Type to search

Featured सार्वमत

पाणी बंद केल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष-अधिकार्‍यांत बाचाबाची

Share
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपगावातील नगरपरिषदेच्या तलावातील सोडण्यात आलेले पाणी बंद केल्याच्या कारणावरून काल जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे, अन्य उपस्थित असलेल्या नागरिकांत चांगलीच बाचाबाची झाली.

नांदूर मध्यमेश्वर बंधारा पूर्ण भरल्यानंतर गोदावरी डावा व उजव्या कालव्यात पिण्याचे पाण्याचे आवर्तन रविवारीपासून आवर्तन सुरू आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या तळ्यात निम्याप्रमाणे पाणी भरले असता, त्या फटकांना कुलूप जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी लावल्याची वार्ता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना कळताच त्यांनी शहरातील नरेंद्र मोदी विचार मंचाचे विनायक गायकवाड संजय कांबळे, अनिल गायकवाड, जितेंद्र रणशूर यांच्यासह उपस्थित असणार्‍या नागरिकांनी हे कुलूप तोडून साठवण तलाव भरून घेण्यासाठी गेट उघडले. त्याच काही वेळातच जलसंपदा विभागाचे अधिकारी मिसाळ हे आपल्या सहकार्‍यांसमवेत डाव्या कालव्या जवळ आले.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नरेंद्र मोदी विचार मंचचे विनायक गायकवाड त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय आढाव,संतोष चवडके, प्रकाश रूईकर यांच्यासह उपस्थित असलेल्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी हे कुलूप का तोडले? हे पाणी वैजापूरला जाऊ द्या.. तुमचं तळे काही प्रमाणात भरून दिले आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आमचे काम आम्हाला करू द्या, असे म्हणताच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे,अन्य उपस्थित असलेल्या नागरिकांबरोबर चांगलीच बाचाबाची झाली.

काही वेळाने जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, हे पाणी वैजापूरला जाऊ द्या. वैजापूरचे पाणी झाल्यानंतर येत्या 19 तारखेला जोपर्यंत तुमचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत तोपर्यंत सुरू असलेले पाणी बंद होणार नाही असे आश्वासन देऊन तसे लेखीपत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले व जलसंपदा अधिकार्‍यांनी उर्वरित गेटचे कुलूप खोलून पाणी कमी दाबाने कोपरगावच्या तळ्यात सोडले.

कालव्यांचे पाणी वाढविले
अस्तगाव वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, कालव्यातील पाणी वाढविण्यात आले आहे. सुरूवातीला उजव्या कालव्यातून 350 क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्यात वाढ करण्यात येऊन ते 500 क्युसेकपर्यंत नेण्यात आले आहे. डावा कालवा 200 क्युसेकने वाहत होता. त्यातही 100 क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, काल मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाणी अस्तगावपर्यंत आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!