नेवासा नगर पंचायतीसाठी शांततेत 81.40 टक्के मतदान

0

सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहामुळे मोठी गर्दी
प्रभाग 9 मध्ये सर्वाधिक 90 टक्के तर प्रभाग 10 मध्ये सर्वात कमी 73 टक्के मतदान

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – येथील नगर पंचायतीसाठी काल बुधवारी शांततेत 81.40 टक्के मतदान झाले. एकूण 14 हजार 30 पैकी 11 हजार 420 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.दरम्यान, 26 मे रोजी नवीन तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
सकाळपासूनच सर्व प्रभागांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच गर्दी राहिल्याने दुपारी एक वाजेपर्यंतच जवळपास 60 टक्क्यांपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नेहमी सायंकाळी मतदानासाठी गर्दी होते. मात्र नेवाशात सकाळीच अधिक गर्दी झाली होती व दुपारनंतर फारशी गर्दी नव्हती. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडावे यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संवेदनशील असलेल्या प्रभाग 8 मध्ये सर्वाधिक बंदोबस्त लावण्यात आला होता.
माजी सरपंच व प्रभाग 12 चे उमेदवार नंदकुमार पाटील, माजी सरपंच कांताबाई गायके, प्रभाग 14 च्या उमेदवार मनीषा मापारी, सीमा राजेंद्र मापारी, प्रभाग 1 च्या उमेदवार योगिता पिंपळे, शरदिनी देशपांडे, प्रभाग 2 च्या अनिता चक्रनारायण, शालिनी सुखदान, प्रभाग 3 लक्ष्मण जगताप, नितीन दिनकर आदींसह बहुसंख्य उमेदवारांनी प्रारंभीच सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, राजेंद्र गुगळे, जनार्दन जाधव आदींसह विविध राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्त्यांनी विविध केंद्रांवर भेटी दिल्या.
दुपारी 12 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी मतदान केंद्राबाहेरच्या बूथवर जाऊन पाहणी व तपासणी केली.
निवडणूक निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असलेले उपविभागीय अधिकारी वामन कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश गांगोडे, नेवाशाचे मुख्याधिकारी संदीप भोळे आदी लक्ष ठेवून होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली नगरहून आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत उमेदवारासह कोणालाही मतदारांशिवाय आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. आत वाहन नेण्यासही सर्वांना रोखण्यात आले.

अधिक अंतरामुळे अनेक वृद्ध मतदानापासून वंचित

मतदान केंद्रापासून काही ठिकाणी जवळपास पाऊण किलोमीटर पायी जावे लागत होते. दुपारी 4 वाजता एका बिछान्यावरील रुग्ण मतदारास मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्याला तिथे पोहोचण्यासाठी वाहन तिथपर्यंत घेऊन जाण्याची विनंती वरिष्ठ अधिकार्‍यांना करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही सवलत देण्यास नकार दिल्याने त्याला मतदानापासून वंचित रहावे लागले. अशाचप्रकारे कॉलेज परिसरातील सेंट मेरी स्कूलमध्ये असलेल्या प्रभाग 5 व 6 च्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यास जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरापासूनच वाहने आत नेण्यास मज्जाव केला गेला. त्यामुळे अनेक वृद्ध मतदारांना भर उन्हात जावे लागले तर काहींनी मतदान न करणे पसंत केले.

नेवाशातील प्रभागनिहाय मतदान टक्केवारी

प्रभाग मतदान ठिकाण एकूण झालेले टक्के
क्र. मतदार मतदान

1 जि. प. शाळा (मुली) 855 654 76.49
2 जि. प. शाळा (मुले) 877 744 83.88
3 जि. प. शाळा (मुले) 1186 950 80.10
4 जि.प.शाळा मध्यमेश्‍वरनगर 837 685 81.84
5 सेंट मेरी स्कूल 436 389 89.22
6 सेंट मेरी स्कूल 932 745 79.94
7 मुलींचे शासकीय वसतिगृह 700 566 80.86
8 जि. प. शाळा गंगानगर 676 504 74.56
9 जि. प. शाळा पुर्वमुखी इमारत 250 225 90.00
10 कन्या विद्यालय खोली नं. 1 902 656 72.73
11 कन्या विद्यालय खोली नं. 4 1002 826 82.44
12 ज्ञानोदय स्कूल खोली नं. 2 1190 1028 86.39
13 ज्ञानोदय स्कूल खोली नं. 5 744 601 80.78
14 जि. प. शाळा (मुलींची) 1017 825 81.12
15 जि.प. शाळा दारुंटे मळा 599 539 89.98
16 ज्ञानोदय इंग्लिश स्कूल 1130 888 78.58
17 जि. प. शाळा मारुतीनगर 687 595 86.61

एकूण 14030 11420 81.40

LEAVE A REPLY

*