Type to search

Featured सार्वमत

उंबरे-सोनई पाणी योजनेला अधिकार्‍यांचाच ‘कोलदांडा’

Share

थकबाकीचे कारण देऊन योजना बंद; 19 गावांवर ‘पाणीबाणी’

उंबरे (वार्ताहर) – पाणीपट्टी थकबाकीचे कारण दाखवून उंबरे-सोनई-करजगाव पाणी योजना संबंधित अधिकार्‍यांनी बंद केली आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या राहुरी तालुक्यातील सुमारे 19 लाभार्थी गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या या 19 लाभार्थी गावांतील ग्रामस्थ व महिलांना आता हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ पायपीट करण्याची वेळ आली आहे. अधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी बंद केल्याने अधिकार्‍यांचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे.

ही योजना उंबरे परिसरातील सुमारे 19 गावांना जलसंजीवनी देणारी ठरली होती. त्यात उंबरेसह पिंप्री अवघड, ब्राम्हणी, सोनई, करजगावासह 19 गावांचा समावेश आहे. आता सर्वच गावांमध्ये भीषण दुष्काळ जाणावणार आहे. ही योजना एक वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती. मात्र, महिन्यापूर्वी तब्बल एक वर्षाचे सुमारे 9 लाख रुपयांहून अधिक रकमेचे बील उंबरे ग्रामपंचायतीला देण्यात आले. हे बील पाहून ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतीच्यादृष्टीने आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असून व ही रक्कम संबंधित अधिकार्‍यांनी अव्वाच्या सव्वा केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या या परिसरात भीषण दुष्काळ जाणवत आहे. मात्र, ही योजना सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटलेला होता. मात्र, आता ही योजना बंद झाल्याने ग्रामस्थांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पाणीच नसल्याने जनावरांची मोठ्या प्रमाणात तडफड सुरू झाली आहे. उंबरे परिसरात सध्या निचांकी पावसामुळे जलस्त्रोत आटले असून पिण्याचे पाणी कोठेही उपलब्ध नाही. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्याने आता पिण्याचे पाणी आणायचे कोठून? हा यक्षप्रश्‍न महिलांसमोर उभा राहिला आहे.

ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्याची योजना बंद करणे, हा अन्याय आहे. योजना बंद करण्यापूर्वी कोणत्याची प्रकारची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. एकीकडे शासकीय स्तरावर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जातात. मात्र, आडमुठे अधिकारी सुरू असलेल्या पाणी योजनेला खीळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे संतापजनक आहे. ही योजना पुन्हा तातडीने पूर्ववत सुरू झाली नाही तर ब्राम्हणी बसस्थानकासमोर राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर रास्तारोको करण्यात येईल.
– प्रकाश बानकर, सरपंच ब्राम्हणी.

राहुरी तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत झाल्यानंतर उंबरे गावात पाणीटंचाईमुळे शासनाने गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करून ग्रामस्थांची तहान भागविली होती. मात्र, सोनई-करजगाव या योजनेमुळे उंबरे गावाला नंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. आता ही योजना बंद झाल्याने पाणीटंचाई भासू लागली आहे. ही योजना सुरू होणार नसेल तर शासनाने ग्रामस्थांची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत.
– राजेंद्र अण्णासाहेब ढोकणे, सरपंच उंबरे. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!