देवळाली कॅम्पला आधार केंद्राची प्रतीक्षा

0
नाशिक | दि. ३ प्रतिनिधी- देवळाली कॅम्प परिसरात आधार कार्ड केंद्र नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून परिसरात आधार केंद्र उभारण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. देवळाली कॅम्प या परिसरानजिक अनेक खेडे असून तसेच लष्कर भाग असल्याने अनेकांना महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड जरुरीचे झाले आहे. तसेच येथे दिवसागणिक लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे.

या परिसरात आधार कार्ड केंद्र नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आता प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड सक्तीचे झाले आहे. आधारद्वारे सरकारी व बिगर-सरकारी सेवा, अनुदान लाभ, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, सामाजिक लाभ, बँकिंग सेवा, विमा सेवा, कर आकारणी सेवा, शिक्षण सेवा, रोजगार, आरोग्य देखभाल इत्यादी विविध सेवा दिल्या जात असल्यामुळे आर्थिक तसेच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे.

गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसेच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसेच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे.

काही ठिकाणी आधारा कार्ड लिंक करण्याची तारीख ३१ डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आधी आधार लिंक न करणार्‍यांना अनेक तोट्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याआधी आधार केंद्र परिसरात होणे गरजेचे आहे. आधार कार्ड नवीन काढणे, लिंक करणे, पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलणे, यासह विविध त्रुटी बदलण्यासाठी शहरात आधार कार्ड केंद्रावर ये -जा करावी लागते, परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना शहरातील आधार कार्ड केंद्रावर ये- जा करावी लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तातडीने विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्ड केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

मी वर्षभर रेशन दुकानातून वस्तू घेत असतो. मात्र येथेही आधारकार्ड आवश्यक असल्याने तसेच देवळाली परिसरात केंद्र नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. कारण मला नवीन वर्षात सबसिडी नाही मिळणार.
-सुरेश लोणे, शिगवे बहुला

माझे बँकेत खाते आहे. मात्र बँकेतही खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे नाहीतर खाते बंद होईल. असे बँकेवाल्यानी सांगितले. तसेच जवळपास केंद्र नसल्याने तसेच शहरात कामधंदा मोडून वेळ वाया घालूनही नंबर लागत नाही व ताटकळत उभे रहावे लागते..
– पारस घोडके, दे.कॅम्प

* मी एक माजी सैनिक आहे. माझ्याबरोबर अनेक सैनिकांना विविध कामांसाठी आधारकार्डची गरज भासत आहे. त्यातच सैनिकांना शहरात जाऊन दिवसभर रांगेत उभे राहयला वेळच मिळत नसल्याने तसेच पासपोर्ट, मोबाइल, रेशनकार्ड मुलांच्या शिक्षणासाठी आधार कार्ड सक्तीचे झाले असल्याने देवळाली कॅम्प परिसरात आधार केंद्र हवे.
– दीपक बेरड, माजी सैनिक

LEAVE A REPLY

*