Type to search

वुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट

माझं नाशिक

वुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट

Share
गृहकुलाचे स्वप्न पूर्ण करताना ग्राहक आपली आयुष्यभराची पुुंजी खर्ची घालतो. घर म्हणजे केवळ निवाराच नव्हे तर तिथे भावनाही निगडीत असतात. कारण घर असते आयुष्यभराची साथ आणि सुखद स्वप्नपूर्ती. पैसा आणि भावना याची गुंतवणूक ज्या घरांमध्ये ग्राहक करतात त्याच्या पैशाचा योग्य मोबदला मिळावा, विश्वासार्हता अबाधित राहावी म्हणून ‘दर्जा आणि गुणवत्ते’शी कधीही तडजोड करणार नाही हा मूलमंत्र घेऊन अनेकांच्या गृहकुलांचे स्वप्न साकारणारे आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटना बांधून त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे जितेंद्र ठक्कर यांच्या यशोबांधणीचा हा प्रेरणादायी प्रवास.

जितेंद्र ठक्कर यांचे वडील रिअल इस्टेट व्यवसायतले. आपल्या मुलांनी या व्यवयासात येऊ नये, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्याकाळी या व्यवसायाला इतकी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता नव्हती. मुंबईत तर काही ‘डॉन’ हा व्यवसाय करत असे. त्यामुळे जितेंद्र ठक्कर हे प्रथम कापड व्यवसायात उतरले.

सन 1976 मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे ‘रिअल इस्टेट’मध्ये प्रचंड मंदी आली. जितेंद्र ठक्कर यांच्या वडिलांनी ज्या ग्राहकांना प्लॉट विकला, ज्यांनी प्लॉट खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले त्यांना खरेदीखत देण्यासाठी कायद्याने बंधने आली. ज्यांच्या जमिनी विकत घेतल्या त्या जमिनी नावावर करता येत नव्हत्या. अशा परिस्थितीत वडिलांना मदत करता यावी म्हणून जितेंद्र ठक्कर हे रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश करते झाले.

‘आमच्या वडिलांनी ज्या लोकांना प्लॉट विकले होते त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून आपणही या व्यवसायात यावे ही प्रेरणा मिळाली. त्यावेळी वडिलांची इच्छा नसतानाही मी त्यांना मदत व्हावी म्हणून बांधकाम व्यवसायात उतरलो. प्रारंभी प्लॉट विक्रीसह नंतर 1978 मध्ये शिंगाडा तलाव परिसरात मनोहर मार्केट हा 150 फ्लॅट आणि 60 दुुकानांचा व्यावसायिक म्हणून पहिला प्रकल्प साकारला आणि पूर्णवेळ बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रवास सुरू केला.

आज ठक्कर डेव्हलपर लि. ही एक पब्लिक लि. कंपनी झाली असून अनेक मोठे निर्माण बांधण्याचे समाधान आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी गृहस्वप्नपूर्तीचे भाग्य मिळाले याचे समाधान मोठे आहे’.


‘जो व्यक्ती स्वत:चे गृहकुल घेतो त्याची आयुष्यभराची पुंजी त्यासाठी लावतो. शिवाय आयुष्यभर पुरेल असे कर्जही काढतो. त्यांना तू कधीही फसवू नकोस. प्रामाणिकपणे काम कर’ हा वडिलांचा सल्ला शिरोधार्य मानून जितेंद्र ठक्कर यांनी बांधकाम व्यवसायात अनेक प्रकल्पांसह स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाची बांधणी केली.

‘निवारा’ ही ग्राहकांची अत्यंत मूलभूत गरज पूर्ण करणार्‍या या व्यवसायाला प्रतिष्ठा, विश्वासार्हता नव्हती. घरासाठी कजर्र् देणार्‍या बँका, अर्थसंस्था जेव्हा ग्राहकांना घरासाठी कर्ज देण्यासाठी वाटाघाटी करत तेव्हा बिल्डर-डेव्हलपर यांना बाहेर बसवत इतकी विश्वासार्हता रिअल इस्टेट व्यवसायात घसरली होती.

एकीकडे मार्केटमध्ये बँकांचा हा दृष्टिकोन तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांत बांधकामासाठी परवानगी, नोंदणीसाठी गेल्यास तिथेही अत्यंत नकारात्मक वातावरणाची स्थिती होती. यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायला हवे असे ठक्कर यांना वाटले. त्याविषयी बोलताना ते सांगतात, त्याकाळी आम्हाला बांधकाम परवाने मिळवताना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागे.

‘तुम्ही मूळ मालकांच्या नावाने बांधकामाची परवानगी घ्या, असे शासकीय अधिकारी सल्ले देत. अशी परिस्थिती बदलण्यासाठी, बांधकाम क्षेत्राला प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी जाणीव पहिल्यांदा झाली. बिल्डर आणि गृहखरेदी करणार्‍या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका संघटित संस्थेची गरज होती. रिअल इस्टेट व्यवसायाला विश्वासार्हता यावी म्हणून त्याकाळात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नावाची संस्था काम करत होती. ती केवळ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन होती.

त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून बिल्डर, विकासक यांचा समावेश नव्हता. म्हणून आम्ही त्यातच ‘बिल्डर सेल’ सुरू केली. दरम्यान, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पुण्यात प्रमोटर बिल्डर असोसिएशन संस्था सुरू झाली होती. म्हणून नाशिकमध्येही बिल्डर असोसिएशन ऑफ नाशिकची पायाभरणी झाली. अशा संस्थांचे जाळे अल्पावधीतच राज्यभर पसरले.’

जितेंद्र ठक्कर एकीकडे बांधकाम व्यवसायात स्थिरावतानाच या क्षेत्रातील लोकांसाठी संघटित रूपात काम करण्याची त्यांची उमेद स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे राष्ट्रभर अवाका असलेली बांधकाम व्यवसायांकाची संघटना काढावी, असे त्यांना वाटले. ते सांगतात ‘सन 1988 मध्ये राम जेठमलानी नगरविकासमंत्री असताना ‘नॅशलन हाऊसिंग पॉलेसी’चा मसुदा तयार होत होता.

त्यावेळी त्यांना भेटून सर्वांसाठी गृह योजना हा मुुद्दा घेऊन आम्ही प्रमोटर बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र याच्या सहकार्याने दिल्लीला एक परिषद घेतली. त्यावेळी रिअल इस्टेट, गृह बांधकाम क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यावेळी देशातील मुख्य बिल्डर-डेव्हपर्सची समिती स्थापन करून आम्ही नाशिकला आमंत्रित केले आणि तिथे ‘क्रेडाई’ ही बांधकाम व्यावसायिकांची पहिली संस्था नाशिकमध्ये नावारूपाला आली. नंतर हे संघटन देशातील मुख्य शहरांत पसरले.

बांधकाम व्यवसायात स्वत:चा वेगळा ‘ट्रेंड’ निर्माण करणार्‍या ठक्कर बिल्डर्सफने बसस्टॅण्ड बांधून देण्याचा प्रयोंग इतर शहरांसाठी पथदर्शी ठरला. ‘सन 2004 यावर्षी ‘बसस्टॅण्ड’चा विकास ही संकल्पना आम्ही राज्य शासन आणि एसटी महामंडळाला प्रथम दिली. महामंडळाची जागा घेऊन आम्ही ती विकसित करून दिली. नाशिकला पहिल्यांदा बसस्टॅण्डचा प्रयोग यशस्वी झाला. तिथे साडेसहाशे दुकाने आणि बसस्टॅण्ड हा प्रकल्प केल्यानंतर राज्यात 19 ठिकाणी आम्ही बसस्टॅण्ड उभारले.’ असे ठक्कर अभिमानाने सांगतात.

अरविंद इनामदार पोलीस संचालक असताना नाशिकमध्ये 1997 मध्ये राणेनगर येथे पोलीस कॉलनीत पोलिसांसाठी घर बांधण्याचा प्रकल्प जितेंद्र ठक्कर यांना मिळाला. ही सर्वार्थाने वेगळी घटना होती. शासनाच्या कुठल्याही प्रकल्पात सर्वात कमी दर असलेल्या बिल्डर्सच्या निविदा स्वीकारल्या जाऊन त्यांनाच कंत्राट दिले जाते. परंतु जितूभाईंच्या निविदांचा दर सर्वाधिक असूूनही हा प्रकल्प केवळ बांधकामातील गुणवत्ता आणि दर्जा यामुळे त्यांना मिळाला होता.

घर घेण्याचा विचार आणि प्रत्यक्ष घर घेणे यामधील दरी भरण्याचे काम ‘क्रेडाई’ने केले असे सांगताना जितेंद्र ठक्कर गेल्यावर्षी आलेल्या ‘रेरा’ आणि ‘महारेरा’ कायद्याबद्दल बोलताना म्हणातात, ‘या कायद्याने अधिक पारदर्शकता आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे’ असे सांगून ते या कायद्याचे स्वागत करतात.

ठक्कर बिल्डर्स यांचा दिंडोरीरोडवर म्हसरूळ परिसरात मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या घराचा प्रकल्प आकाराला येत आहे. नाशिकमध्ये पर्यटन व्यवसायात भरपूर संधी आणि वाव असल्याने त्यांची कंपनी पर्यटन क्षेत्रातही उतरत आहे. गंगापूररोडवर गंगावरे परिसरात ठक्कर्स यांचा रिसॉर्ट उभारण्याचा मानस आहे. यासह गंगापूररोडवर आकाशवाणीजवळ एक व्यावसायिक प्रकल्प पूर्णत्वाला येत आहे.

एखाद्याने उद्योजकतेत यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे, असे विचारताच जितूभाई सांगतात, ‘तरुणाईला हल्ली सर्व गोष्टी तात्काळ आणि आज, आता इथेच हव्या असतात. परंतु यश ही दीर्घकाळाने मिळणारी गोष्ट आहे. एखाद्या व्यवसाय, धंद्यात किमान स्थिर व्हायला 5 वर्षांचा काळ लागतोच. त्यासाठी सातत्यपूर्णपणे चिकाटी, प्रामाणिकपणा आणि तत्त्वाने जग जिंकता येतेच हा संदेश ते देतात. जो त्यांच्याही यशाचे गमक आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!