Type to search

वुई द ट्रेंडसेटर्स : बेकरी उत्पादनाची ‘जहागिरी’

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : बेकरी उत्पादनाची ‘जहागिरी’

Share
नाशिकच्या जहागिरदार बेकर्सची ही यशोगाथा. आज व्यावसायिक यशाची कमान तयार केलेल्या मिलिंद जहागिरदार यांना कधीकाळी घरातूनच आस्थापना प्रारंभाला विरोध झाला. मात्र आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी खर्‍या अर्थाने ‘करून दाखवले’. दर्जा, प्रामाणिकपणा आणि संस्कार या त्रिसूत्री यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. आगामी वाटचालीत प्रोफेशनल मॅनेजमेंट आणून लिमिटेड कंपनी सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे..
मिलिंद जहागिरदार, संचालक

हागिरदार घराणे मूळ जळगावच्या भडगाव-पाचोर्‍याचे. आडनावाला साजेशी गावची जहागिरी दबदब्याच्या पाऊलखुणा जपणारी. पण मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या करिअरला लांबी-रूंदी प्राप्त व्हावी या उद्देशाने जहागिरदार कुटुंबाने 1930 च्या सुमारास नाशिक गाठले. कविता, लेखन, साहित्य या प्रकारांशी नाळ जुळलेल्या वसंतराव जहागिरदार यांची नाशिककरांशी वेगात मैत्री झाली. समाजकल्याण खात्यात नोकरी करताना त्यांनी नाशकात मोठा मित्र परिवार जोडला. सुपुत्र मिलिंद जहागिरदार म्हणजे विविध गुणांचा मिलाफ असलेले रसायन.

हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीने निपटारा करण्याची त्यांची हातोटी लक्षणीय होती. आज नाशिकच्या व्यावसायिक विश्वात दबदबा निर्माण केलेल्या ‘जहागिरदार फुडस्’ प्रा.लि. (पुर्वीचे ‘जहागिरदार बेकर्स’) समूहाचे ते खर्‍या अर्थाने शिल्पकार!

नाशिकच्या पेठे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मिलिंद जहागिरदार वकिलीच्या शिक्षणासाठी ठाण्यात पोहोचले. या काळात त्यांनी बिस्किट मेकिंग आणि ब्रेड मॅन्युफॅक्चरिंगचा अभ्यासक्रम गुजरात कृषी विद्यापीठातून पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करत नाही तोवर त्यांना ब्रिटानिया कंपनीत नोकरीची संधी मिळाली. तेव्हा त्यांचे वय वर्ष होते 21. हाताखाली शंभर माणसे, साडेचारशे रुपये वेतन असे त्यांच्या नोकरीचे स्वरूप. तिथली 8 वर्ष काढल्यानंतर वॉलेस फ्लोअर मिल कंपनीत काम करण्याची संधी त्यांच्यासमोर चालून आली. तिथेही वर्षभराचा अवधी काढल्यानंतर जहागिरदार यांना नाशिकस्थित सुप्रसिद्ध धामणकर घराणे चालवत असलेल्या आदर्श बेकरीतील नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. साधारणत: ही 1996 ची गोष्ट.

आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत मिलिंद जहागिरदार म्हणतात, ‘उत्पादन क्षेत्र तथा मॅन्युफॅक्चरिंग ही खरी तर माझी कोअर कॉम्पिटन्सी. ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मी आदर्श बेकरीत कार्यारंभ केला. वर्षभरात बेकरी उत्पादनांबाबत शास्त्रोक्त अभ्यासही केला. खरे सांगायचे तर ब्रिटानिया कंपनीत मी बिस्किटाबाबत ज्ञानार्जन केले तर आदर्शमध्ये बेकरी उत्पादनांचा अभ्यास. पण इथेही साधारणत: वर्षभराचा कालावधी व्यतीत केल्यानंतर स्वत:चे वेगळे व्यावसायिक अस्तित्व असावे, असा विचार मनात घोळू लागला. एकत्रित कुटुंब असल्याने तशा जबाबदार्‍यांचा भाग कमी होता. पण वडील व्यवसाय सुरू करण्याच्या विरोधात होते. मात्र माझ्या विचारातील ठामपणा त्यांना भावला आणि स्वतंत्र व्यवसायाच्या कल्पनेला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला. साधारणत: तो 1986 चा काळ होता. सातपूरच्या अशोकनगर परिसरात पहिल्या बेकरीची पायाभरणी केली. हा व्यवसाय भागीदारीत असला तरी ते माझ्यासाठी मोठे धाडसच होते. पण मात्रा चालली नाही आणि अवघ्या दहा महिन्यांत भागीदारी गुंडाळण्याची वेळ आली. तडजोडीत प्रकल्प भागीदाराला दिला. संघर्षाचा काळ राहिला तो. पण निश्चयी स्वभाव ढळू दिला नाही. कुटुंबाकडून धीर मिळाला.’

करायचा तर हाच व्यवसाय या ध्येयाने प्रेरित होऊन पुन्हा भाड्याच्या जागेत बेकरी सुरू केली. उत्पादनाला नाव नव्हते, पॅकिंग नव्हते. पहिल्या दिवशीची कमाई होती 129 रुपये. हळूहळू व्यवसायवृद्धी होत गेली. ग्राहकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. तोच हुरूप दुसरी जागा घेऊन व्यवसाय विस्तार करण्यासाठी कामी आला. मग स्वत:ची जागा विकत घेण्याची कल्पना मनात आली आणि पंचवटीतल्या हिरावाडीत एक जागा मिळालीही आणि खरे तर इथूनच जहागिरदार बेकर्सचा प्रवास सुरू झाला. उत्पादन घेत होतो. गुणवत्ताही राखण्यात कसोशीचे प्रयत्न होते. मात्र उत्पादनाला नाव काय द्यावे, याबाबत निर्णय होत नव्हता. मग ही जबाबदारी अण्णा गर्गे यांनी पार पाडली. आमची उत्पादने जहागिरदार बेकर्स या नावाने बाजारपेठेत विक्रीला येऊ लागली. समाधान होते; पण नवीन काहीतरी करण्याची उमेद अस्वस्थ करीत होती.

मग नागली बिस्कीट उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते खरेतर आमच्यासाठी संशोधन होते. बिस्कीट तयार करण्याचे तंत्र अवगत होते. केवळ नागलीचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने प्रयोग अभिनव होता. आरोग्यदायी बिस्किटे म्हणून त्याचे ब्रॅण्डिंग सुरू केले आणि नाशिककरांना ते प्रचंड भावले. या श्रेणीला सर्वदूर मागणी झाली. त्यासाठी वेगळी बाजारपेठच तयार झाली. तिथून आमच्या प्रगतीचा वारू उधळला तो आजवर थांबलेला नाही. आज जहागीरदार बेकर्सच्या छताखाली साधारणत: 60 ते 70 उत्पादनांची मालिका आहे.

या आस्थापनाच्या वतीने मिलिंद जहागिरदार यांच्या सौभाग्यवती वंदना यांनी पुण्यात बिस्किटांचे मार्केटिंग केले. तेथील अनेक दालनांमध्ये जहागिरदार बेकर्सची उत्पादने दिसू लागली. चोखंदळ पुणेकरांनाही ती भावली. हा प्रवास त्यांच्यासाठी चढ्या आलेखाचा राहिला. 2008 च्या सुमारास व्यवसाय विस्ताराचे आणखी एक पाऊल जहागिरदार परिवाराने टाकले. शहराच्या मध्यवर्ती कॅनडा कॉर्नर भागात प्रशस्त दालन उभारण्यात आले. तिथले वुडन फर्निचर म्हणजे ब्रिटनमधील बेकरी दालनात दृष्टीस पडणार्‍या व्यवस्थेची प्रतिकृती होती. हे दालन पूर्णत: वातानुकूलित होते. आरोग्याबाबत जागरुक असणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन जहागिरदार यांनी अंडेविरहित (एगलेस) केक बाजारात आणण्याची कल्पना आणली. वाढदिवस व अन्य कार्यक्रमांत केकचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्याचा खपही प्रचंड होता. जहागिरदार बेकर्सचे अंडेविरहित केक्स ग्राहकाभिमुख ठरले.

जहागिरदारांची नागली, कणिक व क्रॅनबेरी श्रेणीमधील हेल्थ फ्रेण्डली बिस्किटे, ब्रेड, केक्स, क्रिमरोल, डोनेटस् ही उत्पादने बाजारात भाव खाऊन आहेत. हाय फायबर खारी, मधुमेहींसाठी वेगळी बिस्कीटस् (अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने) ही उत्पादनेही ‘हॉट सेल’मध्ये गणली जातात. जहागिरदारांची सध्या नाशकात 17, पुण्यात 3 तर मुलुंड, शिरपूर, मालेगाव येथे फॅन्चायजी स्वरुपात दालने अस्तित्वात आहेत. स्वत: मिलिंद जहागिरदार, त्यांच्या पत्नी वंदना आणि दोन्ही कन्या या व्यवसायात योगदान देत आहेत. लोकांच्या जिभेपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करण्याचे तत्त्वज्ञान या समूहाला पुढे घेऊन गेल्याचे सांगण्यात येते.

दर्जा, प्रामाणिकपणा आणि संस्कार ही जहागिरदार बेकर्सच्या आजवरच्या यशाची त्रिसूत्री आहे. हा प्रवास त्यांना अखंड सुरू ठेवायचा आहे. बाजारातील स्पंदने टिपून, ग्राहक कल लक्षात घेऊन, प्रामाणिकपणा व सचोटी कायम ठेऊन त्यांना वाटचाल करायची आहे. व्यावसायिकतेत पैसा कमावणे हा अविभाज्य भाग असला तरी नावलौकिक कमाई प्रधानस्थानी ठेवण्याचा त्यांचा ध्यास आहे. जहागिरदार बेकर्सला आज निर्माण झालेली ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ अविरत ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. भविष्यात लिमिटेड कंपनी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रोफेशनल मॅनेजमेंट आणण्यात येईल. ‘केल्याने होत आहे रे..’ या व्यावहारिक प्रमेयावर मिलिंद जहागिरदार यांचा गाढा विश्वास आहे. कंपनीचा लौकिक वाढता वाढता वाढे असा ठेवण्याचा आपला मानस असल्याचेही ते सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!