पुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा

0
बंधार्‍यातील पाणी सोडण्यात येणार असल्याने शेती उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत हे पाणी सोडू नये यासाठी शेतकर्‍यांनी नाऊर बंधार्‍यावर असा ठिय्या मांडला होता.

पुणतांबा, नाऊर (वार्ताहर) – बंधार्‍यांतील पाणी मराठवाड्यासाठी पुन्हा सोडण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष धुमसत आहे. हे पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी काल पुणतांबा आणि नाऊर बंधार्‍यांवर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला होता. पाणी सोडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ असा इशारा नाऊर, मातुलठाण येथील शेतकर्‍यांनी दिला. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पोलिसांपुढे पेच उभा राहिला आहे. यावर अधिकारी कसा तोडगा काढतात, यावरच पुढे सर्वकाही अवलंबून आहे. 

 भंडारदर्‍यातून पाणी सोडणे बंद करावे –
मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडणे पूर्णपणे बंद करण्यात यावे अशी मागणी लाभक्षेत्रातून होत आहे. 11039 दलघफू क्षमतेचे हे धरण यावर्षीही तुडुंब भरले होते. पण निळवंडेतून पाणी जोरदार निघावे यासाठी हे धरण ओव्हरफ्लो करण्यात आले. त्यानंतर आवर्तन आणि मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी खर्च झाले आहे. आता धरणात केवळ 4780 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. अजून साडेसात महिन्यांचा कालावधी जायचा आहे. आता जर असेच पाणी सुटत राहिले तर भविष्यात मोठा प्रश्‍न उभा राहण्याची शक्यता असल्याने हे पाणी बंद करण्यात यावे अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. 

LEAVE A REPLY

*