भोजापूर ओव्हरफ्लोच्या पाण्यासाठी आंदोलन : चकोर

0

तळेगाव दिघे (वार्ताहर)-संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरलेले भोजापूर धरण पंधरा दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो होऊन देखील संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव भाग ओव्हरफ्लोच्या पाण्यापासून अद्याप वंचितच आहे. निमोण-तळेगाव भागास भोजापूरच्या ओव्हरफ्लोचे पाणी प्राधान्याने देण्यात यावे, अन्यथा तीव्र रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा, निमोण-तळेगाव परिसर विकास परिषदेचे नेते इंजि. हरिश्‍चंद्र चकोर यांनी दिला आहे.

भोजापूर धरण ओव्हरफ्लो होऊन पंधरा दिवस लोटले. मात्र भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी फक्त सिन्नर तालुक्यातील गावांनाच दिले जात आहे. वास्तविक संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव परिसरातील बारा गावांमधील तळे, पाझर तलाव, साठवण बंधारे व लपा तलावांमध्ये (पिंपळे) पूरपाणी सोडणे गरजेचे आहे.

मात्र नाशिक जलसंपदा विभागामार्फत संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव परिसर भोजापूरच्या पूरपाण्यापासून वंचित ठेवला जात आहे. या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर शासनाचा कोट्यवधी निधी खर्च होतो, असे असताना दुष्काळी भागात कालव्याद्वारे पूरपाणी मिळू न देणे संतापजनक आहे.

भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांना मिळवून देण्यासाठी त्या भागाचे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील व आग्रही राहत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना हक्काचे पाणी मिळत नाही.

निमोण-तळेगाव भागास भोजापूर धरणाचे पूरपाणी न मिळाल्यास रास्तारोको अंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निमोण-तळेगाव परिसर विकास परिषदेचे नेते इंजि. हरिश्‍चंद्र चकोर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*