Type to search

नालंदानगरच्या दलितांचे पाण्यासाठी बेमुदत उपोषण

Featured सार्वमत

नालंदानगरच्या दलितांचे पाण्यासाठी बेमुदत उपोषण

Share

देवठाण ग्रामपंचायत विरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा

वीरगाव (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील देवठाण गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या नालंदानगरमधील दलित वस्तीचे पिण्याचे पाण्याचे प्रचंड हाल सरू आहेत. वारंवार मागणी करूनही देवठाण ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने नालंदानगरमधील रहिवाशांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

पाच वर्षांपूर्वी या वस्तीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले. या टाकीत पाण्याच्या उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतने सहा महिन्यापूर्वी बोअर देखील मारला. या बोअरमध्ये त्वरीत वीज पंप बसवून पिण्यासाठी टाकीत पाणी साठविण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने या वस्तीतील नागरिकांनी अकोल्याच्या तहसीलदारांना 2 मे रोजी बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदन दिले होते.

8 मे रोजी देवठाण ग्रामपंचायत प्रशासनाने पत्राद्वारे काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्‍वासन दिले होते. 14 मे पर्यंत पाईपलाईन, पंप व इतर उपपाईपलाईन पूर्ण करून पिण्याचे पाण्याची अडचण सोडविण्याबाबत आश्‍वासित केले होते. परंतू कोणतीही कार्यवाही सुरु न केल्याने अखेर नालंदानगरातील रहिवाशांनी देवठाण गावात ग्रामपंचायत विरोधात उपोषण सुरु केले. पिण्याच्या पाण्यासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.

उपोषणात भाजपाचे नेते शिवाजी पाटोळे, केशव बोडके, कॉ. तुळशिराम कातोरे, रामभाऊ गायकवाड, विश्‍वनाथ गायकवाड, प्रभाकर गायकवाड, अर्जुन गायकवाड, शामकांत गायकवाड, गौतम गायकवाड, जालिंदर बोडके, संपत गायकवाड, स्वप्निल गायकवाड, रवींद्र गायकवाड, लक्ष्मण गायकवाड यांच्यासहित नालंदानगरमधील सर्व रहिवाशांनी भाग घेतलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपचे नेते शिवाजी पाटोळे यांच्याकडून भ्रमणध्वनीवरुन या आंदोलनाबाबतची माहिती घेतली. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे आंदोलन गांभीर्याने घेत नसल्याची तक्रार पाटोळे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

देवठाणचे आढळा धरण हाकेच्या अंतरावर असूनही गिर्‍हेवाडी, गांगडवाडी, पथवेवाडी, खडकेवाडी, माशेरेवाडी, देवाचीवाडी या ठिकाणच्या आदिवासींना महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यातच आता नालंदानगरमधील दलित वस्तीचाही पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला. धरणातले पाणी दिसत असूनही पाण्यावाचून घसे मात्र कोरडेच असल्याने आता पाण्यासाठी हळूहळू नागरिकांनी उपोषणाचा सनदशीर मार्ग अवलंबिला आहे. वेळीच तोडगा न निघाल्यास पाण्यासाठीचे आंदोलन मात्र अधिक तीव्रतेने पेटण्याची शक्यता आहे.

48 तासांत कार्यवाही करू
कडाक्याच्या उन्हात उभे राहून नालंदानगरमधील बोअरवेल आणि पाईपलाईनचे काम पूर्ण केले. लोकांची पाण्याची अडचण होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. परंतु पाईपलाईन आणि इतर अनुषंगिक बाबींचा आराखडा वारंवार पत्रव्यवहार करूनही लघुपाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी दिला नाही. तीनवेळा पत्रव्यवहार आणि वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 10 मे रोजी आराखडा मिळाला. बोअरवेलसाठी विजेचा पंप आणि पाईप खरेदी केली असून 48 तासांच्या आत हा पाणीप्रश्‍न सोडविण्यात येईल.
– डी. एन. नवले (ग्रामविकास अधिकारी देवठाण)

एकजण अत्यवस्थ
उपोषणकर्त्यांपैकी प्रभाकर गायकवाड (वय-55) यांना बुधवारी दुपारी 4 वाजता त्रास जाणवू लागला. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना अकोले येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले गेले.

नालंदानगरमधील दलितांना पिण्यासाठी पाणी नाही. देवठाण ग्रामपंचायत प्रशासन हेतुपूर्वक याकडे दुर्लक्ष करते. तहान भागविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी वाहून आणावे लागते. अशुध्द पाणी शरीरात जात असल्याने वस्तीतील दलितांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत.ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य खात्याने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र संघर्षाची आमची तयारी आहे.
– रामभाऊ गायकवाड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!