पावसामुळे 44 टँकर घटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा ताण निम्म्याने हलका झाला आहे. जिल्ह्यात पाच ते सहा तालुक्यांत सुरू असणार्‍या सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या दमदार पावसामुळे 87 वरून थेट 43 वर आली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात 44 पाण्याचे टँकर कमी झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली.

पाऊस नसल्याने गेल्या 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात विदारक चित्र होते. विशेष करून सरकारी पाण्याच्या टँकरची स्थिती बिकट झाली होती. सुरू असणार्‍या पाण्याच्या टँकरचे लवकरच शतक होईल, अशी स्थिती होती. दुसरीकडे जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता. मात्र, गणपती बाप्पा सर्वांच्या मदतीला धावून आले. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे तीव्र पाणी टंचाई असणार्‍या नगर दक्षिण जिल्ह्यातील चित्र पालटले आहे. जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपूर्वी 87 ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू होते. त्यात 44 ने घट आली आहे. यामुळे टंचाईची तिव्रता निम्म्याने कमी होत सध्या केवळ 43 ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

सुरू असणारे टँकर

संगमनेर 9, नगर 8, पारनेर 4, पाथर्डी 16 आणि कर्जत 6 यांचा समावेश आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *