Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : सायकलीस्टचा नाशिक पॅटर्न

Share
पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलणे सर्वांना शक्य आहे. सायकलचा वापर हा यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय सायकलिंगमुळे स्वत:चे आरोग्य निरोगी राहाते. फिटनेस व पर्यावरण संरक्षणाचा मंत्र म्हणून नाशिकमध्ये सायकलिस्ट चळवळ उभी राहावी म्हणून केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. हेच आमच्या सायकलिस्ट चळवळीचे यश आहे.
  • हरिष बैजल, संस्थापक नाशिक सायकलिस्ट असो.

नाशिकमध्ये पोस्टिंग असताना 2012 मध्ये नाशिक महानगरात सायकालिंगची चळवळ उभारण्याची कल्पना माझ्या मनात आली. फिटनेस आणि पर्यावरण संरक्षणाचा मंत्र असलेली साायलिंग आवड असल्याने आपण स्वत:च प्रथम सायकलवरून पंढरपूर वारी केली. तीन दिवसाच्या सायकल प्रवासात खर्‍या अर्थाने माझा आत्मविश्वास वाढला.

यात 375 कि. मी. इतके अंतर पूर्ण केल्यानंतर थकवा, आजारपण येऊ शकते, असा असलेला गैरसमज दूर झाला. या मोठ्या अंतराच्या पहिल्या सायकलिंग प्रवासातून बरेच काही शिकायला मिळाले अन् व्यक्तीश: आत्मविश्वास वाढला. आपण केलेल्या धाडसातून फिटनेस व पर्यावरण संरक्षण असे झालेले दुहेरी फायदे सर्वांना मिळावे असे वाटू लागले. म्हणूनच हा मोठा अनुभव आपल्या सहकार्‍यांकडे कथन केला.

सायकलिंग चळवळीतून नाशिक शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होऊन पर्यावरण रक्षणाचे काम होईल. याशिवाय स्वत: निरोगी राहता येईल, असे माझे म्हणणे माझ्या सहकार्‍यांना पटले. सायकल चळवळीची चर्चा प्रथम सरकारी ‘सह्याद्री’ बंगल्यात झाली. या ठिकाणी सुरुवातीला स्व. हर्षद पूर्णपात्रे, शैलेश राजहंस, विशाल उगले, संदीप जाधव, विजय पाटील, दत्तू आंधळे, योगेश शिंदे,

रत्नकार आहेर, वैभव शेटे, नाना फड यांच्यासोबत बैठका झाल्या. यात ही चळवळ शहरातील नागरिकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल यावर चर्चा झाली. संघटना, संस्था म्हटली की त्यासाठी घटना असावी, यावर खल होऊन याकरिता चर्चेनंतर घटना बनवण्यात आली. नंतर संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यातील सायकल चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम झाले.

फिटनेस व पर्यायरण संरक्षणाबरोबरच नाशिक शहरातील वाहतूक समस्येवर पर्याय म्हणून यास लोकांना जोडून घेण्यासाठी सहकार्‍यांमार्फत प्रयत्न सुरू झाले. यासंदर्भात जनजागृती म्हणून शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन यात सहभागी होण्यासंबंधी आवाहन करण्यात आले. त्यानंतर ही चळवळ काही उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ओझर, गिरणारे अशा सायकल रॅली काढल्या. नंतर हे अंतर वाढवत कसारा घाटातील घाटनदेवी, सप्तशृंगी गड या ठिकाणी नवरात्रोत्सवात देवी सायकल यात्रा काढल्या. याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत गेल्यामुळे नागरिक आमच्या संस्थेला जोडले गेले. अशा उपक्रमामुळे ही चळवळ खर्‍या अर्थाने नाशिककरांपर्यंत पोहोचली.


ही चळवळ वाढत गेल्यानंतर आम्ही पहिला पंढरपूर वारीचा मोठा उपक्रम हाती घेतला होता. आईला श्रद्धांजली म्हणून देवस्थानाला भेट द्यावी, असा विचार डोक्यात आला. परंतु देवाला जायचे तर यातून समाजाला काहीतरी संदेश द्यावा व याचा उपयोग समाजाला व्हावा, असा विचार आला. म्हणून वाहनाने जाण्याचे टाळत आपण सायकल वारी करण्याचा संकल्प केला. माझी उंची जास्त असल्याने प्रथम सायकल शोधण्यात वेळ गेला. पुण्याचे उल्हास जोशी यांच्या सायकल मॉलमध्ये अखेर सायकल मिळाली. बियांकी ही इटालियन सायकल आपण घेतली. हीच सायकल खर्‍या अर्थाने मला भाग्याची ठरली.

याच सायकलवरून पहिली पंढरपूर वारी आपण यशस्वीपणे पूर्ण केली. सहकार्‍यांमुळे आत्मविश्वास वाढला आणि आमच्या चळवळीला खर्‍या अर्थाने बळ मिळाले. सन 2012 च्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीत आम्ही मोजके सहकारी गेलो. यात पंक्चर काढण्याची जबाबदारी हर्षद पूर्णपात्रे यांच्याकडे होती. नंतर सन 2013 मध्ये पंढरपूर सायकल वारीत आम्ही 13 जण होतो. सन 2014 मध्ये ही संख्या 74 पर्यंत गेली. ही चळवळ वाढवण्यासाठी विशेषत: विशाल उगले व स्व. जसपाल बिर्दी यांनी विशेष काम केले. यंदा तर पंढरपूर सायकल वारीत विक्रमी असे 548 सायकलपटू सहभागी झाले होते.

याचदरम्यान आमचे सहकारी शैलेश राजहंस यांच्या संकल्पनेतून 150 कि. मी. पेलेटॉन ही स्पर्धा सन 2013 मध्ये पहिल्यांदा नाशिक सायलिस्ट फांऊडेशनने घेतली. यात सायकलपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी 5 लाखांपेक्षा जास्त बक्षिसे वाटण्यात आली. आज या स्पर्धेचे स्वरूप वाढत गेल्याने बक्षिसांची रक्कम 13 लाखांपर्यंत गेली आहे. प्रत्येक स्पर्धेत आता 500 ते 700 सायकलिस्ट सहभागी होत असून या स्पर्धेला भव्य स्वरूप आले आहे. भारतीय पोलीस सेवेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण सन 2014 मध्ये दिल्ली, मुंबई व कन्याकुमारी अशी सायकलिंग केली. दिल्लीतील इंडिया गेटपासून सुरू केलेला मुंबईतील गेटवे ऑफ इंडयापर्यंतचा 1200 कि. मी. प्रवास 11 दिवसांत पूर्ण केला. नंतर मुंबई ते कन्याकुमारी असा 1700 कि. मी. प्रवास नऊ दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात आपल्यासोबत स्व. हर्षद पूर्णपात्रे होते.

नाशिक शहरात सायकलचा वापर ऑफिसला जाण्यासाठी करावा म्हणून आमच्या टीम विशेष प्रयत्न करीत आहेत. सायकलिंग हा केवळ छंद म्हणून न राहता ती सवय होऊन नागरिकांनी आपला फिटनेस कायम ठेवताना पर्यावरण संरक्षणासाठी योगदान द्यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक शहरातही सायकल चळवळ वाढीसाठी महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात मोठे सहकार्य मिळाले. तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक यांनी सायकल ट्रॅक उभारणीसाठी मोठा पाठिंबा दिला.

तत्कालीन स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सायकल ट्रॅकसाठी ठराव करून शहरात सिटी सेंटर मॉलच्या मागील भागात 2.5 एकर जागाही दिली. परंतु स्थानिक लोकांनी गोंगट होेईल म्हणून सायकल ट्रॅकला विरोध केला. नाशिककरांचा या चळवळीला मोठा पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच नाशिक शहराच्या नवीन विकास आराखड्यात सायकल ट्रॅकसाठी जागा ठेवण्यात आल्याने हे सायकल चळवळीचे एक मोठे यश आहे.

त्याचबरोबर आता स्मार्ट सिटी प्रकल्पात परदेशातील अत्याधुनिक शहराप्रमाणे नाशिकला सायकल शेअरींग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याकरिता खास सायकल ट्रॅकदेखील आराखड्यात नियोजित करण्यात आलेले आहे. प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकलवर भर देण्याच्या दृष्टीने महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू झालेल्या प्रयत्नांमुळे आमच्या सायकल चळवळीला बळ मिळाले आहे. यामुळे भविष्यात ही चळवळ वाढवण्यासाठी विशेषत: युवकांनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकरिता शहरातील सर्वच महाविद्यालयांत जाऊन सायकल चळवळ रुजवण्याचे काम सुरू केले आहे. आता शहरात अडीच हजार मेंबर सायकल वापरत आहेत.

फाऊंडेशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण खाबिया यांच्या टीमने सायकल चळवळ जिल्ह्यात वाढवण्यसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यांनी केलेल्या प्रचार-प्रसारामुळे ओझर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सिन्नर, पिंपळगाव या ठिकाणी फाऊंडेशनच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. या चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून सन 2014 मध्ये पत्नी छाया हीस प्रथम तयार केले. त्यानंतर डॉ. मनीषा रौंदळ तयार झाल्या. डॉ. रौंदळ यांनी याचा मोठा प्रचार केल्यानंतर नुकत्याच झालेल्या पंढरपूर सायलक वारीत तब्बल 60 महिला सहभागी झाल्या. तसेच 35 मुलेदेखील वारीत सहभागी झाले. हे आमचे मोठे यश आहे. सायकल चळवळ वाढीसाठी ‘करून तर बघा’ केल्याशिवाय, अनुभवाशिवाय समजणार नाही, असे आवाहन आमच्या फाऊंडेशनचे आहे. राष्ट्रबांधणीसाठी तुमचा सहभाग लाख मोलाचा ठरावा, अशी अपेक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!