Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार

Share
भारतासह जगातील 35 देशांमध्ये गुणवत्ता, सेवेच्या जोरावर नावलौकिक संपादन केलेल्या मालेगाव येथील एम.बी. शुगर अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स या औषधी साखरनिर्मिती प्रकल्पाची वाटचाल प्रेरणादायी ठरावी अशीच. जातीय दंगलींनी बदनाम झालेल्या मालेगाव शहराचा कलंक पुसण्याचे काम खर्‍या अर्थाने केले ते उद्योग क्षेत्राने. रंगीन साडी, यंत्रमाग उद्योगाबरोबर एम.बी. केमिकल्स यांनी. उत्तम गुणवत्ता व विनम्र सेवा यामुळे उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कार या उद्योग समूहास मिळाले आहेत. देश-विदेशात शहराचा नावलौकिक वाढवण्यासह सुमारे साडेचारशे ते पाचशे जणांना स्थिर रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. एम.बी. केमिकल्स मालेगावच नव्हे तर जिल्ह्याचे भूषण ठरले आहे.

अनिल लोढा, संचालक

भागचंद लोढा हे नाव मालेगाव पंचक्रोशीतील उद्योग क्षेत्रात विशेषत: औद्योगिक क्षेत्रात वर्षानुवर्षे आजतागायत अग्रेसर राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर विजयकुमार, अनिलकुमार व दिनेशकुमार हे तिघे पुत्र या उद्योगाच्या भरभराटीसाठी परिश्रम घेत आहेत. एम.बी. शुगर अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्सची वाटचाल जिद्द व चिकाटीच्या मानसिकतेतून सुरू झाली. उद्योग, व्यवसाय असो की शिक्षण यश संपादन करण्यासाठी परिश्रम करण्याची मानसिकता व यश संपादन करण्याची जिद्द नसेल तर तुम्ही या तिन्ही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही हे एम.बी. केमिकल्सच्या आजपर्यंतच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला असता दिसून येते.

उद्योग-व्यवसाय यशस्वीतेसाठी कठोर परिश्रमाबरोबरच जिद्द महत्त्वाची असून तुमच्या उत्पादित मालाची गुणवत्ता कायम राखण्याचे आव्हान तुम्हाला स्वीकारावे लागते. हे शक्य झाल्यास तुमची घोडदौड कुणी थांबवू शकत नाही. एम.बी. केमिकल्सचे साडेतीन दशकापुर्वी जिद्द व परिश्रमाच्या चिकाटीतून लावलेले लहानसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. भारतासह जगातील 35 देशांत एम.बी.ची फार्मा शुगर पोहोचत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या उद्योगात नावीन्य आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहेे.

पन्नालाल नारायणदास फर्ममध्ये मोतीलालजी व त्यांचे पुत्र भागचंदजी हे नोकरी करत. ट्रेडिंग व्यवसायांतर्गत रावळगावची हुंडी घेत असल्यामुळे त्यांची ओळख रावळगाव साखर कारखान्याचे मालक स्व. वालचंदशेठ यांच्याशी झाली. उद्योगाबरोबर जागा घेण्यासाठी मोतीलालजी व भागचंदजी करत असलेल्या मदतीमुळे वालचंदशेठ खूष झाले व त्यांनी मोतीलालजींसमोर रावळगावमध्ये नोकरीचा प्रस्ताव ठेवला.

मात्र मी तुमच्याबरोबर व्यवसाय करू इच्छितो असे त्यांनी सांगितल्याने वालचंदजी खूष झाले व रावळगाव बॉयलरला लाकडे पुरवणे, ऊस लागवड कर्ज शेतकर्‍यांना वाटप, ऊस तपासणी आदी कामांची जबाबदारी सोपवली. रासायनिक खते, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, आडत आदी व्यवसाय यामुळे लोढांचे सुरू झाले. मोतीलाल गिरधारीलाल आघारकर फर्मद्वारे साखर, खडीसाखरेची व नंतर गोळ्या-चॉकलेटची विक्री संपूर्ण देशात होऊ लागली. भागचंदजींबरोबर विजयकुमार या व्यवसायात पूर्णत: निष्णात झाले होते. त्यामुळे 1975 पासून मुंबईत स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांना पी.जी. शुगरचा पुरवठा सुरू केला गेला. व्यवसायातील अनुभव, वालचंद ग्रुपशी झालेल्या संबंधामुळे ग्राहकांचा संपादन केलेला विश्वास यामुळे विजयकुमार यांनी लोढा उद्योगाचे नाव सर्वदूर पसरवले.

आपण औषधी साखर का निर्माण करू शकत नाही? या भावनेतून विजयकुमार लोढा यांनी संपूर्ण देशात फिरून मार्केटवर लोढा उद्योगाचे अस्तित्व निर्माण केले. त्या काळात दौराला शुगर्स वर्क्स दिल्लीचा दबदबा होता. असे असताना देखील विजयकुमार लोढा डगमगले नाही. त्यांनी श्रीरामपूर येथील महाराष्ट्र शुगर मिल्सशी संपर्क साधत रिफायनरी साखरेचे वाटप औषधी कंपन्यांना सुरू केले. लेव्ही शुगर्स शासनाने बंद केल्याने मार्केट ओपन झाले. त्यामुळे स्वत:च फार्मा शुगरची निर्मिती करण्याचा निर्णय विजयकुमार यांनी घेतला. मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या अनिलकुमार, केमिकल्स इंजिनिअर दिनेशकुमार लोढा यांच्याशी चर्चा केली व पुणे येथे तिघा भावंडांनी एम.बी. शुगरचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. जे उत्पादन आपण विकू शकतो ते स्वत:देखील उत्पादित करू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वात होता. त्यामुळे 1991 मध्ये एम.बी. शुगरची मुहूर्तमेढ रोवली जाऊन खडीसाखरेचे उत्पादन सुरू झाले.

संपूर्ण देशात उत्पादन पोहोचवण्यासाठी मार्केटिंग केलेच व एम.बी.ए. पदवीप्राप्त तरुणांना मार्केटिंगची जबाबदारी सोपवली. फाईव्ह स्टारसह इतर हॉटेल व्यावसायिकांना शुगर क्यूबचा पुरवठा सुरू झाला. तिरुपतीसह अनेक देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून एम.बी. शुगरची खडीसाखर पोहोचली. 1998 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे टेंडर एम.बी. शुगरला मिळाल्याने देशाबरोबर विदेशात एम.बी. शुगर पोहोचली. एम.बी. केमिकल्सचे देशातील 250 वितरक या उद्योगाच्या विस्ताराची साक्ष देत आहेत.

1997 च्या दरम्यान फार्मा शुगरची निर्मिती एम.बी. केमिकल्सतर्फे सुरू करण्यात आली. इंडियन एअरलाईन्सचे टेंडर मिळाल्याने दौराला शुगर्ससारख्या अनेक मातब्बर कंपन्यांमध्ये अस्वस्थता पसरली. एम.बी. केमिकल्सची फॅक्टरी नाही अशा तक्रारी केल्या गेल्या. एअरलाईन्सचे विशेष पथक पाहणीसाठी मालेगावी आले व फॅक्टरी पाहून खूष झाले. अमेरिकेच्या डीएमएफ ड्रग्स रजिस्टरमध्ये नोंद एम.बी. शुगरची झाली आहे. यावरून एम.बी. शुगरच्या गुणवत्तेची कल्पना यावी. भारत सरकारतर्फे 2009 मध्ये उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचा एम.एल. डहाणूकर उद्योजक पुरस्कार एम.बी. शुगरला मिळाला आहे.

या उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार लोढा यांचे शिक्षण बी.कॉम. परंतु 1977 मध्ये वडिलोपार्जित व्यवसाय करताना त्यांनी आपल्या हाताखाली किमान चार-पाचशे माणसांनी काम करावे हे स्वप्न पाहिले होते. जिद्द व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले. अनिलकुमार लोढा हे मॅकेनिकल इंजिनिअर. आपल्या शिक्षणाद्वारे त्यांनी लोढा उद्योग समूहाची कीर्तीध्वजा उंच फडकावत ठेवली. अनिलकुमार लोढा वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे संघपती असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. दिनेशकुमार लोढा यांनी केमिकल इंजिनिअर म्हणून या उद्योग समूहास योगदान तर दिलेच परंतु चांदवडच्या नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेसह विविध सामाजिक संस्थांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शुगर्स स्पेअर्समध्ये देशात प्रथम तर विश्वात पाचवा क्रमांक एम.बी. केमिकल्सला मिळाला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!