व्हावी यास्तव सुलाने केलेले प्रयत्न वायनरी विश्वात ज्ञात आहेत. आज सुला व्हिनेयार्डस् जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. या प्रकल्पाला भेट देणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोणत्याही वयातील, कोणत्याही स्तरावरील व्यक्तीला एका आगळ्या पर्यटनाचा आनंद इथे उपभोगता येतो.

इथले ताजे, ऑरगॅनिक व शुध्द स्वरुपातील भोजनदेखील पर्यटकांच्या आवडीचा भाग ठरतो. त्यासाठी लिटील इटाली व रासा हे दोन रेस्टॉरंटस् सेवेत दाखल आहेत. सुलाचे दोन रिसॉर्टस्देखील अस्तित्वात आहेत. सुलाचे टूर आणि टेस्टिंग वाईन मेकिंग प्रक्रियेतील अस्खलीतपणा अधोरेखित करतात. व्हिनेयार्डमधील सफरीनंतर पर्यटकांना टेस्टिंग रूममध्ये गंगापूर धरणाचा विलोभनीय परिसर पाहण्याच्या सुविधेसह एक अथवा दोन ग्लास वाईन चाखायला दिली जाते. कॅलिफोर्नियन वायनरीजच्या धर्तीवर इथल्या टेस्टिंग रूममध्ये जवळपास सर्वच वाईनचे नमुने बघायला व चाखायला मिळतात.

अ‍ॅट बियाँड आणि सोक हे सुलाचे दोन रिसॉर्टस्ही नैसर्गिकता व अत्याधुनिकता यांचा अनोखा संगम आहे.
‘सुला फेस्ट’ हा पर्यटन महोत्सव जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतो. दरवर्षी बड्या कलाकार सेलिब्रिटीला निमंत्रित करून हा तीन दिवसीय महोत्सव मनोरंजन, संगीत आणि मौजमजेच्या शिखरस्थानी नेणारा असतो. सुलानजीक 1.5 एकरावर उभारलेल्या ग्रीक स्टाईलच्या विलोभनीय अ‍ॅम्पी थिएटरमध्ये हा सोहळा दरवर्षी रंगतो.

अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तयार केलेल्या लॅण्डस्केप्ड लॉनवर बसून जगभरातून आलेले हजारो पर्यटक सुला फेस्टचा आनंद लुटतात. 2008 मध्ये तीनशे संगीतप्रेमींच्या साक्षीने सुरू झालेला हा फेस्ट 2018 च्या मैफलीप्रसंगी 13,000 पर्यटकांना आकर्षित करण्याइतपत लोकप्रिय झाला. म्युझिक, वाईन, फूड, ड्रिंक्स, फॅशन, शॉपिंग यासह इतर अनेक बाबींचा संगम यावेळी अनुभवता येतो. सुलाची उत्पादने आज जगभरातील तीस देशांमध्ये उपलब्ध आहेत.

सुला उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यास्तव अनेक ख्यातकीर्त वितरकांसोबत करार करण्यात आले आहेत. व्यावसायिक समीकरणे यशस्वीपणे साधणार्‍या सुलाला सामाजिक बांधिलकीचेही पुरेपूर भान आहे. सांघिक सामाजिक जबाबदारी तथा ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत सुला प्रकल्प परिसरातील लोकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यामधून या लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्राथमिक उद्देश असतो.

सामाजिक पायाभूत सुविधांची उभारणी, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, उच्च जीवनमान मूल्ये आदी सुलाच्या उपक्रम सूचीत अंतर्भूत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून आजवर हजारो जणांना लाभ झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पाची लोकप्रियता व दरवर्षी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुला लवकरच विस्तारित होणार असल्याचे सांगण्यात येते. टेस्टिंग रूमचा आकारही वाढवण्यात येणार आहे. टेस्टिंग सेलारचे बांधकाम त्याच अनुषंगाने सुरू आहे. 2019 चा सुला फेस्ट भव्यदिव्य प्रमाणात आयोजित करण्याचीही योजना आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!