आवर्तनाच्या नियोजनाअभावी शेतकरी हतबल

0
समशेरपूर (वार्ताहर) – रब्बी हंगामाच्या प्रारंभीच जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, देवठाण, मुळा, आंबीत, भोजापूर या धरणांच्या पाणीसाठ्यांचे नियोजन जलसंपदा विभागाने जाहीर करून लाभधारक शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. मात्र अकोले तालुक्यातील उत्तर भागातील सांगवी व पाडोशी या धरणाच्या आवर्तनांचे नियोजन अद्यापही जलसंपदा विभागाने जाहीर न केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे.
पाणी किती? केव्हा मिळणार याची खात्री नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे लाभधारक सावरगाव पाट, समशेरपूर, घोडसरवाडी, नागवाडी, टाहाकारी, केळी रुम्हणवाडी, सांगवी या गावांच्या लाभधारक शेतकर्‍यांनी आवर्तनाचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.
गतवर्षी सांगवी व पाडोशी धरणाचे पाणी निवडणूक रणधुमाळीत सापडल्याने पाण्याला राजकीय रंग लागला. पाणलोट व लाभधारक यांच्यात संघर्ष पेटला आणि पाण्याची नासाडी करून लाभ क्षेत्रातील शेती व शेतकरी जाळून टाकला. त्यामुळे चालू वर्षीच्या नियोजनाबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
आढळा नदीवर 145.56 दशलक्ष घनफूट क्षमतेचे पाडोशी व 71.23 दशलक्ष घनफूट क्षमतेचे सांगवी अशी दोन धरण आहेत.
धरण लोकार्पण समारंभात माजी आदिवासी विकासमंत्री मधुकराव पिचड यांनी पाच आवर्तनांची खात्री देऊन समशेरपूर परिसर बारमाही झाल्याची घोषणा केली होती. परंतु वास्तवात ते मृगजळ ठरून लाभधारक क्षेत्रात असंतोष उफाळला आहे. गत वर्षी 15 डिसेंबर पहिले आवर्तन सोडले होते.
दुसर्‍या आवर्तनांचे पाणी असूनही पाणी वादग्रस्त ठरुन ते सडवून टाकले आणि लाभक्षेत्रातील शेती व शेतकरी जाळून टाकला. पाडोशी व सांगवी धरणात आज अनुक्रमे 123.35 व 69. 16 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचे नियोजन झाल्यास रब्बी हंगाम पूर्ण शेतकर्‍यांच्या हाती लागेल. त्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन लवकर जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

सांगवी व पाडोशी संयुक्त नियोजन करून 10 जानेवारीपर्यंत पहिले व 15 फेब्रुवारी पर्यंत दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन झाल्यास, कांदा, गहू, हरबरा व अन्य पिके पूर्ण हाती लागतील व नुकसान होणार नाही.
– लक्ष्मण नेहे, शेतकरी, सावरगाव पाट

अद्याप आवर्तन सोडण्याबाबत नियोजन झालेले नाही. शेतकर्‍यांचे पाणी मागणी अर्ज आल्यानंतर आमदार सभापती, पाणी कमेटी व शेतकरी यांची बैठक घेऊन सर्वानुमते नियोजन करुन आवर्तन सोडण्यात येईल.
– जी. जी. थोरात, जलसंपदा अधिकारी, अकोले

LEAVE A REPLY

*