Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

राधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते

Share

विखेंना सर्वप्रथम शपथ घेण्याचा मान, विनोद तावडे, राम शिंदेंच्या खात्यात कपात

शेलार नवे शालेय शिक्षणमंत्री अनिल बोंडेंकडे कृषी विभाग राम शिंदेंकडे पणन व वस्त्रोद्योग रिपाइंला प्रथमच स्थान

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवाटोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल रविवारी सकाळी पार पडला. त्यात प्रथम शपथ घेण्याचा मान काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला. तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांना लगेच भाजपाकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे यांच्यारूपाने नगर जिल्ह्याला दुसरे कॅबिनेटमंत्रिपद मिळाले आहे. दरम्यान ना.विखेंकडे गृहनिर्माण खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, अनिल बोंडे यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. रिपाइंला प्रथमच राज्यातील भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे. रिपाइंचे महासचिव आणि दलित-पुरोगामी चळवळीचे गाढे अभ्यासक अविनाश महातेकर यांनाही मंत्रिपद दिले आहे. तसेच विष्णू सावरा, दिलीप साबळे, राजकुमार वडोले, प्रकाश मेहता, प्रवीण पोटे, अंबरीश अन्नाम इत्यादींच्या मंत्रिपदाचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा डॉ. सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा काल थेट मंत्रिपदाच्या ‘गिफ्ट’सह भाजपात प्रवेश झाला आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेटमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

येत्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे ही मंत्रिपदे फक्त दोन महिन्यांसाठी असतील. राजभवनावरील गार्डनमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नीति आयोगाच्या बैठकीसाठी नवी दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुन्हा चर्चा केली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. राधाकृष्ण विखे यांच्यासारखा अनुभवी व बडा नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाला अहमदनगर जिल्ह्यात आपली पाळेमुळे मजबूत करता येणार आहे. नगरमध्ये राम शिंदे वगळता भाजपकडे एकही ताकदीचा नेता नाही. शिवाय शिंदे हे ओबीसी वर्गातून येत असल्याने मराठा नेत्याची भाजपला नगरमध्ये नितांत गरज होती. विखेंच्या रूपाने ती भरून काढण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांना महत्त्व देऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. विखेंना मानाचे पान देऊन भाजपने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मजबूत पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे मानले जात आहे.

सहा मंत्र्यांना डच्चू
प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिश अत्राम यांचा समावेश आहे.

असे झाले खातेवाटप

कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी आणि फलोत्पादन
आशिष शेलार – शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण
संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
सुरेश खडे- सामाजिक न्याय
अनिल बोंडे – कृषी
अशोक उईके – आदिवासी विकास
तानाजी सावंत – जलसंधारण
राम शिंदे – पणन व वस्त्रोद्योग
संभाजी पाटील निलंगेकर – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन
राज्यमंत्री
योगेश सागर- नगरविकास
अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
संजय भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आणि आदिवासी विकास
अतुल सावे – उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

13 जणांची लॉटरी
भाजपा – 10, शिवसेना – 02, रिपाइं-  01

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!