Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ग्रामस्थांची अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी

Share

संस्थान कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा अन्यथा तीव्र लढा उभारू

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तुपाशी मात्र संस्थान कर्मचारी उपाशी अशीच काहीशी परिस्थिती सातव्या वेतन आयोगासंदर्भात अनुभवयास येत असल्याने शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने गांधीगिरी करत लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांना पुष्पगुच्छ दिले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या रिकाम्या खुर्चीला गांधीगिरी करीत पुष्पगुच्छ वाहण्यात आले. संस्थान कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय लवकरात लवकर घ्या अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी यांना गांधीगिरीच्या मार्गाने संस्थान कर्मचार्‍यांचे अनेक प्रलंबित प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासराव कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, नगरसेवक सचिन कोते, सचिन चौगुले, अरविंद कोते, जमादार इनामदार, भाऊ भोसले, हरीश थोरात, वाल्मिक बावचे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांना संस्थान कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात पाठपुरावा केला का? केला असेल तर त्यास विलंब का होत आहे असे अनेक प्रश्न विचारले असता ग्रामस्थांना अपेक्षित उत्तर न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या दालनाकडे वळविला. मात्र त्यांची खुर्ची रिकामी दिसल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पगुच्छ वाहिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांची समक्ष भेट घेऊन संस्थान कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा गिरवत या कर्मचार्‍यांना न्याय देण्याची विनंती केली.

दरम्यान ग्रामस्थांनी लेखाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर तोंडी केलेल्या आरोपांचा पाढा मुगळीकर यांचेसमोर बोलून दाखविला यामध्ये प्रामुख्याने म्हटले आहे की, साईबाबा विश्वस्त मंडळाने संस्थान क़ायम कर्मचार्‍यांसाठी सातवा वेतन आयोग मंजूर करण्याचा निर्णय घेतला पण सातव्या वेतन आयोग फरकासह कर्मचार्‍यांना मिळण्यास उशीर होत आहे, सातवा वेतन आयोगाचा लाभ संस्थान कर्मचार्‍यांना देण्याऐवजी आपण सरकारी प्रतिनियुक्तीवरील लोकांसाठी पदरात पाडून घेण्यासाठी खुपच प्रयत्न केले व प्रत्यक्षात लाभही घेतला.

संस्थान विश्वस्त मंडळाने ग्रँच्युईटी रक्कम कर्मचार्‍यांसाठी 20 लाख करण्याचा निर्णय घेतला त्यात आपणच खोडा घातला आणि कर्मचार्‍यांना लाभ मिळू दिला नाही. एकल पदाचा लाभ मिळू देण्यास टाळाटाळ आपणच करत आहात. कर्मचार्‍यांना अनुकंपाची योजना बासनात गुंडाळून ठेवण्याचे महान काम आपणच केले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत खोडा घालण्याचे काम आपणच करत आहात. आपल्याला प्रतिनियुक्तीवर पाठवले. याचा अर्थ आपणच कार्यतत्पर आहात तर संस्थान कर्मचारी चोर आहात असे भासवण्याचा प्रयत्न आपलाच आहे. एकवेळ संस्थान अखर्चीत रकमेवर सरकारला इन्कमटँक्स भरेल पण संस्थान कर्मचार्‍यांच्या हिताच्या योजनांना पैसा देणार नाही. हीच आपली भूमिका आहे.

ठाकरे व घोरपडे यांनी मंत्रालयात कर्मचार्‍यांच्या विविध प्रस्तावांसंबधी काड्या करून हे प्रस्ताव मंजूर होणार नाही, असा प्रयत्न केल्याने आज हे प्रस्ताव मंजूर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लेखाधिकारी यांची मुदत संपण्याला एक महिना राहिला . संस्थानवर परत मुदतवाढ घेण्यापेक्षा आपण निघून जावे; अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात आंदोलन करावे लागेल. आपणामुळे संस्थान कर्मचार्‍यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट मुख्यमंत्र्यांकडे विनंती करावी लागली व हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले .यापुढे विखे पाटलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आजवर विश्वस्त व ग्रामस्थांमध्ये भांडणे लावून पोळी भाजण्याचे उद्योग आपणच करत आलात. हे आता लपून राहिलेले नाही. येत्या आठ दिवसांत संस्थान सरकार स्तरावर संस्थान क़ायम कर्मचार्‍यांचे प्रश्न निकाली काढावेत अन्यथा आपल्या विरोधात तीव्र लढ़ा उभारला जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा संस्थान अधिकार्‍याना दिला आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!