Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हक्काच्या पाण्यासाठी बेलापुरातून एल्गार

Share

आज प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बेलापूर (वार्ताहर)- पूर्वीच्या काळी भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या ओलिताखाली 54 हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतीला पाणी मिळायचे. त्यावेळी भंडारदरा धरणातील उपलब्ध पाण्यात पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे एकत्रित असे प्रत्येक महिन्याला आवर्तने व्हायची, मग आता असे काय झाले की भंडारदार्‍यासह निळवंडे भरलेले असताना लाभ क्षेत्र पाण्यापासून वंचीत राहते. याचा हिशोब पाटबंधारे विभागाने दिला पाहिजे, त्यात प्रस्तावित प्रोफाईल वॉल म्हणजे पूर्वभागाच्या कबरी ठरणार असल्याने त्या रद्द कराव्यात अशी संतप्त मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकर्‍यांनी केली आहे.

भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी लाभक्षेत्राला मिळावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीने आंदोलन पुकारले असून त्याचा एल्गार बेलापुरात दि. 17 रोजी करण्यात आला. त्यात अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विचारविनिमय सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य अरुण नाईक होते. यावेळी सुधाकर खंडागळे, बाजार समिती संचालक सुधीर नवले, पत्रकार देविदास देसाई, माजी सरपंच भरत साळुंके, अशोकाचे संचालक अभिषेक खंडागळे, पढेगावच्या सरपंच किर्ती लिप्टे, डॉ. सुधीर क्षीरसागर, जालिंदर कुर्‍हे, जि.प. सदस्य शरद नवले, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब तोरणे, पत्रकार मिलिंद साळुंके, अच्युत भांड, अच्युत बडाख, सुरेश ताके, जितेंद्र भोसले, चंद्रकांत उंडे, अरुण नाईक आदींनी आपले मनोगते व्यक्त केले.

तर व्यासपीठावर वरील मान्यवरांसह भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नाईक, अनिता भोसले, देवयानी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. ओझरपर्यंत प्रवरा नदी बी कालवा घोषित केलेली आहे. त्यामुळे कालव्यात बांध घालता येत नाही. पण तरीही राजरोसपणे या कालव्यात बेकायदेशीर बंधारे, विहिरी खोदण्यात आल्या आहेत. पुर्वी धरण भरलेले असतांना महिन्याला आवर्तन व्हायचे, आता ते कालबाह्य झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त उपसा करता यावा म्हणून शेतीचे व पिण्याचे आवर्तन जाणीवपुर्वक स्वतंत्र सोडण्याची प्रथा सुरू झाली आहे.

धरणाच्या प्रकल्प अहवालात प्रोफाईल वॉलची तरतुद नसतांना नदीची झिज होते, या नावाखाली सत्तेच्या बळावर प्रोफाईल वॉल करण्याचा घाट घातला जात आहे. हक्काचे पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनधीना घेराव घालणे, पिण्याचे व शेतीचे आवर्तन एकत्र सोडावे, आताच नदीला आणि पाटाला पाणी येत नाही त्यामुळे प्रस्तावीत 29 प्रोफाईल बंधार्‍यांना परवानगी देवू नये. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सुत्रसंचलन गोविंद वाबळे यांनी केले.

प्रवरा नदीपात्राच्या कालव्यात बेकायदेशीरपणे बांधलेले बंधारे, विहिरी नष्ट करण्याची कार्यवाही करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवार दि. 19 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांच्या वतीने सकाळी 10 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुरेश ताके व जितेंद्र भोसले यांनी जाहीर केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!