भंडारदरा 35 टक्के भरले, मुळात जोरदार आवक

0
दारणा निम्मे भरण्याच्या मार्गावर, गोदावरीत 2000 क्युसेक विसर्ग

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर) –उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात अद्यापही पावसाचा जोर टिकून असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नव्याने दाखल होत आहे. भंडारदरात दिवसभरात 305 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने धरणातील पाणीसाठा 3835 दशलक्ष घनफुटावर (35 टक्के) पोहचला.

गेल्या वर्षी याच काळात केवळ 700 दलघफू पाणीसाठा होता. तर मुळा नदीत 11152 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
गत चारपाच दिवसांत भंडारदरा पाणलोटात मान्सून सक्रिय असल्याने आद्रा नक्षत्राच्या सरी जोरदार बरसत आहेत. त्यामुळे धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे. काल रविवारीही जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे भातखाचरं पाण्याने तुडूंब झाली आहेत. कृष्णवंती नदीही दुथडी वाहत असून वाकी धरणातून 1574 ने ओव्हरफ्लो सुरू आहे. तसेच इतर ओढे-नालेही प्रवरा नदीत मिसळत असल्याने निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. काल या धरणातील पाणीसाठा 871 दलघफू होता.

पाऊस असल्याने भंडारदर्‍याचा काल आठवडे बाजारात इरले व घोंगड्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. मागणीही चांगली होती. दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाचा जोर कायम असून हरिश्‍चंद्र गड, कळसूबाईचे शिखर, आंबित, पाचनई, कोथडे या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने असून मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथून 6592 क्युसेकने मुळा धरणाकडे झेपावत असून धरणात प्रथमच या भागातील पाण्याची आवक रात्री सुरू झाली होती. यापूर्वी आवक झाली होती. ती पारनेरमध्ये झालेल्या पावसाची होती.धरणात सध्या 4904 दलघफू पाणीसाठा आहे.

गंगापूर 35 तर भावली 42 टक्के भरले

अस्तगाव (वार्ताहर)- नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या पाणलोटातील ओढे नाले पावसाने खळखळून वाहत आहेत. तसेच दारणा धरणाचा 550 क्युसेकचा विसर्गही या बंधार्‍यात दाखल झाल्याने या बंधार्‍यातून गोदावरी नदीपात्रात सुरु असलेला 600 क्युसेकचा विसर्ग काल रविवारी सकाळी वाढवून तो 1100 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो दुपारी 12 वाजता 2000 क्युसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीत 2000 क्युसेकने पाणी वेगाने वाहत आहे. दुसरीकडे दारणा धरण 45 टक्के भरले आहे. भावली 42 टक्के, तर गंगापूर धरण 34.23 टक्के भरले आहे.

दारणा च्या पाणलोटात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 37 मिमी, पाणलोट क्षेत्रातील घोटी येथे 81 मिमी, तर इगतपुरी येथे 74 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणात 887 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे सकाळी 6 वाजता 7149 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणाचा साठा 3248 दशलक्ष घनफूट झाला होता. हे धरण 45.43 टक्के भरले होते. या धरणातून 550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. दारणाच्या वीज प्रकल्पाच्या पाणी सोडण्याच्या गेट मधून पाणी सोडले जात आहे. काल सायंकाळी दारणाच्या वक्राकार दरवाजाच्या तळापर्यंत पाणी दाखल झाले होते. काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर काहिसा कमी झाला होता. पाऊस संततधार टिकून राहिला असता तर हे धरण निम्म्याहुन अधिक भरले असते.

भावली धरणाच्या परिसरात ही मुसळधार पावसाने पाण्याची आवक झाली. 24 तासांत या धरणाच्या पाणी साठ्यात 64 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. या धरणाच्या भिंतीजवळ 68 मिमी पावसाची नोंद झाली. 1434 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 595 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

गंगापूरच्या पाणलोटात मुसळधार!
गंगापूर धरणाच्या परिसरात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली. 181 मिमी पाऊस 24 तासांत नोंदला गेला. पाणलोटातील अंबोली येथे 227, त्रंबक येथे 142 मिमी असा पाऊस नोंदला गेला. त्यामुळे या धरणात जवळपास अर्धा टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. 5630 क्षमतेच्या या धरणात 1927 दशलक्ष घनफूट पाणीसाठा तयार झाला आहे. हे धरण 34.23 टक्के भरले आहे.

दारणातील 550 क्युसेकने पाणी नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यात सामावत आहे. तसेच या बंधार्‍याच्या पाणलोटातील नाशिक तसेच अन्य भागातील पाणी या बंधार्‍यात दाखल होत असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. रविवारी दुपारी 12 वाजता 1100 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग 2000 क्युसेक करण्यात आला आहे. या बंधार्‍याचे दोन वक्राकार दरवाजे अर्धा मिटरने वर उचलण्यात आले आहेत.

त्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. परवा कमी क्षमतेने पाणी सोडल्याने हे पाणी नदी पात्रातील खड्यात सामावले गेले. कोपरगाव पर्यंत काल सायंकाळ पर्यंत पोहोचले नव्हते. नांदुरमधमेश्‍वर ते जायकवाडीच्या बॅकवॉटर दरम्यान असणार्‍या सर्वच केटीवेअर च्या फळ्या काढून टाकण्यात आल्या असल्याने पाणी सरळ जायकवाडीकडे धावणार आहे. नेहमी प्रमाणे नाशिक तसेच नगर जिल्हा प्रशासनाने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अन्य धरणांचा साठा असा-कडवा 14.51 टक्के, आळंदी 5.46, कश्यापी 26.78, वालदेवी 7.85, गौतमी 14.27. 24 तासांत पडलेला पाऊस मिमी मध्ये असा- नाशिक 48, मधमेश्‍वर 15, देवगाव 5, आळंदी 46, कडवा 23, मुकणे 56, काश्यपी 103, गौतमी 115 मिमी. मुकणे तसेच भोजापूर या दोन धरणांचा उपयुक्त साठा शुन्य टक्केच आहे!

LEAVE A REPLY

*