सारसनगरच्या पाण्यावरून रण‘संग्राम’

0

शिवसेना-भाजपकडून राष्ट्रवादीची कोंडी, कोट्यवधींच्या उधळपट्टीनंतरही पाणीबाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- टँकरच्या पाण्यावर महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भार टाकणार्‍यांची पोलखोल करणार्‍या भाजपाच्या मदतीला शिवसेना धावून आली. सारसनगरच्या पाणी प्रश्‍नावर राष्ट्रवादीने महापालिकेवर मोर्चा काढून युतीला प्रत्युत्तर दिले. टँकरचालकाला मारहाण करून पाणी पुरवठ्यास व्यत्यय आणणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची खमकी भूमिका सेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी घेत राष्ट्रवादीची कोंडी केली आहे. राजकीय साठमारीत सारसनगरचे रहिवासी नळाच्या नव्हे तर टँकरच्या पाण्याची ‘वेटींग’ करत असल्याचे चित्र 12 वर्षानंतर आजही कायम आहे. 

शहरातील कोठी रस्त्यालगत असलेले सारसनगर 2000 सालात नगरपालिकेत समाविष्ट झाले. नगरपालिकेची महापालिका झाली तरी तेव्हापासून आजतागायत तेथे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या कार्यकाळात 2004 मध्ये सारसनगर व परिसरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी समर्थनगर येथे पाणी टाकी बांधण्याचा ठराव मंजूर झाला. महापालिका फंडातून ही टाकी बांधली गेली पण 12 वर्षानंतर अजूनही टाकीत पाणी पडले नाही.

वर किरकोळ खर्चासाठी टँकरच्या पाण्यावर उधळपट्टी केली जात आहे. समर्थनगरच्या पाणी टाकीवरून सारसनगरची डॉक्टर कॉलनी, भवानीनगर, चिपाडे मळा, माणिकनगर भागाला पाणी पुरवठा होणार होता. पण टाकीच कार्यान्वीत होत नसल्याने फेज टू पाणी योजनेंतर्गत शांतीनगर येथे जुन्या टाकी शेजारी पुन्हा नव्याने टाकी बांधण्यात आली. पण तीही अजून कार्यान्वीत झालेली नाही. त्यामुळे सारसनगरला टँकरने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.

टँकरवरील कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा हिशेब भाजप वकिल सेलच्या अ‍ॅड. राहुल रासकर यांनी मांडत महापालिकेत आंदोलन केले. त्यानंतर काही तासातच सारसनगरमधील टँकर बंद झाले. पाईपलाईनचे पाणी नाही अन् टँकरही बंद. भाजपच्या आंदोलनामुळेच हे झाले असे चित्र रंगविले गेले. वास्तविक समर्थनगरची पाणी टाकी कार्यान्वीत करा, मग टँकर बंद करा अशी साधी अन् सरळ मागणी रासकर यांनी केली होती. मात्र प्रशासनाने टाकी कार्यान्वीत न करता थेट टँकरच बंद करून टाकले. अर्थात प्रशासनाच्या आडून भाजपला बदनाम करण्याचा डाव राष्ट्रवादीने बरोबर खेळला. टँकर चालकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत पिटाळून लावल्याचा रासकर यांचा आरोप आहे. राष्ट्रवादी सासनगरच्या पाणी प्रश्‍नाचे राजकारण करत असल्याची टीका रासकर यांनी बोलताना केली.

महापालिकेत सेनेची सत्ता आहे. महापौर सुरेखा कदम यांच्याकडे सारसनगरमधील नागरिकांनी हा पाणी प्रश्‍न मांडला. त्यावर कदम यांनी प्रशासनाची कानउघडणी केली. गुंडगिरी करत टॅकर चालकास पळवून लावायचे अन् महापालिका पाणी पुरवठा करत नाही असा संदेश सारसनगर परिसरात द्यायचा ही राष्ट्रवादीची चाल महापौर कदम यांनी ओळखत तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची सुचना प्रशासनाला केली. टँकर चालकास कोणी अडविले तर सरळ पोलिसांत तक्रार करा अशी सक्त ताकीद कदम यांनी प्रशासनाला दिली.

महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यातच भाजपने सारसनगरच्या पाण्याचे श्रेय घेऊ नये यासाठी राष्ट्रवादी हा खेळ मांडत आहे. सेनेनेही त्यात उडी घेतली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सारसनगरचे पाणी बंद झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सारसनगरच्या पाण्याचे फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे.

सारसनगरला दोन महापौर अन् आता विद्यमान दोन आमदार राहतात. टँकरच्या पाण्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली. तेवढ्या पैशात सारसनगरची पाणी योजना कार्यान्वीत झाली असती. पण राष्ट्रवादीवाल्यांना ती सोडविता आली नाही. समर्थनगर व शांतीनगरची पाणी टाकी कार्यान्वीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.- भगवान फुलसौंदर, माजी महापौर.

महापालिकेच्या माथी भार –
सारसनगरच्या टँकरवर दररोज 12 हजार रुपये खर्च होत असताना तेथे कायमस्वरुपी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करणे राजकीय नेतृत्वाने कायमच दुर्लक्ष केले. महिन्याला साडेतीन लाख तर वर्षाला 40 लाख असा 13 वर्षातील सुमारे सहा कोटी रुपये खर्च सारसनगरच्या टँकरवर करण्यात आला. इतक्या पैशात तर नव्याने टाकी अन् पाईपलाईनही झाली असती. पण टँकर ठेकेदराच्या पोट भरण्याच्या उद्योगाला राजकिय वरदहस्त लाभल्याने वर्षानुवर्षे सारसनगरातील नागरिकांनी टँकरने पाणी पुरवठ्याचा भार महापालिकेला सहन करावा लागत आहे. 

तुंबड्याभरू राजकारणामुळे टंचाई –
नगरमध्ये ‘सोधा’चे राजकारण जोरात आहे. महापालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असो ‘सोधा’मुळे तुंबडी भरणार्‍यांचे कायमच फावले गेले. त्यामुळेच एक तप उलटून गेले तरी सारसनगरचा पाणी पुरवठा स्वावलंबी झाला नाही. टँकरच्या पाण्यावर झालेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी त्याच पैशातून सारसनगरचा पाणी प्रश्‍न कायम स्वरुपी सुटणे सहज शक्य होते, पण तो न सोडविता टँकर ठेकेदाराचे घर भरण्याचे काम पालिकेतील सत्ताधारी आजवर कायमच करत आले. ठेकेदाराच्या घरभरू भूमिकेसोबतच स्वत:चे खिसे भरले गेले अन् त्यामुळेच सारसनगरकरांना नळाच्या नव्हे तर टॅकरच्या पाण्याची वाट पाहण्याची वेळ आजही ओढावली गेली.

पाण्यासाठी महापालिकेवर काढला मोर्चा –
सारसनगरचे पाणी बंद केल्याच्या निषेधार्थ सारसनगरमधील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढत आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. सारसनगरला टँकरने पाणी सुरू असून ते टँकरही महापालिका प्रशासनाने बंद केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात सारसनगरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. सुरेश आंबेकर, धर्मा करांडे, समीर खडके, गुड्डू खताळ, दिनेश जोशी, भाऊसाहेब पांडुळे, स्नेहा जोशी, रुपाली जाधव, किरण कटारिया, प्रणव चोरडिया, सागर गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, विशाल चिपाडे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. 

LEAVE A REPLY

*