आघाडीच्या बळकटीसाठी विखेंना दक्षिणची जागा द्यावी

0

प्रदेश उपाध्यक्ष अभंग यांचा राष्ट्रवादीला प्रस्ताव : किती दिवस फटके खाणार?

अहमदनगर (प्रतिनिधी)- कितीही ताकद लावली तरी विजयी होण्याची शाश्‍वती नसल्याने राष्ट्रवादीने नगर लोकसभा मतदारसंघ (दक्षिण) डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला सोडावा आणि त्याऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी थेट पक्षाकडे मांडली आहे. आघाडी बळकट करायची असेल आणि लोकसभेसह विधानसभेत अधिकाधीक जागा काढायच्या असतील तर हाच सर्वोत्तम पर्याय ठरतो, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, अभंग यांच्या या ‘धाडसी’ मागणीमुळे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीने नुकतीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष आणि सरचिटणीसांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आ.छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तर नगरमधून प्रदेश उपाध्यक्ष अभंग यांच्यासह सरचिटणीस अविनाश आदीक आणि प्रदेश कार्यकारिणीत 51 वे सरचिटणीस म्हणून संधी मिळालेले जामखेडचे राजेंद्र कोठारी यांची उपस्थिती होती.

अभंग हे मंगळवारी कामानिमित्त नगरमध्ये होते. त्यांना माध्यमांनी सध्याच्या राजकीय हालचालींबद्दल छेडले. यावेळी प्रदेश कार्यकारीणी बैठकीतील घडामोडींची माहिती देवून अभंग यांनी दक्षिण मतदारसंघातील विखेंचे आगमन आणि त्या अनुषंगाने होणार्‍या राजकारणाला तोंड फोडले. याबाबत बोलताना अभंग म्हणाले, 30 रोजी मुंबईत बैठक झाली. आपले मत प्रदेशाध्यक्षांसमोर स्पष्टपणे मांडले आहे. आता जिल्हा आणि राज्यातील आघाडीच्या राजकारणाला स्थैर्य देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघ (दक्षिण) विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला देणे अधिक योग्य ठरेल. या बदल्यात राष्ट्रवादीने शिर्डी (उत्तर) मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी सुचना मांडली आहे.

दरम्यान, अभंग केवळ मागणी करून थांबलेले नाहीत. जागांच्या अदलाबदलांबाबत त्यांचे काही राजकीय तर्कही आहेत. ‘सार्वमत’शी बोलताना त्यांनी या तर्कांचा अधिक उलगडा केला. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर आपण जिल्ह्यातील राजकारण आणि लोकसभेच्या जागांबद्दल जी भुमिका मांडली, तीच भुमिका यापूर्वी जिल्हा प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडली आहे. दक्षिणेच्या राजकारणात राष्ट्रवादीने किती फटके खायचे, हा प्रश्‍न आहे. या जागेवर पक्षाचा उमेदवार विजयी होत नाही, हे गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. आतातर दक्षिणेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारही सापडत नाही. मग जागा लढविण्याचा अट्टाहास का करायचा? या जागेवर गेल्यावेळी भाजपाकडून खा.दिलीप गांधी लढले. ते तुलनेने अप्रिय उमेदवार होते. त्यांच्याच पक्षातील दोन नेत्यांनी त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. तरीही ते विजयी झाले आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे लोकसभेच्या जागांची अदलाबदल करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी, विखे-थोरात आणि राष्ट्रवादीतील नेते यांच्या समन्वयाने दोन्ही जागा आघाडीकडे खेचून आणता येतील, असा आपल्याला विश्‍वास असल्याचे अभंग म्हणाले.

विधानसभेवर सकारात्मक परिणाम
लोकसभेच्या जागांची अदलाबदल केली तर त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर होईल, असा अभंग यांचा ठाम विश्‍वास आहे. आपसातील हेवेदावे बाजूला सारले तर लोकसभेच्या जागांसह विधानसभेच्या सर्वाधिक जागा आघाडीकडे येतील. उत्तरेतील जागा राष्ट्रवादीला फलदाती ठरण्याची शक्यता आहे. दक्षिण डॉ.सुजय विखेंसाठी सोडताना उत्तरेची जबाबदारी ना.विखेंकडे सोपवता येईल. जिल्ह्यातील आघाडीच्या राजकारणात आ.बाळासाहेब थोरात यांचा विचार घेणे आणि त्यांना पुढाकार देणेही अपरिहार्य आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकारणाच्या नव्या मांडणीत विखे-थोरात यांच्यातील वादही कमी होईल. यामुळे आघाडीला स्थैर्य मिळेल, असा तर्कही अभंग यांनी मांडला आहे. अभंग यांनी आ.थोरातांचा उल्लेख आवर्जून आणि अनेकदा केला, हे विशेष!

पवारांचे मार्गदर्शन आणि थोरातांचा पुढाकार!
आपसातील भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नुकसानच होत आहे. त्यापेक्षा आघाडी म्हणून धोरण आखणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा अभंग यांनी व्यक्त केली. जागांची अदलाबदल आणि आघाडीतील समन्वय याबाबत आता सर्वच नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्याकडे पिचड यांच्याशी बोलणीसाठी निरोप पाठवला आहे. तर माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्याशी मी स्वत: बोलणार आहे. सर्व नेत्यांनी एक व्हावे. जागा अदलाबदलाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जिल्ह्यातील नेते ना.विखे, आ.थोरात, माजी मंत्री पिचड यांच्यासह अन्य नेत्यांनी सल्लामसलत करण्याची गरज आहे. यासाठी संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्यास आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*