. . अन् रेल्वेतही ‘टीप टीप बरसा पाणी’

पंचवटी एक्सप्रेसचे डबे गळायला लागल्याने प्रवाशांत असंतोष

0
मनमाड।  पावसाळ्यात घर, इमारत, रिक्षा व एसटी बस यांची छते गळत असल्याचे ऐकले असाल पण प्रवाशांची लाइफ लाईन समजली जाणारी तसेच रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारी सुप्रसिध्द असलेल्या ट्रेनचे डबे गळत असल्याचे म्हटल्यास त्याच्यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही.

मात्र, अशी परिस्थिती मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसवर आली असून या गाडीचे काही डब्याच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने भिजत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून गळत असलेले डबे काढून दुसरे डबे जोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मनमाड येथून सकाळी सहा वाजता सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे जाण्यासाठी सोयीची असल्याने त्यातून रोज मनमाडसह येवला, मालेगाव, नांदगाव, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी येथून रोज सर्व सामान्य प्रवाशांसह मोठ्या संख्येने व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी आदी प्रवास करतात.

या सर्वांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही हक्काची गाडी मानली जाते. सदर गाडीचे महत्व लक्षात घेता रेल्वे प्रशासाने पंचवटी एक्स्प्रेसला सुपरफास्टचा दर्जा देवून तिकीट व सीजन पासच्या दरात वाढ करण्यात आली. गाडी वेळेवर इच्छितस्थळी पोहोचणारी असल्यामुळे प्रवाशांनी देखील या दर वाढीला कोणताही विरोध केला नाही. मात्र गेल्या काही काळापासून पंचवटी एक्स्प्रेस ने प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता तर पावसळ्यात या गाडीचे चक्क डबे गळू लागल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली असून भिजत प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

गाडीच्या डब्यातून ठिकठिकाणी पाणी गळत असल्याने सामान ही भिजू लागल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी वजा असंतोष पसरला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने गळके डबे बदलून दुसरे चांगले डबे जोडण्याची मागणी केली आहे.

एकीकडे प्रवाशांच्या सोयी साठी अनेक ठिकाणी मेट्रो ट्रेन सुरु करण्यात आली तर बुलेट ट्रेन सुरु होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे मात्र पंचवटी सारख्या महत्वाच्या व रेल्वे प्रशासनाला भरमसाठ उत्पन्न देणार्‍या गाडीचे डबे पावसळ्यात गळत असल्याचे पाहून ज्या गाड्यांतून सध्या मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात त्यांची सुधारणा करा व नंतर बुलेट ट्रेन सुरु करा असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*