Type to search

Featured

ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाचा समृद्धी मार्ग

Share
कोणत्याही शहराचा, जिल्ह्याचा विकास करायचा असल्यास तेथील पायाभूत सुविधांचा विकास होणे खूप महत्त्वाचे असते. आज आपल्या देशाची परदेशाशी तुलना झालेली पाहतो. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युरोप किंवा अन्य देशांमध्ये गेल्यावर तेथील रस्त्यांचे, तेथे उपलब्ध सुविधांचे नेहमी कौतुक होते. त्याचे कारणही तसेच आहे. त्या देशांनी आपल्या पायाभूत सुविधांवर प्रकर्षाने भर दिला म्हणून आज ते देश पुढारलेले आहेत. आपल्या देशातही अशा साधनांचा विकास होतोय हे महत्त्वाचे. त्यातीलच एक नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग. विकासाचे नवे दालन उघडणारा एक महामार्ग म्हणून या महामार्गाकडे बघितले जाते.

विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून जाणार्‍या या महामार्गामुळे जिल्ह्याच्या कृषी विकासासोबतच येथील औद्योगिक विकासाला निश्चितपणे बळकटी मिळेल यात शंका नाही. समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबईदरम्यान 10 जिल्ह्यांतून जाणार आहे. जवळपास 26 तालुके व 392 गावांचा थेट संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी 16 तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येईल. नाशिक जिल्ह्यातून सिन्नर आणि इगतपुरी या तालुक्यातून 101 किलोमीटरच्या या महामार्गासाठी इगतपुरी तालुक्यात 468 हेक्टर आणि सिन्नर तालुक्यात 725 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. या प्रकल्पाला शेतकर्‍यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, निश्चितपणे हा महामार्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवी कलाटणी देणारा ठरेल.

औद्योगिक विकास
कृषी क्षेत्राबरोबरच नाशिक एक औद्योगिक हब म्हणून उदयास येत आहे. अनेक नामवंत कंपन्या नाशिकमध्ये आहेत. ‘मेक इन इंडिया’ ‘मेक इन महाराष्ट्र’आणि ‘मेक इन नाशिक’ या माध्यमातून अनेक कंपन्यांनी नाशिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भविष्यात येथील औद्योगिक विकासाला मोठी गती प्राप्त होणार आहे. इगतपुरीमध्ये मोठी औद्योगिक वसाहत आहे, तर सिन्नर औद्योगिक हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सिन्नरमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) ही प्रस्तावित आहे. मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत विकसित होत आहे.

या महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), निफाड येथील ड्रायपोर्ट आणि मुंबईचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणे एकमेकांना जोडली जातील. याचा फायदा सिन्नर आणि इगतपुरीबरोबरच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला होणार आहे.

अनेक नवीन उद्योग येण्याबरोबरच कृषीपूरक उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे. उद्योगांमुळे रोजगारनिर्मिती होईल. निर्यातीला चालना मिळेल आणि पर्यायाने एकूणच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्यास मदत होईल.

रोजगारनिर्मिती
हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर या माध्यमातून निर्माण होणार्‍या सुविधांतून रोजगार तर मिळेलच, परंतु 100 किलोमीटरच्या या महामार्गासाठी लागणारे गौण खनिज, वाहतूक, बांधकाम मजूर, यंत्रसामुग्री, कुशल, अकुशल मनुष्यबळ, रस्ते काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते देखभाल, दुरुस्ती, टोलनाके, वृक्षारोपण याद्वारेदेखील मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.

नवनगरे विकास
नवीन आधुनिक शहरे या महामार्गावर वसवली जाणार आहेत. यात कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतकरी-ग्राहक जोडले जातील. जेणेकरून कृषी आधारित अर्थव्यवस्था मजबूत होईल. जिल्ह्यात इगतपुरीतील तळेगाव, देवळे, कवडदरा, सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित आहेत. परंतु शेतकरी जमीन देण्यास तयार असतील तर या नवनगरांचा विकास केला जाईल. यात 30 टक्के जमीन ही बिनशेती प्लॉटच्या स्वरूपात शेतकर्‍यांना दिली जाईल, तर उर्वरित प्लॉट व्यावसायिकांना दिली जाईल. स्थानिक गरजा लक्षात घेऊन एक सुनियोजित शहर विकसित करायचे हा या मागचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे येथे नवीन उद्योग, कृषीपूरक उद्योगांना चालना मिळू शकेल. ज्यातून नवउद्योजक तयार होतील. या नवनगरांमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे.

जिल्ह्यातून तीन इंटरचेंजेस देणार
या महामार्गाद्वारे प्रवास करण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन इंटरचेंजेस प्रस्तावित आहेत. जेणेकरून नाशिकहून जर कोणाला या महामार्गाद्वारे प्रवास करावयाचा असेल, तर या इंटरचेंजेसद्वारे या मार्गावर प्रवेश करता येऊ शकतो. यात इगतपुरीतील पिंपरी सद्रोेद्दीन, सिन्नर तालुक्यातील गोंदे आणि घोटी येथील कवडरा येथे हे इंटरचेंजेस दिले जातील. तसेच सुमारे दीड किलोमीटर अंतरावर अंडरपास देण्यात येणार आहे. यामुळे गावातून जाणार्‍या वहिवाटीच्या रस्त्यांना अडथळा येणार नाही. तसेच प्रत्येक 50 किलोमीटरवर सुविधा केंद्रे देण्यात येणार आहे. नाशिकमध्ये मर्‍हळ बु., व इगतपुरी तालुक्यात एक सुविधा केंद्र असेल जेणेकरून या महामार्गावरून प्रवास करणार्‍यांना या केंद्रात काहीवेळ विश्रांती घेता येईल. याव्यतिरिक्त महामार्गावर हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने उभारण्यात येणार आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिसरोड तो अंडर बायपासने जोडला जाईल. तसेच उड्डाणपूल, इंटरचेंजेस, बोगदे प्रस्तावित आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा, फोन केंद्र, वायफाय उपलब्ध करून देण्यात येईल.

दळणवळणाच्या साधनांचे मजबुतीकरण
या प्रकल्पासाठी नागपूर-मुंबई ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. जी या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल आहे. रस्ते विकास हा खरे म्हणजे शाश्वत विकासाचा मुख्य आत्मा आहे. आज जर आपण बघितले, तर देशात 70 टक्के मालवाहतूक ही रस्तेमार्गे होते, तर 85 टक्के प्रवासी वाहतूक ही रस्तेमार्गे होते. दरवर्षी हलक्या वाहनांची संख्या 9 टक्क्यांनी, तर अवजड वाहनांची संख्या 7.6 टक्क्यांनी वाढत आहे. हे प्रमाण पाहता रस्त्यांचे जाळेही त्याप्रमाणात मजबूत होणे आवश्यक आहे. भारतात 250 ते 300 किलोमीटर प्रतितास वेगाने मालवाहतूक होते. परदेशात हा वेग अधिक आहे. राज्यात 4 हजार 844 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग तर 3 लाख किलोमीटरचे इतर रस्ते आहेत. रस्ते वाहतूक करताना त्या रस्त्यांचा दर्जा, प्रवासाची विश्वासार्हताही तितकीच आवश्यक असते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार या रस्त्याचे काम होणार आहे. यामुळे रस्ते विकासाला बळकटी मिळून रस्त्यांचे जाळे मजबूत होण्यास मदत होणार आहे..

कृषी अर्थव्यवस्थेला चालना
नाशिक जिल्हा कृषिप्रधान जिल्हा आहे. येथील शेतकरी प्रयोगशील आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर कृषीमाल देशात आणि परदेशात निर्यात केला जातो. विशेष करून कांदा, द्राक्ष, भाजीपाला निर्यात मोठ्या प्रमाणवर होते. मुंबईपासून सर्वात जवळचा जिल्हा नाशिक आहे. मुंबईचे किचन अशी ख्याती असलेला हा जिल्हा कृषीमाल उत्पादनात अग्रेसर आहे. येथील आश्वासित सिंचन व्यवस्था, तंंत्रज्ञानाधिष्ठित शेतीस या महामार्गामुळे कृषी अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून जाणार्‍या 101 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गामुळे येथील निर्यात क्षमता वाढणार आहे. शेतीमाल हा नाशवंत स्वरुपाचा असतो. त्यामुळे त्याची वाहतूकही वेगाने होणे तितकेच गरजेचे असते. या महामार्गामुळे वेळेची बचत होऊन कमीत कमी वेळेत जलद गतीने निर्यात होऊ शकते. हा महामार्ग नागपूरमधील शिवमडकेपासून ते भिवंडी वडपेपर्यंत आणि तेथून पुढे जेएनपीटीपर्यंत जातो. याचा फायदा असा की, नाशिकच्या शेतकर्‍यांना या महामार्गाद्वारे जेएनपीटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होणार आहे.

असा असेल मार्ग
जिल्ह्यातून सुमारे 101 कि.मी. रस्त्याची लांबी तीन इंटरचेंजेसद्वारे महामार्गावरून प्रवास करणे शक्य इगतपुरीतील 23, सिन्नरमधील 61 गावांतील जमीन संपादन इगतपुरीतून रस्त्याची लांबी 40 कि.मी सिन्नरमधून रस्त्याची लांबी 61 कि.मी. महामार्गावर विमानाचे लॅण्डिंग शक्य रस्त्याची रुंदी 120 मी. सुमारे प्रत्येक दीड किलोमीटरला एक अंडरपास जनावरांंना जाण्यासाठी कॅटल क्रासिंग कृषीमाल निर्यातीस चालना औद्योगिक विकासाला बळकटी रोजगारनिर्मिती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!