प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये बुधवार (दि. 31) पर्यत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नदी, ओढे व नाल्याकाठी रहिवाशी नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हयातील प्रवरा गोदावरी व भिमा या नदयांना पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी दिली आहे.

आगामी काळात नगर, नशिक व पुणे जिल्हयात पावसामुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्हयातून वाहणार्‍या गोदावरी, भिमा, घोड, कुकडी, प्रवरा, मुळा व सिना तसेच इतर नदयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरिकांना मदत व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे सर्वानी पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्यासाठी गर्दी करु नये अशा सूचना दिल्या आहेत.

तात्काळ संपर्क करा –
जिल्ह्यात 223 गावे नदीगाठी वसलेले आहे.त्यामुळे इतर गावांपेक्षा या गावांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून संबधित गावांची आढावा घेण्याची कार्यवाही सुरु आहे.पुर परिस्थिती उदभविल्यास आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. त्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री क्रमांक 1077 आणि दुरध्वनी क्रमांक 0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी, वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, जुन्या इमारतीमध्ये आश्रयाला थांबू नये अशा महत्वाच्या सूचना नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*