पावसाळ्यातही पाणीटंचाई; पाच तालुक्यांना 21 टँकरने पाणीपुरवठा

0
नाशिक । जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने जुलैमध्ये सुरुवातीला विश्रांती घेत गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पावसाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने या भागात 21 टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे 43 टक्के भरली आहेत. मात्र सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण तालुक्यातील काही गावे आणि वाड्यांवर पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.

टंचाई आराखड्यानुसार 30 जूननंतर जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले. 30 जूननंतर टँकर सुरू करायचे असतील तर भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल मागवून त्यानंतरच त्या भागात टँकर सुरू केले जातात. त्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल मागवण्यात येऊन या तालुक्यातील 45 गावे, 23 वाड्या अशा एकूण 68 गावांना 21 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

बागलाणमध्ये भीषण स्थिती : बागलाण तालुक्यात जुलै महिना सुरू होऊनही पावसाने अवकृपा केली आहे. त्यामुळे तालुक्यातील 14 गावांना 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिरमाणी, सारद, राहूड, इजमाने, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, कातरवेल, नवेगाव, महाड या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मालेगाव, नांदगाव, सटाणा, चांदवड, येवला आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पालखेडमधून आवर्तन : पालखेड धरण समूहात 35 टक्के पाणीसाठा असून या धरणातून 450 दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येवला, मनमाड, रेल्वे जंक्शनसह 38 गावे, नांदगाव या तालुक्यांंची टंचाई जरा सुसह्य झाली आहे. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व गंभीरता मात्र संपलेली नाही.

सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान : मालेगाव तालुक्यातील जुलैचे सरासरी पर्जन्यमान 112 मि.मी. असून आजपर्यंत केवळ 15 मि.मी इतका पाऊस झाला आहे. नांदगावचे पर्जन्यमान 111 मि.मी. असून 47 मि.मी., चांदवड 145 मि.मी. इतके पर्जन्यमान असून 55 मि.मी., बागलाणचे पर्जन्यमान 97 मि.मी. असून 58 मि.मी. तर येवल्याचे जुलैचे पर्जन्यमान 107 मि.मी. असून 51 मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*