पवार, थोरातांवर विखेंचा हल्लाबोल!

0

पवारांच्या मनातील कटुता झळकली थोरात हायकमांड आहेत का?

मुंबई/अहमदनगर (प्रतिनिधी) – डॉ.सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशावरून उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर आपली भूमिका मांडताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विखे कुटुंबाबद्दल पवारांच्या मनात किती कटुता आहे, हे त्यांच्या दोन दिवसांतील विधानांवरून दिसून आले. त्यांनी 1991 चा उल्लेख आणि स्व.बाळासाहेब विखेंबद्दल आता बोलणे खेदजनक आहे. त्यांच्या मनातील ही कटुता काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी पक्षातील प्रतिद्वंदी आ.थोरात यांच्यावरही टीका केली. ते हायकमांड आहेत का? असा प्रश्‍न करून त्यांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशाने राज्यातील आघाडीत राजकीय भूकंप झाला. खुद्द विरोधी पक्षनेत्यांचा सुपुत्र भाजपात गेल्याने देशभर याची चर्चा झाली. यावरून राज्यातील आघाडीच्या नेत्यांनी विखेविरोधी टीकेचा सूरही लावला. पवार, थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी याप्रकरणी विखेंवर प्रश्‍नचिन्ह लावले. दोन दिवसांनी या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी ना.विखे गुरूवारी माध्यमांसमोर आले. अत्यंत शांतपणे त्यांनी पवार, विखे, नगर लोकसभा, आघाडी, राजीनामा आदी विषयांवर भुमिका मांडली. मात्र त्यांनी यादरम्यान पवार आणि थोरातांना लक्ष्य केले. पवारसाहेबांनी माझे वडील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं. माझे वडील हयात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्याने याबद्दल टिप्पणी करावी, ही दुर्दैवी गोष्ट आहे. शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे. त्यांच्या वक्तव्याने वेदना झाल्या, अशा शब्दात ना. विखे पाटील यांनी खेद व्यक्त केला.

सुजयचा निर्णय वैयक्तिक
मुलासाठी संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं आहे. सुजयने त्याचा निर्णय घेतला. तो वैयक्तिक होता. विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी होती, गालबोट लागेल असं विधान माझ्याकडून होणार नाही, याची मी काळजी घेतली. आघाडी धर्म पाळला. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

म्हणून नगरच्या जागेची मागणी
औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात त्यासाठी नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या. 2004, 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नगरच्या जागेवर पराभूत झाला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

हायकमांडचा निर्णय मान्य : विखे
विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, डॉ.सुजय यांचा भाजपा प्रवेश व त्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी हायकमांडला भेटून त्यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर ते देतील तो निर्णय मान्य राहील. जो निर्णय येईल, तो निर्णय आपल्याला सांगितला जाईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

थोरातांनी मला पक्षनिष्ठा सांगू नये
काँग्रेसने विखे कुटुंबाला खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आ. बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर बाळासाहेब थोरात यांच्याकडे कपबशी, नारळ, रोलर कुठून आले हे मला माहीत आहे. त्यांनी मला पक्षनिष्ठा सांगू नये, असं उत्तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मला जे सांगायचं आहे ते हायकमांडला सांगेन. थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मी त्यांना सांगण्यास बांधील नाही, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*