प्रादेशिक पाणी योजनांचे 204 कोटींचे वीज बिल थकीत

0

पुढील आठवड्यापासून वसुलीसाठी जिल्हा परिषद घेणार कार्यशाळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 44 प्रादेशिक पाणी योजनांचे तब्बल 204 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा थकबाकी असणार्‍या गावांतील पदाधिकारी व पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकार्‍यांची कार्यशाळा घेऊन त्यांचे प्रबोधन करणार आहे.
जिल्ह्यात 44 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनांच्या माध्यमातून 391 गावे आणि वाड्या वस्त्यांवरील जनतेच्या घशाची तहान भागवण्यात येत आहे. या योजनांमुळे सुमारे एक लाख जनतेला पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. या 44 पाणी योजनांवर 87 हजार नळजोडणी देण्यात आलेली आहे. याठिकाणी प्रत्येक प्रादेशिक पाणी योजनेला स्वतंत्रपणे पाणीपट्टीचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. साधारण 600 रुपये ते 1400 रुपये प्रती नळ जोडप्रमाणे पाणी आकारण्यात येत आहे.
मात्र, या योजनांमध्ये जनतेकडून पाणीपट्टी भरण्याच्या अनास्थेमुळे योजनेकडील वीज बिलाचा भार वाढत आहे. वारंवार जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या देखभाल दुरूस्तीमधून वीज बिल भरण्यासाठी पाणी योजनांना मदत करण्यात आलेली आहे. मात्र, गावातील जनतेला याची सवय झाल्याचे थकबाकीवरून दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषदेने या प्रादेशिक पाणी योजनांचे पाणी घेणार्‍यांना जाग आणण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी आठवड्यापासून थकबाकी असणार्‍या पाणी योजनांच्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात येणार असून त्याव्दारे थकीत पाणीपट्टी भरण्यास पुढाकार घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे पाणीपट्टी थकण्याचे प्रमाण राहिल्यास भविष्यात या पाणी योजना सुरू न होण्याचा धोका आहे. या योजनांमध्ये 2 योजना बंद असून यात नेवासा तालुक्यातील चांदा व पाच गावे आणि पारनेर तालुक्यातील काताळवेढा या योजनांचा समावेश आहे.

तालुकानिहाय योजना  तालुकानिहाय योजना  राहाता 6, राहुरी 7, अकोले 9, पारनेर 3, शेवगाव 3, संगमनेर 2, नेवासा 6, नगर 2, कोपरगाव 4 आणि पाथर्डी 1 या योजनेचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*