केवळ नाशिकच्या पतंगोत्सवासाठी जर्मनीहून मायदेशी

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, ता. १४ : मायदेशाची ओढ आणि संक्रांतीच्या पतंगोत्सवाचे जबरदस्त वेड मनात असेल, तर एखादा व्यक्ती सातासमुद्रापारही कित्येक तासांचा प्रवास करून नाशिकला येऊ शकतो हे दाखवून दिलेय परदेशी नोकरीला असलेल्या नाशिकच्या एका अभियंत्याने.

मूळचे नाशिकच्या उपनगर परिसरात राहणारे आणि गेल्या काही वर्षांपासून जर्मनीतील लिअर कॉर्पोरेशनमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे विक्रांत काजळे यंदा खास संक्रांतीच्या पतंगोत्सवासाठी मायदेशी आले आहेत. जर्मनीतील म्युनिक शहरात त्यांचे वास्तव्य आहे.

त्यांनी आपल्या भावंडांसोबत आज दिवसभर पतंग उडविण्याचा आनंद घेतला. त्यांच्या मोठे बंधू अमित काजळे यांची येथे स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी असून त्यांचे धाकटे बंधू अश्विन काजळे एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांचे आई-वडिलही आणि इतर नातेवाईक नाशिकमध्येच वास्तव्याला आहेत.

देशदूत डिजिटलला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की खरे तर युरोपात सहलीसाठी भारतासह देशविदेशातून पर्यटक येत असतात. मी राहतो त्या म्युनिक शहरापासून फास्ट ट्रेनने गेल्यास अवघ्या तीन तासांच्या अंतरावर सर्वांगसुंदर पर्यटन स्थळ स्वित्झर्लंड वसलेले आहे. मात्र हे सर्व असूनही आपल्यासारखे उत्साही सणवार तेथे नाही. त्यातही संक्रांतीला नाशिकचा पतंगोत्सव काही औरच असतो. येथे पतंग उडविताना आणि काटाकाटी करताना जो आनंद येतो, तो विदेशात नाही. त्यामुळेच यंदा खास सुटी घेऊन मी संक्रांतीच्या निमित्ताने येथे आलो आहे.

विक्रांत काजळे यांच्याप्रमाणेच अनेक बाहेरगावचे नाशिककर आज आपल्या शहरात, आपल्या घरी संक्रात सणानिमित्त आले आहेत. घरी आईने केलेल्या तीळगुळाच्या पोळीची माया आणि पतंगाची ओढ त्यांना येथे घेऊन आली आहे. त्यामुळे त्यांचा संक्रांत सण यंदा खऱ्या अर्थाने उत्साहात आणि आनंदात आहे.

नोकरी व्यवसायासाठी नाशिकमधील शेकडो लोक आज विविध देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. गणेशोत्सव दिवाळी, दसरा, संक्रांत, स्वातंत्र्य दिन अशा भारतीय सणांच्यावेळी या मंडळींना मायदेशाची आणि त्यातही आपल्या पारंपरिक सण उत्सवाची ‘याद’ हमखास येत असते.

त्यातील काहीजण परदेशातील महाराष्ट्र मंडळासारख्या संस्थांच्या माध्यमातून सण समारंभ साजरे करतात. तर काही थेट या सणासाठी खास सुटी घेऊन मायदेशी येतात.

LEAVE A REPLY

*