Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : हिमालयाची उंची गाठलेला सह्याद्री

Share
हे वर्णन कोण्या बहुराष्ट्रीय कंपनीचे अथवा टाटा, अंबानी समूहाच्या उपकंपनीचे नव्हे तर आडगावच्या तुमच्या-आमच्यातील विलास शिंदे यांच्या शब्दातीत ‘सह्याद्री’ समूहाचे आहे. दिंडोरी तालुक्याच्या मोहाडी परिसरात लहानशा टेकड्यांच्या माथ्यावर सह्याद्री फार्म या टोपण नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प दिमाखात उभा आहे. हायटेक.. अल्ट्रा मॉडर्न.. स्वप्नवत.. पर्यटनातील दुढ्ढाचार्यांच्या अभ्यास अन् औत्सुक्याचे केंद्र अशा नामाभिधांनी सजलेला हा प्रकल्प नाशिकच्या कृषी विश्वाचा मानबिंदू बनला आहे.

विलास शिंदे, संचालक

इच्छाशक्ती दांडगी असेल तर यशाचे शिखर गाठणे शक्य असते, हा शाश्वत सिद्धांत शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या मूळ आडगावकर असलेल्या विलास शिंदे या धडपड्या व्यक्तीने यशस्वी करून दाखवला. ‘लोकल ते ग्लोबल’ बाजारपेठेचा साद्यंत अभ्यास करून ग्राहकाला अपेक्षित दर्जा व विश्वासार्हतेचा मिलाफ असलेल्या उत्पादनांची उपलब्धता करून देण्याची किमया साधणार्‍या ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड’ प्रकल्पाचे शिंदे हे खरे तर जनक. हायटेक.. अल्ट्रा मॉडर्न.. स्वप्नवत.. पर्यटनातील दुढ्ढाचार्यांचा अभ्यास अन् औत्सुक्याचे केंद्र अशा नामाभिधांनी सजलेला हा प्रकल्प नाशिकच्या कृषी विश्वाचा मानबिंदू बनला आहे.

कृषीबहुल दिंडोरी तालुक्याच्या मोहाडी परिसरात लहानशा टेकड्यांच्या माथ्यावर सह्याद्री फार्म या टोपण नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प दिमाखात उभा आहे. वैयक्तिक लाभाहून सामुदायिक हिताच्या व्यापक विचारातून त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’चे व्याप्त आणि मोठे स्वरूप मैलाचे दगड गाठण्यास पूरक ठरतात, या तत्त्वज्ञानावर स्वत: विलास शिंदे आणि त्यांच्या चमूचा विश्वास आहे.

\सामान्य शेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या आणि कृषी तंत्रज्ञानात एम.टेकपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिंदे यांच्या चौफेर दृष्टीने ‘सह्याद्री’ला लौकिकार्थानेे सातासमुद्रापार नेऊन ठेवले आहे. आजवर अनेक चढ-उतार अनुभवलेले शिंदे या प्रवासाबद्दल म्हणतात.. कृषी क्षेत्र ही माझी पहिल्यापासून ‘पॅशन’ राहिली आहे. महाविद्यालयीन जीवनानंतर काही वर्षे शेतीत रमलो. नानाविध प्रयोग केले. अनेक अनुभव पाठीशी बांधले.

संघर्षही वाट्याला आला. पण संघर्षातच जिद्दीचा पाया उभारला जातो, याची पुरेशी प्रचिती आली. द्राक्षाचे उत्पादन घेताना तंत्रज्ञानाशी मैत्री जुळली. उत्पादन, विपणन, बाजारपेठ या घटकांचे आकलन झाले. यानिमित्त जग फिरलो. पण काहीतरी नवीन, आव्हानात्मक करण्याची उमेद स्वस्त बसू देत नव्हती. मग सामूहिक शेतीची कल्पना डोक्यात विसावली. आप्तस्वकीय, मित्र मंडळीत हा विचार बोलून दाखवला. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाने हुरूप वाढला आणि ‘सह्याद्री’ची पायाभरणी झाली.

स्वप्न मोठे होते. पण काहीही करून नवे विश्व अनुभवायचे होते. अवघे जगच बाजारपेठ समजलो. तिथे स्वत:ला सिद्ध करायचे होते. प्रारंभी 10-12 शेतकरी एकत्र आणले. दोन कोटींचे भांडवल संकलित करताना पाच वर्षांच्या नियोजनाची जोड दिली. आव्हानांचे अनेक टप्पे होते. शास्त्रीय पद्धतीने सारे काही अवगत करायचे होते. व्हिजन स्पष्ट होते. एक दमदार बिझनेस मॉडेल तयार केले. वेग आणि व्यावसायिकता यांचा मेळ घातला.

गेल्या चार वर्षांत 140 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परिसरातील द्राक्षबागायतदार संस्थेचे भागधारक आहेत. मुख्य कंपनीला 11 उपकंपन्यांची जोड आहे. ‘सह्याद्री’च्या कक्षेत तब्बल 7 हजार शेतकरी येतात. आजचे चित्र म्हणाल तर 314 कोटींची उलाढाल, 56 कोटींचे भागभांडवल, 35 कोटींचा राखीव निधी आणि 141 कोटींची मालमत्ता असा आमचा पसारा आहे.

‘सह्याद्री’ प्रकल्पात द्राक्ष निर्यात होते. फळभाज्यांवर अनुरूप प्रकिया करण्यात येते. इथे मूल्यवर्धन होते. शेतकर्‍यांना निश्चित व सातत्यपूर्ण भाव मिळतो, तर भागधारकांना नफा. आमच्यापुढे तसा टाटा सन्सचा आदर्श आहे. सध्या इथे काळी, लाल व हिरवी द्राक्षे, केळी, पेरू, पपई, डाळिंब, खरबूज, टरबूज, संत्री, मोसंबी आदींवर प्रक्रिया करण्यात येते. विविध भाज्यांची साधे पॅकिंग अथवा फ्रोजन फूड म्हणून साठवणूक केली जाते आणि विक्रीदेखील. टोमॅटो पेस्ट, हापूस तोतापुरी, केशर आंबा पल्प, पेरू पल्प, पपई पल्प यांचीही निर्मिती इथे करण्यात येते.

प्रकल्पात 300 टनांचे कोल्ड स्टोअरेज अस्तित्वात आहे. 200 टनांचे रायनिंग चेंबरही आहे. विविध फळांना नैसर्गिकरीत्या पिकवले जाते. इथे जागतिक मानकांना अनुसरून दर्जा राखला जातो. प्रकल्पात ‘इआरपी’ व्यवस्थेद्वारे प्रत्येक पॅकवर क्यूआर कोड दिला जातो. त्यावरून थेट फळ अथवा भाजी उत्पादकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होते.

वैयक्तिक प्रगती हे शिंदे यांचे कधीही ध्येय नव्हते ना कधी त्यांनी तो दृष्टिकोन ठेवला. सन 2015 मध्ये सोबत असलेल्यांपैकी साडेचारशे शेतकर्‍यांना कंपनी समभागाचे वितरण हे त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरले. दीर्घकाळ टिकणारी संस्था उभारायची असेल तर आधी माणसांची वज्रमूठ तयार व्हावयास हवी, हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासह सर्व साडेचारशे जणांना समान मताधिकार आहे.

हे सर्वजण कंपनीचे मालक असल्याचेच शिंदे ठामपणे सांगतात. सह्याद्रीच्या पीकनिहाय उपकंपन्याही अस्तित्वात आहेत. त्या-त्या पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी त्या कंपन्यांचे वैयक्तिक सभासद आहेत. अशा पन्नास कंपन्यांच्या सभासदांमधून प्रत्येक कंपनीचा एक सभासद ‘सह्याद्री’वर प्रतिनिधित्व करतो. मूळ कंपनीचे 450 आणि हे पन्नास मिळून 500 जण कंपनीचा विचार करतात. हाच ‘टाटा सन्स’चा फॉर्म्युला आहे. वाढता वाढता वाढे या तत्त्वानुसार ‘सह्याद्री’चा विस्तार वेगाने होत आहे. ठिकठिकाणचे शेतकरी प्रकल्पाशी जोडले जात आहेत. या सर्वांना विश्वासार्हतेच्या धाग्याने जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शिंदे सांगतात.

शेतकरी आमच्याकडे उपग्रहाद्वारे नोंदणी करतात. ‘जिओमॅपिंग’च्या सहाय्याने आम्ही त्यांचे लोकेशन शोधतो. त्याचे अचूक मोजमाप घेणे, जमिनीची प्रतवारी निश्चित करणे, पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतांचा अभ्यास करणे, शेतकर्‍याचे आधारकार्ड तपासणे, जमिनीची कागदपत्रे तपासणी आदी औपचारिकता पूर्ण करताना दर्जा व पारदर्शकतेशी कुठेही समझोता केला जात नसल्याचे शिंदे म्हणतात.

दर्जा, विश्वासार्हता आणि ग्राहकभिमुखता या त्रिसूत्रीच्या पायावर ‘सह्याद्री’चा डोलारा उभा आहे. देश-विदेशातील पर्यटक व कृषीप्रेमींचे हे स्थळ पसंती ठरत आहे. प्रकल्पाला आजवर बीआरसी 250, 2200, 2005 पासून ते ‘टेस्को’ या सुपरमार्केटमधील प्रवेशासाठी आवश्यक मानांकने प्राप्त झाली आहेत. प्रकल्प कार्यविस्ताराचा भाग म्हणून ‘सह्याद्री’ काही कृषी विद्यापीठांशी सहकार्य करार करून तेथील डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने प्रत्येक पातळीवर नवे काहीतरी घडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पातील उत्पादन व्यवस्था, कार्यालयीन व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविष्कार, स्थानिक पण कुशल मनुष्यबळ आणि तत्सम बाबी लक्षात घेतल्या तर आपण एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत आल्याचा आभास होतो. विशेष म्हणजे प्रकल्पातील प्रत्येक प्रक्रिया पारदर्शी आहे.

विलास शिंदे हे ‘सह्याद्री’ समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये अजहर तंबूवाला (विपणन संचालक), मंगेश भास्कर (अ‍ॅग्रोनॉमी संचालक), अमित माथुर (आंतरराष्ट्रीय विपणनप्रमुख, फळप्रक्रिया विभाग), मदन शिंदे (वित्त व लेखा विभागप्रमुख), रूपेश खिस्ते (एचआर व गुणवत्ता विभागप्रमुख), प्रशांत जयकृष्ण (निर्मिती विभागप्रमुख), विवेक नामदे (देखभालप्रमुख) आदींचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!