Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : १२० वर्षांचा सोबती ‘सपट’

Share
‘उद्योगात वसते लक्ष्मी’ असे संस्कृत वचन आहे. याची प्रचिती नाशिकमधील सपट उद्योजक परिवाराने गेल्या 120 वर्षांपासून दर्जा, विश्वास आणि परंपरा या त्रिसूत्रीच्या बळावर करून दिली आहे. ‘सपट परिवार चहा’, ‘सपट मलम’, ‘सपट लोशन’ हे नाव आज ग्रामीण महाराष्ट्रातील घराघरांत जनजीवनावर कोरण्यात सपट उद्योग यशस्वी झाला आहे. पूर्वजांनी घालून दिलेली मूल्ये, उद्योजकतेचा दृष्टिकोन आणि विश्वास यांच्या बळावरच हा अविश्वसनीय प्रवास पुढच्या दिशेने निघाला आहे..

डॉ. निखिल जोशी, अनिश जोशी, संचालक

देशात पिढ्यान् पिढ्या व्यापार-उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज अशा परिवारांची आपल्याला माहिती असते. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच एक कौतुकाची आणि प्रेम, विश्वासाची भावना असते. कारण असंख्य अडचणींचा सामना करत उद्योग व्यवसाय क्षेत्रात काम करताना परिवारातील तिसर्‍या पिढीकडे आपली तत्त्वे, निष्ठा आणि सेवा देण्याची परंपरा सुपूर्द करताना लोकांच्या मनात या परिवाराने कायमचे स्थान मिळवले आहे, हेच अधोरेखित होत असते.

‘उद्योगात वसते लक्ष्मी’ असे संस्कृत वचन आहे. याची प्रचिती नाशिकमधील एका उद्योजक परिवाराने गेल्या 120 वर्षांपासून दर्जा, विश्वास आणि परंपरा या त्रिसूत्रीच्या बळावर करून दिली आहे. ‘सपट परिवार चहा’, ‘सपट मलम’, ‘सपट लोशन’ हे नाव आज ग्रामीण महाराष्ट्रातील घराघरांत जनजीवनावर कोरण्यात यशस्वी झालेल्या उद्योजक परिवाराचे प्रमुख म्हणून सपट परिवाराचे डॉ. निखिल जोशी यांची मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. सपट परिवाराच्या 120 वर्षांच्या या उद्योग जगताच्या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘पूर्वजांनी घालून दिलेली मूल्ये, उद्योजकतेचा दृष्टिकोन आणि विश्वास यांच्या बळावरच हा 120 वर्षांचा अविश्वसनीय प्रवास आणखी पुढच्या विकासाच्या दिशेने निघाला आहे.’

120 वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या काळात नाशिकसारख्या फारशा विकसित न झालेल्या गाव वजा शहरात चहाच्या सुट्या बुक्कीचा व्यवसाय निखिल यांचे आजोबा कै. रमाशंकर हरिभाई जोशी यांनी सुरू केला. ज्या काळात परंपरागत ग्रामीण किंवा शहरी जीवनात चहा पिण्याची फारशी प्रथा नव्हती त्या काळात चहाच्या बुक्कीचे दुकान सुरू करणे हे व्यावसायिकदृष्ट्या धाडसाचे काम होते. पण लोकांचे प्रेम आणि विश्वास आपल्या उद्योजकतेच्या मूल्य आणि निष्ठा यांच्या बळावर यश संपादन करत ‘सपट परिवार चहा’ हा ब्रँड आज देशातील नावाजलेल्या पहिल्या दहामध्ये विराजमान झाला आहे. या 120 वर्षांच्या उद्योजकतेच्या प्रवासात असंख्य चढ-उतार आले.

त्याची तपशीलवार माहिती या ठिकाणी मांडणे कठीण आहे. मात्र या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती देताना डॉ. निखिल म्हणाले, ‘त्यांचे आजोबा रमाशंकरजी यांनी 1897 मध्ये उद्योगाची सुरुवात करताना दैनंदिन जीवनात उपयोगात येणार्‍या अ‍ॅन्टीफंगल क्रिमची म्हणजेच ग्राम्य भाषेत शरीराला होणार्‍या ‘खाज खुजली’वरील लोशन मलम यांच्या निर्मितीला सुरुवात केली. फार्मास्युटिकल्सच्या उद्योगात ‘सपट मलम’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उद्योगाच्या बरोबरीने नंतर 1910 मध्ये चहाच्या निर्यातीच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.’ आज चहा आणि औषधनिर्मितीसोबतच रिटेल आणि रियल इस्टेट या व्यवसायातही सपट परिवाराने यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. याशिवाय शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातही त्यांनी आपल्या सेवा रुजू केल्या आहेत.

डॉ. निखिल म्हणाले, 1910 मध्ये मध्य आखाती देश आणि इराकमध्ये चहाच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असलेल्या उद्योगाने ग्रामीण भागातील स्थानिक बाजारातही आपल्या चहाचा व्यापार सुरू केला. ज्यावेळी चहा पिणे ही लोकांची फारशी प्रथा नव्हती. ग्रामीण जीवनात तर अशा पद्धतीचा व्यवसाय करणे धाडसाचे होते त्या काळात ही सुरुवात आजोबा रमाशंकरजी यांनी केली. त्यानंतर 1940 च्या सुमारास सपट फार्मास्युटिकल्सचादेखील विस्तार त्यांनी केला.

त्यानंतर 1960 ते 80 च्यादरम्यान डॉ. निखिल यांच्या वडिलांनी म्हणजे दुसर्‍या पिढीने या व्यवसायाला हातभार लावताना विस्तार आणि नवी दिशा देण्याचे काम केले. त्यामध्ये राज्यभरातील गावागावांत सपट चहाच्या विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यामुळेच लोकांच्या जीवनात ‘सकाळचा चहा’ हा अविभाज्य घटक म्हणून स्थान मिळवण्यात परिवाराच्या दुसर्‍या पिढीतील मेहनत आणि सेवाव्रती कार्याचे मोलाचे योगदान आहे.

1990 च्या सुमारास सपट परिवार चहाच्या व्यावसायिक विस्तार व्यवस्थेला ‘सीए’ म्हणजे ‘कम्युनिकेशन एजंट’ च्या अभिनव संकल्पनेतून ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरांत ‘रामाच्या पारी’ चहाच्या माध्यमातून पोहोचवण्यात उद्योगाने नवा इतिहास स्थापन केला. त्यातूनच चहा विक्रीच्या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ‘सपट परिवार’चेे नाव गावोगाव पोहोचले. राज्यभरात फ्रेेंच्याइजीच्या जाळ्यातून सपट चहा पोहोचवताना त्यात वेगवेगळ्या ब्लेंडचा ‘नवा बदल’ करत सपट चहाने आपल्या ग्राहकांना नेहमी काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. सपट ‘चाय टाईम’ हा त्यातील असाच एक ब्लेंड महाराष्ट्राप्रमाणेच बाजूच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यातील चहाप्रेमींचा आवडता झाला आणि लवकरच देशभरातील चहाप्रेमींच्या जिभेवर ‘सपट’ परिवाराची चव आणि नाव रुळू लागले.

हे सारे करताना वर्तमानपत्रातील किंवा दृकश्राव्य माध्यमातील जाहिरातींचादेखील मोठा वाटा आहे हे सपटच्या धोरणकत्यार्र्ंनी वेळीच जाणले होते. त्यामुळेच ग्रामीण जीवनावर ज्यांच्या अभिनयाचे गारूड आहे अशा निळू फुले यांच्या कडक चहाचा आस्वाद घेतानाच्या मुद्रा जाहिरातीत झळकावून ग्रामीण मनात ठसवण्याचे काम ‘सपट परिवार चहा’ने केले. तीच परंपरा राखत नंतर अशोक सराफ, किंवा सोनाली कुलकर्णी आणि अशा दिग्गज नामवंतांच्या चेहर्‍यासोबत सपट परिवाराचे नाव सर्वदूर पोहोचवण्यात ‘परिवारा’ला यश आले. 2003 च्या सुमारास प्रीमियम डस्ट चहाच्या क्षेत्रात ‘सह्याद्री’ हा आणखी नवा ब्रँण्डदेखील सुरू करण्यात आला.

आज चहाविक्री व्यवसायात देशातील शंभर कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठताना सपट परिवारमधील तिसरी पिढी कार्यरत आहे. औषध निर्मितीच्या क्षेत्राचा विस्तार करताना सपट मलम आणि लोशन या अ‍ॅन्टी फंगल ऑईनमेंटनंतर कफ सिरप आणि पर्सनल केअर श्रेणीतील उत्पादने तयार करण्यातदेखील उद्योगाने पावले टाकली आणि आपल्या अपार मेहनत आणि विश्वासाच्या बळावर यश संपादन केले. उद्योजकतेच्या क्षेत्रात अशा प्रकारच्या नव्या संकल्पना घेऊन त्या यशस्वी करताना समाजाच्या बांधिलकीचा विसरही ‘सपट परिवारा’ने कधी होऊ दिला नाही.

त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर आणि परिसरातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम परिवाराने परंपरेने केले आहे. याशिवाय शिक्षणाच्या क्षेत्रात पुण्याच्या गोखले एज्युकेशन संस्थेसोबत आर. एच. फाऊंडेशन ही संस्था 1918 पासून काम करत आहे. दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी गोखले शिक्षण संस्थेच्या कार्याचा विस्तार नाशिक आणि परिसरात करण्यात परिवाराने त्यामुळेच मोलाचे योगदान दिले आहे. कला आणि विज्ञान कनिष्ठ माहविद्यालयापासून अगदी अभियांत्रिकीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करण्यात संस्थेने पुढाकार घेतला आहे.

2015 मध्ये गायनाच्या क्षेत्रातील ‘टॅलंट हंट’ सारखा उपक्रम घेण्यातदेखील याच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ‘सपट उद्योगाने’ पुढाकार घेतला होता. या सार्‍या 120 वर्षांच्या सेवाव्रती उद्योजकता आणि मूल्य जोपासनेच्या प्रवासाबद्दल सपट परिवाराचे अध्वर्यू डॉ. निखिल जोशी यांच्या मनात आजही कृतज्ञतेच्या भावना आहेत. त्याबद्दल सांगताना डॉ. निखिल म्हणतात, ‘हे जे काही यशाचे दिवस उत्तरोत्तर आम्ही पाहिले त्यामागे आमच्या पूर्वजांची अपार मेहनत, सर्वांना विश्वासाने सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आणि मूल्यांवरील श्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच आम्ही नव्या यशाच्या कमानी पार करून जाऊ, हा विश्वास त्यामुळेच आम्हाला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!