Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : धार्मिक पर्यटनातील चौधरी

Share
सध्या चौधरी यात्रा कंपनीच्या 100 गाड्या, 60 वातानुकूलित व 17 स्लिपर कोच बसेस आहेत. नाशिक ही आमची कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसह नाशिकमधील पर्यटकांनी चौधरी यात्रा कंपनीवर विश्वास ठेवला व त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरलो. त्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची भरभराट झाली. पर्यटकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासावर 2011 पासून प्रादेशिक धार्मिक व नैसर्गिक पर्यटनासह विदेशी पर्यटनही चौधरी यात्रा कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे. श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, मॉरिशस, कैलास मानस सरोवर, भूतान, हाँगकाँग व युरोप येथे पर्यटन सुरू झाले असून त्यास पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे.

ब्रिजमोहन चौधरी, संचालक

पर्यटन व्यवसायास सुरुवात होण्याआधी 1961 मध्ये वडील बजरंगलाल चौधरी व चुलते कल्याणमल चौधरी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी एक बस घेतली. ही बस राज्यस्थानातील 50 कि.मी. परिसरातील स्थानिक प्रवाशांना ने-आण करत असे. त्यावेळी प्रादेशिक परिवहनाच्या नियमाप्रमाणे क्रमांकानुसार गाड्या सोडल्या जात. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकांच्या गाड्या असत. दिवसातून एकदाच क्रमांक येत असे. पण चौधरी यांच्याच बसला प्रवासी अधिक प्रतिसाद देत. त्यामुळे आधीच्या व नंतर गाडीला प्रवासी संख्या कमी असायाची. तो आमचा प्रथम टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 1971 पर्यंत एकच्या 20 गाड्या झाल्या.

राज्यस्थानातील हाडीखुर्द (जि.टोक) हे आमचे मूळ गाव. गावी वडिलोपार्जित 150 एकर जमीन असून शेती हा पूर्वाश्रमीचा व्यवसाय आहे. वडिलांनी शेतकर्‍यांचे धान्य व्यापार्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दलाली व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शेतीस जोडधंदा म्हणून वडिलांनी एक प्रवासी बस खरेदी केली. या बसला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने तो एक टर्निंग पॉईंट ठरला.

1971 मध्ये राज्यस्थान शासनाने राज्यात फक्त सरकारी बसमार्फत प्रवासी वाहतूक केली जाईल, असा कायदा केला. त्यामुळे सर्व खासगी बसेस बंद झाल्यामुळे 20 पैकी 17 गाड्या विकाव्या लागल्या. उर्वरित 3 बसेसमार्फत धार्मिक यात्रा प्रवाशांना करता यावी यासाठी राज्यस्थान यात्रा, ब्रज यात्रा, वृंदावन, मथुरा, गोवर्धन अशी कृष्णभूमी धार्मिक यात्रा सुरू केली. त्यानंतर हळूहळू बद्रीनाथ, रामेश्वर, चारधाम धार्मिक यात्रा देशभर सुरू केली. सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

एक दिवस नाशिकमधील टूर ऑपरेटर कुलकर्णी यांना इंदोर ते नाशिककरिता नियमित प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसची गरज होती. त्यासाठी ते जयपूरला पोहोचले. त्यावेळी अनपेक्षित त्यांची भेट झाली व महाराष्ट्रात 1980 पासून भाड्याने बस प्रवासी वाहतुकीसाठी देण्यास सुरुवात झाली. 1980 ते 1983 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीतर्फे बसेस भाड्याने दिल्या जात होत्या. 1981 मध्ये शिंदे टूर ऑपरेटर यांना बस भाड्याने दिल्या होत्या. त्यांनी चौपट नफा मिळवून दिला. नंतर त्यांना जास्तीत जास्त बसेसची गरज भासू लागली. त्यांच्या मागणीनुसार दुसरीकडून नवीन बस त्यांना उपलब्ध करून दिल्या. मात्र त्याचा विपरित परिणाम आमच्या व्यवसायावर झाला. त्यांनी जुन्या बसेसची मागणी कमी केल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला.

1982 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीतर्फे पर्यटकांसाठी धर्मशाळेत सामूहिक निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जात होती. 1983 पासून प्रवाशांना एकवेळचे जेवण व स्वतंत्र राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रवासी भाडे पर्यटकांकडून इतरांपेक्षा कमी घेण्यास सुरुवात केली. त्यास पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रतिस्पर्धी व्यवसायिकांशी 1987 मध्ये बरोबरी करता आली व 1991 मध्ये प्रतिस्पर्धी व्यवसायिकांना मागे टाकले. हा चौधरी यात्रा कंपनीचा टर्निंग पॉईंट होता.

1980 ते 1992 पर्यंत फक्त नाशिकपर्यंत पर्यटन व्यवसाय मर्यादित होता. 1993 मध्ये महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर व जळगाव या शहरात चौधरी यात्रा कंपनीची कार्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर पर्यटकांचा विश्वास व प्रतिसाद यामुळे टप्प्याटप्प्याने 1997 पर्यंत महाराष्ट्रभर 50 कार्यालये सुरू झाली. 1984 पासून कंपनीकडून गाडी घेऊन स्वत:ची चेसीस गाडी बनवण्यास सुरुवात झाली. 1994 ते 2012 पर्यंत चौधरी यात्रा कंपनीच्या 150 गाड्या तयार करण्यात आल्या. पर्यटकांच्या मागणीनुसार सुरुवातीस 3 बाय 2 आसनांच्या बस होत्या. त्यात सुधारणा करत 1995 पासून 2 बाय 2 आराम आसनाच्या बसेस तयार करण्यात आल्या. 2006 पासून वातानुकूलित बसेस तयार करण्यात आल्या.

1994 पासून पर्यटकांना सकाळी नाश्ता, दुपारी व रात्रीचे जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. पर्यटक सुरुवातीला जेवणासाठी ताट, वाटी व झोपण्यासाठी शाल, चटई, ब्लॅकेट आदी साहित्य आणत. चौधरी यात्रा कंपनीने पर्यटकांच्या सोयीसाठी 1987 पासून जेवण व झोपण्याचेही साहित्य देण्यास सुरुवात केली. 2001 पासून कौटुंबिक सदस्य असणार्‍या पर्यटकांना राहण्यासाठी धर्मशाळेत स्वतंत्र्य खोली उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. त्यात काळानुरूप सुधारणा करत पर्यटकांसाठी हॉटेल्समध्ये राहण्याची निवास व्यवस्था सुरू झाली.
1987 पासून पर्यटकांच्या मागणीनुसार महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा, कोकण पर्यटन, महाराष्ट्र दर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच गोवा, गुजरात, राज्यस्थान, चारधाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, त्रिस्थली व प्रेक्षणिय स्थळे फिरण्यास सुरुवात झाली. पर्यटकांच्या मागणीनुसार धार्मिक पर्यटनासह नैसर्गिक पर्यटनही चौधरी यात्रा कंपनीतर्फे सुरू करण्यात आले.

चौधरी यात्रा कंपनीचे मुख्यालय नाशिक शहरात आहेत. पर्यटकांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल चौधरी यात्रा कंपनीला भारत सरकारतर्फे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पर्यटकांना संगणक प्रणालीमार्फत पर्यटन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह देशभर व विदेशात दैनंदिन पर्यटन सेवा दिल्याने स्थानिक नागरिकांसह रुग्णालये, हॉटेल्स, प्रशासनाशी नियमित संपर्क आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी तेथील स्थानिक यंत्रणा व नागरिक मदतीला धावून येतात. अमरधाम यात्रेवेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात चौधरी यात्रा कंपनीचे तीन पर्यटक ठार झाले. त्या पर्यटकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक अडचणी आल्या, मात्र त्यावेळी महायुतीचे सरकार होती. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदार व आमदारांनी केंद्र सरकार, तेथील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला. त्यामुळे पार्थिव महाराष्ट्रात आणणे सोयीचे झाले. केदारनाथ महाप्रलयावेळी चौधरी यात्रा कंपनीचे अनेक पर्यटक अडकले होते. त्यावेळी स्थानिक यंत्रणेशी व नागरिकांशी नियमित संपर्क असल्याने त्यांनी तात्काळ मदत केल्याने सर्व पर्यटक सुखरूप महाराष्ट्रात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!