Type to search

Featured सार्वमत

18 गाव पाणी योजनेसाठी उदयन ग़डाखांच्या नेतृत्वाखाली सोनईत उपोषण

Share

सोनई (वार्ताहर) – सोनई-करजगावसह 18 गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू करून तहानलेल्या लाखो लोकांना पिण्याचे पाणी सुरू करावे या मागणीसाठी युवक नेते उदयन शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शंभरावर तरुण कार्यकर्त्यांनी सोनई तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासमोर काल मंगळवार 23 जुलैपासून उपोषण सुरू केले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत यात काही मार्ग निघाला नसल्याने हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे गडाख यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की सोनई करजगाव सह 18 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या 20 दिवसांपासून बंद असून मुळा थडीची सर्व गावे आता पाणी पाणी करत आहेत; परंतु मायबाप सरकार प्रशासन मात्र याबाबत काही मार्ग काढत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी अनेक वेळा प्रशासन व जीवन प्राधिकरणाला लेखी तोंडी निवेदन देऊनसुद्धा पाणी योजनेत पाणी सोडले जात नाही म्हणून आठवड्यापूर्वी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई-राहुरी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात 18 गावांतील हजारो लोक व हंडे घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. गडाख यांनी आतिशय अभ्यासूपणे व पोटतिडकीने या प्रश्नाबाबत आपली भूमिका कागदपत्रांचे पुराव्यासह जनताजनार्दनासमोर मांडली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी तीन दिवसात वरिष्ठ कार्यालयापुढे हा प्रश्न मांडून पाणी सोडण्याचा प्रयत्न करू असे रस्ता रोको प्रसंगी सांगितले होते.

रस्ता रोको नंतर सर्वांना पाण्याबाबत आशा निर्माण झाल्या होत्या परंतु कोणत्याच गावांचे नळांना थेंबसुद्धा सुद्धा पाणी आले नाही मात्र रस्ता रोको नंतर 4 दिवसांनी शंकरराव गडाख यांच्यासह सात प्रमुख कार्यकर्ते व एक हजार लोकांचा जमावाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशभंग 37 (1)(3) व इतर भादवि कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला.

सध्याची दुष्काळी परिस्थिती व टंचाई काळ असतानासुद्धा केवळ राजकीय दबावापोटी हे पाणी सुटू शकत नाही. त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही व शांततामय आंदोलनाचा भाग म्हणून उदयन गडाख यांनी सोनईत हे उपोषण सुरू केले.

उपोषणस्थळी एकतारी भजन सुरू होते तसेच हक्काचे पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे जीवन प्राधिकरण पाणी योजना ठेकेदार यांचे संगनमताची चौकशी करा अशा घोषणा लिहिलेले फलक अग्रभागी लावण्यात आलेले होते. उदयन गडाख याच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य मनोज वाघ बलवीरसिंह जनवीर, उदय पालवे, सागर आगळे, विनोद दरंदले, महावीर चोपडा यांचेसह माजी ग्रामपंचायत सदस्य द्वारका कुमावत, सरपंच संगीता वैरागर, पुष्पाताई चांदगुडे, अनिता तेलोरे, राणी गुगळे, सीताबाई वैरागर यांच्यासह पुरुष महिला उपोषणात सहभागी झालेले आहे. तसेच सोनई जवळचे खेडले परमानंद, कांगोणी, शिरेगाव, अमळनेर येथून कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

प्रशासनाकडून दखलच नाही
सोनईचे मंडल अधिकारी, तलाठी कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू आहे. याबाबतची पूर्वसूचना महसूल, पोलीस, व आरोग्य विभागाला दिलेली होती. परंतु दिवसभर सोनईतील या उपोषणाची कोणत्याही वरिष्ठ अगर कनिष्ठ कर्मचार्‍याने भेट देऊन माहिती घेतली नाही. वरिष्ठ कार्यालयाला कळविले नाही. वास्तविक उपोषणकर्त्यांच्या वैद्यकीय तपासणीची गरज होती. ती सुद्धा केली गेली नाही. यावरून प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी कोणाचेतरी दबावाखाली काम करतात असा आमचा दाट संशय आहे. प्रशासनाने पाणी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना ते जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
– मनोज वाघ, ग्रामपंचायत सदस्य

नेवाशाच्या लोकप्रतिनिधींचा डाव
18 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेवासा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. शंकरराव गडाख यांनी लोकवर्गणी करून ही योजना मंजूर करून आणली होती. म्हणून या योजनेकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला. सन 2014 ते 2019 या काळात पाणी योजनेच्या ठेकेदाराने 99 टक्के देयके नेली. कामे अपूर्ण असताना ठेकेदाराला कुणाच्या कृपेने धनादेश निघाले याची चौकशी करावी. राहुरी तालुक्यात जोडलेले अनधिकृत तसेच हॉटेल-ढाब्यांचे पाणी कनेक्शन बंद करावेत. तरच नेवासा तालुक्याच्या 18 गावांच्या टेलला पिण्याचे पाणी मिळेल. मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष कडून फक्त गडाख घराण्याला बदनाम करण्याचा लोकप्रतिनिधींचा डाव आहे आणि जनतेने सहकार्याने आम्ही हा डाव हाणून पाडणार आहोत.
-उदयन शंकरराव गडाख, युवक कार्यकर्ते

अभियंत्यांच्या आश्‍वासनानंतर सोनईतील उपोषण स्थगित
अहमदनगर येथील जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. अहिरे यांनी अहमदनगर येथे शंकरराव गडाख व 18 गावांचे सरपंच, सदस्य, पदाधिकार्‍यांशी चर्चा करून चार दिवसात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाणी सोडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सोनईत उदयन गडाखांसह युवकांनी सुरू केलेले उपोषण सायंकाळी स्थगित करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!