शिंदे टोलनाक्याविरोधात ग्रामस्थांची एकजूट; आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
नाशिक । सिन्नर-नाशिक रस्त्याचे बहुतांशी काम अपूर्ण असूनही शिंदे टोलनाक्यावर टोल आकारणी सुरू करण्यात आल्याने आता येथील ग्रामस्थ या टोलविरोधात एकवटले आहेत. स्थानिकांना 10 किलोमीटर परिघात टोलमाफी मिळावी या मागणीसाठी टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

टोल आकारणी केंद्र असलेले शिंदे गाव, बंगाली बाबा मंदिराजवळील पुलाचे काम तसेच चेहडीपासून पुढे नाशिकपर्यंतचे काम अपूर्ण असल्याने टोलवर शुल्क आकारणी कशी सुरू केली, असा सवाल कृती समितीने केला आहे. या टोलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने आंदोलन करत हा टोलनाका बंद केला खरा परंतु हे आंदोलन केवळ फोटो सेशनपुरते मर्यादित राहिले.

मात्र आता शिंदे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून याकरिता टोलविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या वतीने आज एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. टोल आकारणी सुरू केली असली तरी अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या टोलमुळे शिंदे तसेच परिसरातील अर्धा ते 1 किलोमीटर परिसरातील पळसे, मोहू, चिंचोली, चांदगिरी, जाखोरी, वडगाव, कोटमगाव, हिंगणवेढे येथील वाहने दररोज येथून ये-जा करतात. मात्र जर प्रत्येकवेळी येथे टोल भरायचा असेल तर मग जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टोल परिसरातील 10 किलोमीटर परिघात टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

याकरिता आज दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*