‘वॉटर बेल’ झाली पाणी पिण्याची वेळ !

jalgaon-digital
2 Min Read

श्रीगोंद्यातील कौठा शाळेत उपक्रमास सुरुवात

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- केरळमधील सरकारी शाळांनी मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी एक नवीन अभियान सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी ‘वॉटर ब्रेक’ देण्यात येतो. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत अनोखा ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या शाळेत नियमित ‘वॉटर बेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबविणारी ही शाळा पहिली ठरली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थी अति टीव्ही पाहण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात पाणी कमी पितात. परिणामी पाण्याची कमतरता आणि डीहायड्रेशनमुळे अनेक मुलं आजारी पडतात. त्यामुळे ‘वॉटर बेल’ या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जेणेकरून विद्यार्थी पुरेसे पाणी पितील आणि निरोगी राहतील असा यामागचा उद्देश आहे.

केंद्रप्रमुख दिलीप घोडके, शाळेचे मुख्याध्यापक सोपान जाधव, शिक्षक संजय शिंदे, धोंडिबा जगताप, श्रीमती गायकवाड, श्रीमती जया शिंदे, श्रीमती शैला गावडे व श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष परकाळे यांच्या संकल्पनेतून आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश परकाळे तसेच सुभाष परकाळे, आर्वी अनगरे चे ग्रामसेवक शेख व आर्वी पुनर्वसनचे मुख्याध्यापक शरद गावडे व कौठा केंद्रातील सर्व शिक्षक व सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. शाळा भरल्यानंतर दर दोन तासांनी ही ‘वॉटरबेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांनी दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यावे यासाठी शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *