Type to search

माझं नाशिक

वुई द ट्रेंडसेटर्स : बीओटीतील पथदर्शी अशोका

Share
सुरुवातीला नातेवाईकांकडून पाच हजार रुपये मिळवून गर्व्हन्मेंट कॉन्ट्रॅक्ट मिळवत अशोकाची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या बीओटी तत्त्वावरील प्रोजेक्टमध्ये सहभाग घेणारी देशातील पहिली कंपनी म्हणून अशोकाने पाऊल टाकले आणि बीओटी प्रणाली यशस्वी करून दाखवली. देशातील 21 राज्यांमध्ये अशोकाने रस्ते बांधणी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. स्पिड, क्वॉलिटी, सेफ्टी या त्रिसूत्रीवर आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही देशातील एकमेव कंपनी आहे. आरोग्य आणि पर्यावरणावरही कंपनीने विशेष भर दिला आहे. अशोकाची ही देदीप्यमान वाटचाल अशोका गु्रपचे अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या अनुभवातून…..

अशोक कटारिया, चेअरमन

मी मूळचा सिन्नरचा. माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये पूर्ण केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यातून घेतले. यात मी सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर पाटबंधारे खात्यात अभियंता पदावर रुजू झालो. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद मनात होता. परंतु आपण स्वतःचा व्यवसाय करावा, असे नेहमी वाटत होते. परंतु त्यावेळची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खिशात एक रुपयाही नव्हता. अशा परिस्थितीत स्पर्धात्मक युगात आपला टिकाव कसा लागेल, हाही विचार मनात होता.

हो पण मनात भीती नव्हती. एकीकडे काम सुरू होते, तर दुसरीकडे व्यावसायाच्या विविध विचारांनी मनात कल्लोळ घातला होता. अखेर मी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि वर्षभरातच पदाचा राजीनामा दिला. पुढे मी गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे टेंडर घेण्याचा मी निर्णय घेतला. पण निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाच हजार रुपये माझ्याकडे नव्हते. अखेर नातेवाईकांकडून मदत घेत पाच हजार रुपये कसेबसे जमा केले आणि टेंडर भरले. त्यावेळी नाशिकरोड येथील रमणलाल पारख यांची साथ लाभली आणि आम्ही दोघांनी मिळून गव्हर्न्मेंटची कामे घेण्याचा निर्णय घेतला.

सुदैवाने पहिलेच काम मला मिळाले आणि खरे म्हणजे आज जे अशोकाचे साम्राज्य आपण पाहत आहात याची मुहूर्तमेढ येथूनच रोवली गेली, असे म्हणण्यास हरकत नाही. येथूनच खर्‍या अर्थाने अशोकाचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी मला एकलहरे सोसायटीचे काम मिळाले. तो काळ होता 1975 चा. नंतर वीज मंडळाची छोटी छोटी कामे आम्ही करू लागलो. मोठमोठ्या कंपन्यांनी सोडून दिलेली कामे आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारू लागलो आणि त्यात आमचा जम बसत गेला. सन 1975 ते 1985 या काळात गर्व्हर्न्मेंटचे टेंडर आम्ही घेत असू आणि यातून लहान लहान कामे आम्ही करण्यास सुरुवात केली.

काम जरी छोटे असले तरी ते पूर्ण गुणवत्तेनुसार आणि सचोटीने दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे हे आमचे वैशिष्ट्य. 1982 नंतर आम्ही इंडस्ट्रीयल कामांकडे वळलो. जैन एरिगेशनचा सर्वात पहिला आणि आमच्याद़ृष्टीने सर्वात मोठा प्रोजेक्ट मी घेतला. त्यानंतर कामाची जी घौडदौड सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. त्यानंतर नीलकमल, टाटा, गोदरेज, मफतलाल, इंडियन ऑईल, भारती विद्यापीठ, के.के.वाघ, प्रवरा इन्स्टिट्यूट, मुक्त विद्यापीठ यासह कॅडबरी कंपनी अशा पन्नासहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कामे आम्ही केली.

साधारणपणे 1985 ते 1990 च्या दरम्यान आम्ही इंडस्ट्रीयल कामांमध्ये मोठे काम उभे केले. दरम्यानच्या काळात सतीश पारखसारख्या सहकार्‍यांची साथ आम्हाला मिळाली आणि येथूनच अशोकाला तज्ञांची साथ लाभ जाऊन आमचा पाया अधिकच भक्कम होत गेला. आम्ही कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्राधान्य दिले. त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. इतकेच नाही तर कर्मचार्‍यांना सुरक्षा प्राप्त करून दिली.

आज अशोकाच्या यशात माझ्या या सहकार्‍यांचाही वाटा मोठा आहे, हे नाकारून चालणार नाही. कालांतराने इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये काही कारणाने स्लो डाऊनचा काळ आल्याने कामे मंदावली. बरे, कोणतेही काम करायचे म्हणजे आधी तुम्हाला स्वतःचा पैसा उभारावा लागतो. त्यावेळी या क्षेत्राकडे पाहण्याचा बँकांचा दृष्टिकोन नकारात्मक होता. त्यामुळे आम्ही खासगी क्षेत्रातून 24 टक्के व्याजदराने पैसा उभा केला आणि कामे केली. परंतु स्लो डाऊनमुळे कामांचे पेैसे मिळण्यास होणारा विलंब यामुळे कंपनीलाही अडचणी येऊ लागल्या.

परंतु याकडे एक संधी म्हणून पाहून आम्ही बिल्डकॉन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे, नाशिकमध्ये काही प्रोजेक्ट हाती घेतले. साधारणपणे 1996 चा तो काळ. महाराष्ट्र शासनाने बीओटी म्हणजेच बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर रस्ते बांधणीचा निर्णय घेतला. शासनाकडेही त्यावेळी रस्ते बांधण्यासाठी निधीची कमतरता होती. ही संधी म्हणून आम्ही बीओटी कामे घेण्याचा निर्णय घेतला आणि अशोकाने टेंडर भरले. धुळे बायपासचा पहिलाच 5 कोटींचा बीओटी तत्त्वावरील प्रोजेक्ट आम्हाला मिळाला.

रस्ते बांधणीत तसा आम्हाला अनुभव नव्हता. त्यामुळे हे आमच्यासाठी खूपच चॅलेंजिंग काम होते. परंतु इतर कंपन्या या कामांसाठी फारशा उत्सुक नव्हत्या. त्याचे कारण तेव्हा बीओटी ही संकल्पनाच मुळात नवीन होती. पुन्हा खासगी क्षेत्रातून 24 टक्के व्याजदराने पैसे उचलले. 24 महिन्यांचा हा प्रोजेक्ट अवघ्या 9 महिन्यांत पूर्ण करत अशोकाने एक वेगळा विक्रम नोंदवला. महाराष्ट्र शासनासाठी हा प्रोजेक्ट मॉडेल ठरला, तर आमच्यासाठी टर्निंग पाँईट ठरला. त्यानंतर 1996 ते 2000 या कालावधीत चार मोठे प्रोजेक्ट आम्ही केले. त्यातील नगर-करमाळा हा एक प्रोजेक्ट केला. महाराष्ट्रात अनेक बीओटी प्रोजेक्टमध्ये अशोकाने एक वेगळे स्थान निर्माण केले.

महाराष्ट्रातील बीओटी तत्त्वावरील प्रोजेक्ट पाहून मध्य प्रदेश सरकारनेही ही प्रणाली स्वीकारत बीओटी प्रोजेक्ट करण्याचे ठरवले आणि महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशमध्ये अशोकाने पहिले पाऊल टाकले. इंदोर-खंडवा ते महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या 203 किलोमीटच्या सर्वात मोठ्या बीओटी रस्त्याचे काम आमच्या कंपनीला मिळाले. 2000 ते 2006 बीओटीचे अनेक प्रोजेक्ट अशोकाने केले. 2006 मध्ये पुन्हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आला तो म्हणजे आयडीएफसीने इक्विडिटी घेतली. 100 कोटी देऊन त्यांनी आमचे 15 टक्के भाग घेतले. त्यानंतर 2006 पासून राष्ट्रीय स्तरावरील कामे घेण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने बीओटी प्रणाली स्वीकारली आणि हायवे कामांना सुरुवात केली.

अशोकाने ही कामे करण्यास सुरुवात केली आणि राष्ट्रीय स्तरावरचा भंडारा ते छत्तीसगड 160 किलोमीटरचा 1 हजार कोटी रुपयांच्या चौेपदरी महामार्गाचे काम आम्हाला मिळाले. 2010 मध्ये कंपनी लिस्ट झाली आणि एनएसई आणि बीएसईमध्ये आम्ही आयपीओ काढला. तेथेही भरघोस यश मिळाले. 2010 ते 2011 हा काळ खूप संघर्षाचा गेला. या काळात आम्ही फारशी कामे करू शकलो नाही. त्यानंतर 2009 मध्ये ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशनमध्ये आम्ही एन्ट्री केली. पंढरपूरजवळील मांडवे नदीवरील पूल बांधण्याचे काम आम्हाला मिळाले. 300 मीटर पूल बांधण्याचे हे काम करण्यासाठी साधारणपणे एक वर्षाचा कालावधी मिळाला होता.

परंतु 38 दिवसांत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येऊन कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. त्यानंतर देहूरोड ते कात्रज रस्त्याचे काम पूर्ण केले. 2010 ते 2013 दरम्यान राज्यातीलच नव्हे तर देशातील बीओटी तत्त्वावरील सर्वाधिक कामे अशोकाकडे होती. 9 हजार कोटी रुपयांची कामे आम्हाला मिळाली. 2013 ते 2017 मध्ये नॅशनल हायवेची 7 आणि कर्नाटक राज्यातील 3 कामे इपीसीअंतर्गत सुरू आहेत.

महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेश, झारखंड, वेस्ट बंगाल, मालदिव, कर्नाटक, अरुणाचल, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात राज्यात कामे सुरू आहेत. बीओटीप्रमाणेच इपीसी योजनेत काम करणारी अशोका ही देशातील एकमेव कंपनी आहे, याचा आर्वजून उल्लेख करावासा वाटतो. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या दिल्ली-मेरठ वेर्स्टन पेरिफेरल एक्स्प्रेस वेचे काम अशोकाने पूर्ण केले. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे 910 दिवसांत पूर्ण करावयाचे काम आम्ही 480 दिवसांत पूर्ण केले.

आज देशात 21 राज्यांत अशोकाची कामे सुरू आहेत. 36 पीपीपी प्रोजेक्ट आम्ही करत आहोत. चेन्नई ते पाँडेचरी 113 किलोमीटरचा प्रोजेक्ट, कोलकाता ते खडकपूर 112 किलोमीटरच्या सहापदी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. स्पिड, क्वॉलिटी, सेफ्टी या त्रिसूत्रीवर आयएसओ मिळवणारी अशोका ही देशातील एकमेव कंपनी आहे. मार्चअखेर कंपनीकडे 12 हजार कोटींची कामे असून ती पुढील दोन वर्षांत पूर्ण होतील.

मालदिवचा 250 कोटींचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आम्ही हाती घेतला. आता कंपनीने रस्ते बांधणीनंतर सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद आणि कर्नाटकातील पाच गावांमध्ये हे काम सुरू झाले आहे. त्यानंतर रेल्वे पॉवर सेक्टर क्षेत्रात आम्ही प्रवेश केला आहे. कटनी ते बारा 100 किलोमीटर रेल्वे पॉवर लाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

आता अशोका मेडिकलच्या माध्यमातून नाशिकमध्ये सुसज्ज असे 300 बेडचे हॉस्पिटल लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल करत आहोत. अशोकाच्या सर्व प्रवासात अनेकांची साथ लाभली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!