विश्वेशची आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल

0
नाशिक । पहिल्याच स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर एखादा खेळाडू जखमी झाला तर तो सहसा त्यानंतरच्या स्पर्धेत सहभागी होत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. यातून प्रेरणा घेऊन पुढे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारे खेळाडू अगदी थोडेच पाहायला मिळतात.

अशाच खेळाडूंमध्ये नाशिकचा जलतरणपटू विश्वेश कातकाडेचा समावेश होतो. विश्वेशने जलतरण क्रीडा प्रकारात जिल्हा पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत नाशिकचे नाव उज्ज्वल करण्यास मदत केली आहे. जलतरणमध्ये आजवर केलेल्या कामगिरीविषयीच्या प्रवासाबाबत विश्वेशने ‘देशदूत’शी साधलेला हा संवाद.

लहानपणापासूनच मला पोहण्याची आवड होती. त्यामुळे शाळेत असताना पोहायला शिकलो. त्यानंतर शहरातील जलतरण तलावांमध्ये सराव करण्यास सुरुवात केली.

पुढे शहरात होणार्‍या लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो. 2016 मध्ये एका माजी महापौरांच्या वााढदिवसानिमित्त सातपूर येथे जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पहिल्याच स्पर्धेत मी सहभाग घेतला. पहिलीच स्पर्धा असल्याने फारसा अनुभव नव्हता.

यावेळी पाण्यात उडी मारताना माझ्या नाकाला जखम झाली आणि दोन टाके पडले. मात्र त्यामुळे मी निराश झालो नाही. वडील आणि प्रशिक्षकांच्या प्रेरणेने पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत अनेक स्पर्धांत भाग घेतला. यात काही स्पर्धांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले तर बर्‍याच वेळा अपयशही आले. मात्र अनेकांकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत राहिल्याने पुढील प्रवास सुरू ठेवला.

ऑगस्ट महिन्यात स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे मुर्शिदाबाद (कोलकाता) येथे झालेल्या 19 कि.मी. अंतराच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मी सहभाग घेतला. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यातही यश मिळाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत स्पर्धा पूर्ण करण्याची यानिमित्ताने संधी मिळाली. या स्पर्धेत माझ्याबरोबर सहभागी झालेल्या नाशिकच्या दशमराज बानटे यानेही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

नाशिकमधून सहभागी झालेल्या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेत यश मिळाले. स्पर्धेत स्पेन, स्विडन, बांगलादेशसह इतर देशांतील स्पर्धेक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

2017 मध्येच महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमेचर अ‍ॅक्वॉटिक असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला. यात 5 कि.मी. प्रकारात यश मिळवले. मुंबईतील सन क्रॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. राज्यभरातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

जून महिन्यात नाशिकरोड येथे झालेल्या स्वीमिंग चॅम्प स्पधेर्र्त 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये रजतपदक पटकावले. त्यानंतर ऑगस्टमध्ये झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत 100 आणि 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभाग घेतला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. नुकत्याच जळगाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत 50 आणि 100 मीटरमध्ये सहभाग घेत नाशिकचे प्रतिनिधित्व केले.

यात सुवर्णपदक पटकावले. येथील कामगिरीच्या आधारावर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी माझी निवड झाली. याच महिन्यात पुणे येथील बालेवाडीत होणार्‍या या स्पर्धेत मी 17 वर्षाआतील गटात नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहे. आजवर झालेल्या स्पर्धेमध्ये प्रशिक्षक राजेंद्र निबाळते, हरी सोनकांबळे, निनाद निंबाळते, प्रज्ञेश कातकाडे यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*