Friday, May 3, 2024
Homeनगरवाकडीची ग्रामसभा खंडेराय देवस्थान विश्वस्त, तंटामुक्ती विषयावर गाजली

वाकडीची ग्रामसभा खंडेराय देवस्थान विश्वस्त, तंटामुक्ती विषयावर गाजली

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील वाकडी येथील ग्रामसभेत खंडेराय देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून नवीन ट्रस्ट नियुक्ती व तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड या विषयांवर ग्रामसभा सुरुवातीला खेळीमेळीत, मध्यंतरी बाचाबाचित व शेवटी वादात पार पडली असताना तंटामुक्ती अध्यक्षपदी दिलीप लहारे तर बाळासाहेब कोते, अनिल कोते, जालिंदर लांडे या तब्बल तिघांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच डॉ. संपतराव शेळके होते.

- Advertisement -

वाकडी येथील ग्रामसभा करोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर घेण्यात आली. खंडेराय देवस्थान विश्वस्त व तंटामुक्ती अध्यक्ष असे दोन प्रतिष्ठेचे विषय असल्याने सर्व नेते मंडळींसह शेकडो ग्रामस्थ्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. या ग्रामसभेच्या दोन दिवसअगोदर चारही गटाच्या वरिष्ठांकडून ग्रामसभेत आपापल्या उमेदवाराच्या समर्थनासाठी काही कार्यकर्त्यांच्या मदतीने मध्यरात्रीपर्यंत जणू काही प्रचार मोहीमच काढण्यात आली होती. चारही गटांचे नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह गटागटाने उपस्थित होते.

सुरुवातीला घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे, पाणीप्रश्न यासह विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर खंडेराय देवस्थान ट्रस्ट घटना दुरुस्ती करून विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन विश्वस्त नेमणूक विषय निघताच यावर बहुतेक वेळ खूप चर्चा, वादसंवाद झाला. यावेळी खा. डॉ. सुजयदादा युवा मंचचे अध्यक्ष संदीपानंद लहारे यांनी खंडेराय देवस्थान ट्रस्ट घटना दुरुस्ती वाचन करून मांडलेल्या ठरावामध्ये सदस्य हा वाकडी गावचा रहिवाशी असावा, सामाजिक कार्याची आवड असावी, दर पाच वर्षांनी नवीन निवड करावी, एकूण 21 विश्वस्तांची नेमणूक असावी, निवड ही ग्रामसभेतून बंधनकारक राहील, सरपंच पदसिद्ध विश्वस्त राहतील, सचिव पदाची नियुक्ती करावी, पदाधिकारी व तहहयात असे सर्व मुद्दे अटी बंधनकारक राहणार नाही, महिला सहभाग बंधनकारक राहील, वाघे-मुरळी यांचा प्रतिनिधी विश्वस्तात घेणे बंधनकारक राहील आदी घटना दुरुस्तीचे ठराव मांडण्यात आले असून सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला. त्यास शिवसेनेचे महेश जाधव यांनी अनुमोदन दिले.

खंडेराय देवस्थान विश्वस्तांमध्ये सर्वसामान्यांना सहभागी करून सर्वसमावेशक सहभाग कसा असावा याविषयी सूचक वक्तव्य गणेशचे संचालक अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके यांनी केले. त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी सुरुवातीला कोल्हे गटाचे दिलीप लहारे, काळे गटाचे अनिल कोते, खा. डॉ. सुजयदादा युवा मंचचे जालिंदर लांडे तर उपाध्यक्षपदासाठी विखे गटाचे बाळासाहेब कोते यांच्या नावाची सूचना आल्यावर काही वेळ ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला. पोलिसांसमोर सुमारे एक तास चाललेल्या गोंधळात शेवटी कोल्हे गटाचे दिलीप लहारे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी तर विखे गटाचे बाळासाहेब कोते, काळे गटाचे अनिल कोते, खा. डॉ. सुजयदादा युवा मंचचे जालिंदर लांडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, विठ्ठलराव शेळके यांनी शेतीला अवेळी होणारा वीज पुरवठा, शेतीविषयक प्रश्न, निकृष्ट रस्ते, निळवंडे कालवे विषय, गोदावरी आवर्तन या विषयांवर ठराव घेण्याची सूचना केली असता बहुतेक नेतेमंडळींना यात रस दिसला नाही. कारण या ग्रामसभेत दोन नेतृत्वाचे विषय असल्यामुळे काहींना सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची वाटली, असे या ग्रामसभेत स्पष्ट चित्र दिसले.

यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. संपतराव शेळके, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, शिवाजीराव लहारे, राजेंद्र लहारे, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे, शितलताई लहारे, अनिल कोते, सुरेश लहारे, संपतराव लहारे, अण्णासाहेब कोते, अनिल शेळके, संजय शेळके, अभय शेळके, संदीप लहारे, पोपट लहारे, गोरख कोते, अमित आहेर, बाबासाहेब शेळके, सुनील कुरकुटे, बापूसाहेब लहारे, नारायण शेळके, अ‍ॅड बाळासाहेब कोते, महेश जाधव, सुभाष कापसे, भाऊसाहेब लहारे, अनिल गोरे, आलेश कापसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी फौजफाट्यासह बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या