Featured सार्वमत

राधाकृष्ण विखेंचा राजीनामा स्वीकारला

करण ससाणेंचाही काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

विखे अजूनही काँग्रेस पक्षातच; जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त : खा.अशोक चव्हाण

शिर्डी (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्वीकारला आहे. त्यांनी फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते सध्या काँग्रेस पक्षातच आहेत. त्यांच्या संदर्भात जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल मात्र जे पक्षविरोधी कारवाई करतील त्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काल श्रीरामपूर येथे प्रचार सभेसाठी येत असताना विमानाने शिर्डी येथे ते उतरले. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विनायक देशमुख, डॉ. एकनाथ गोंदकर, अशोक खांबेकर आदी उपस्थित होते. अशोक चव्हाण म्हणाले, करण ससाणे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्विकारला असून जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीदरम्यान प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करून काँग्रेसचे कामकाज चालू राहील. कोणी राजीनामा दिल्याने किंवा कोणी पक्षातून जाण्याने काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. यापुढे काँग्रेस पक्षाचे काम करणार्‍यांना संधी दिली जाईल. संघटनेमधील लोक इकडे-तिकडे गेले असतील त्यांना एका ठराविक मर्यादेपर्यंत समजवण्याचे काम आम्ही करू शकतो मात्र ज्यांना पक्षात काम करायचे नसेल त्यांना बाजूला सारून पुढे जाऊ.

देशातील लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात असून शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज (शुक्रवार) सायंकाळी संगमनेर येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. गेल्या तीन टप्प्यातील निवडणुका जवळून बघितल्या त्यामुळे एकंदरित महा आघाडीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, एकट्या जिल्हाध्यक्षावर पक्ष चालत नसून काँग्रेसचे सर्व नेते काम करीत आहेत. त्यामुळे शिर्डीची जागा आम्ही निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम आहे. विदर्भातील सर्व दहा जागा आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिक्की आणि मोबाईल घोटाळ्यात गैरव्यवहार करणार्‍या पंकजा मुंडे यांना राहुल गांधी यांच्यावर आरोप करण्याचा काही हक्क नाही. राहुल गांधीपेक्षा नक्कीच त्या मोठ्या झाल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्ये तर त्यांचे पुत्र डॉ.सुजय भाजपात आहेत, याकडे पत्रकारांनी खा. चव्हाण यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, याबाबत विखे यांच्याशी बोललो आहे. मुलगा एकीकडे आणि वडील दुसर्‍या पक्षात अशी अनेक उदाहरणे आहेत. विखे यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी ते अद्याप पक्षात आहेत. आम्ही त्यांचे मत परिवर्तन करीत आहोत. त्यांनी लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे काम करावे आणि ते करतील, असा विश्वास खा.चव्हाण यांनी व्यक्त केला. गटा-तटाच्या राजकारणात आम्ही पक्षाचे नुकसान होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

पक्ष सोडणार नाही; लोकसभा निवडणूक प्रचारापासून तटस्थ

श्रीरामपूर (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण जयंत ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. आपण पक्ष सोडलेला नाही मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रचारापासून तटस्थ भूमिका घेणार असल्याचे ससाणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ससाणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठविला असून व्यक्तीगत कारणासाठी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असून यापुढे मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षातच राहून पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे.गेल्या 25 दिवसांपूर्वी करण ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. राजीनाम्यानंतर काल प्रसार माध्यमांशी बोलताना ससाणे म्हणाले, जिल्हाध्यपद स्विकारल्यानंतर आपण मतदारसंघात प्रचार दौरा करून जाहीर सभाही घेतल्या. आ. कांबळे यांच्याबाबत असलेली कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असताना शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी निझर्णेश्‍वर येथे प्रचार शुभारंभ सभेत ‘साईबाबांच्या झोळीत हात घालणारांचे वाटोळे झाले’ असे वक्तव्य केले.

यामुळे संघटनेतील ससाणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका आधीच ससाणे समर्थकांनी जाहीर केली होती. माझ्या वडिलांबद्दल असे अनुद्गार काढल्याने मीही व्यथीत झालो. समर्थकांच्या भावना लक्षात घेवून भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार मी करणार नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे पदावर राहून प्रचाराचे काम न करण्यापेक्षा पदाचा राजीनामा देवून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडलेला नाही. पक्षाच्या विरोधी कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. पक्षाचे काम सुरूच ठेवणार आहे, असेही ते म्हणाले.

बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ससाणे समर्थकांची बैठक माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या वडाळा महादेव येथील फार्म हाऊसवर झाली. या बैठकीत करण ससाणे येथे उपस्थित असते तर आजच ‘निर्णय’ झाला असता, उद्या दुपारी 12 वाजता निर्णय जाहीर होईल असे सूचक व्यक्तव्य ना. विखे पाटील यांनी केले होते. ना. विखे यांनी बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे दुपारी 12 वाजता त्यांनी माध्यमांसमोर राजीनाम्याची घोषणा केली.

लोखंडेचे काम करण्याच्या विखेंच्या सूचना
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राहाता तालुक्यातील रांजणखोल येथून कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरूवात केली. नांदूर, ममदापूर, राजुरी, कोर्‍हाळे, कनकुरी, शिर्डी आदी ठिकाणच्या बैठकांमध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांचे काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!