जिल्हाधिकार्‍यांकडून चिंचविहीरे ग्रामस्थांचे कौतुक

0

शेतकरी बचत गटाची संकल्पना जिल्ह्याला आदर्श : महाजन

राहुरी (प्रतिनिधी)- लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना सर्वांनी यशस्वीपणे राबविली तर गावशिवारातील पाणी पातळी वाढून सिंचन क्षमता वाढेल. ही योजना उज्ज्वल भविष्यासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभय महाजन यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान-2017 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महाजन यांनी राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे गावाला भेट देऊन गावात ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून समाधान व्यक्त्त केले.
सिमेंट नालाबांध, कंपार्टमेंट बंडींग यासह अनेकविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यांनी गितेवस्ती वरील लघुपाटबंधारे विभागातर्फे सुरू असलेल्या नालाबांध तसेच कृषी विभागातर्फे म.ग्रा. रोहयोंतर्गत राबविलेल्या शेततळे, गांडूळखत युनिट, नॅडेप कंपोस्ट व फळबाग लागवड पाहणी करून या योजनेत एकात्मिक पद्धतीने शाश्‍वत विकासाचे काम केल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतूक केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी काही तांत्रिक सूचना केल्या.
चिंचविहीरे गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळालेला आहे. हे गाव 96 टक्के हागणदारी मुक्त झाले असून शेतकरी बचत गटाची संकल्पना राबविणारे चिंचविहीरे हे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे. केंद्र सरकारच्या ‘फार्मर फर्स्ट’ या संकल्पनेतून चिंचविहीरे गाव केवळ राज्यातच नव्हे तर देशात पहिले ‘स्मार्टग्राम’ म्हणून निवडले गेले आहे.
प्रारंभी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दगडूभाऊ गिते यांनी जिल्हाधिकार्‍यांचे पहिल्यांदाच राहुरी तालुक्यात आगमन झाल्याबद्दल स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पंडीत लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, लघुपाटबंधारे उपअभियंता पी.बी. गायसमुद्रे, गटविकास अधिकारी इशाधीन शेळकंदे, वनसंरक्षक उमेश वाघ, नायब तहसीलदार छाया चौधरी, तालुका कृषी अधिकारी नामदेव रोकडे, कृषी सहाय्यक रायभान गायकवाड, शरद जगधने, ए.एम. मुळे, व्ही.आर. अनाप, आर. ए. गायकवाड, सरपंच शांताबाई गिते, ग्रामपंचायत सदस्य रूपाली गिते, राजेंद्र नालकर, संतोष पवार, विजय शिंदे, दयानंद साळवे, सोसायटीचे अध्यक्ष यादवराव नालकर, सुभाष मुरकुटे, तलाठी एस.एस. गडकर, हिराबाई नरोडे, मारूती गिते, शिवाजी गिते, चोथे, कवाणे, रमेश सावंत, सुधीर नालकर, भास्कर पानसंबळ, नारायण गिते, चारूदत्त पवार, इमाम पठाण, बाबासाहेब नालकर, सुभाष पानसंबळ, जयराम गिते, गणेश मुरकुटे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावात सध्या अनेक विकासकामांची गुढी उभारली जात आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाने आता विकासाची कात टाकली आहे. गावात राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचे जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक केल्याने ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे फळ मिळाले आहे. त्यांनी शाबासकी दिल्याने ग्रामस्थांनाही आता पुन्हा कामाची उर्जा मिळाली असून प्रोत्साहन मिळाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी चिंचविहीरे गावाला भेट दिली.
– संदीप गिते (जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा)

LEAVE A REPLY

*